Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

२२. तांडेलानें भागडचुरी मारून त्याचें शिर कापिलें म्हणून वरील कलमांत जें निरूपण आलें आहे तें खरें नव्हतें. भागडचुरी कांहीं एक दुखापत न होतां जो निसटला तो लपूनछपून कांहीं दिवस होता. नंतर त्यानें कारस्थान आरंभिलें. नाथराव शिंदा नांवाचा नागरशाचा एकांगवीर असा जमातदार होता. त्याचा व ठाकूर नांवाचा दुसरा एक सरदार होता त्याचा कथळा पडला. वाद मानपाना संबंधीचा होता. नाथराव म्हणे कीं ठाकूर तिस-या मानाचा नसून चवथ्या मानाचा आहे. ठाकूर म्हणे कीं आपण तिस-या मानाचे आहोंत. तिस-या मानाच्या सरदारास चवथ्या मानाच्या सरदारा च्या आधीं टिळा विडा इत्यादि देणग्या देण्याची वहीवाट लौकिक समारंभांच्या प्रसंगीं त्या काळीं असे व त्या मानपानाचा अभिलाष सरदारमंडळी मोठ्या औत्सुक्यानें धरीत. नाथराव शिंद्याचें व ठाकुराचें हें मानापमानाचें भांडण इतक्या विकोपास पोहोंचलें कीं नाथरावानें आपल्या जमातदारीच्या अधिकारांत ठाकुराचा तिसरा मान काढून टाकीला. ह्या कृत्या बद्दल नागरशानें नाथरावाचा धिःकार केला, त्या मुळें असंतुष्ट होऊन नागरशाचें व नाथरावाचें वैमनस्य पडलें. ह्या वैमनस्याचा फायदा भागडचुरीनें घेतला. भागडचुरीनें वडनगरच्या मलिकाशीं अगोदर च संधान बांधिलें होतें. त्या कडे त्यानें नाथरावाला फितवा घेऊन जाण्याची सल्ला दिली. नाथराव कागाळी घेऊन वडनगरास गेला. वडनगरच्या मलिकानें नागरशा कडे नाथरावाचा कैवार घेणारा एक भाट पाठविला. वडनगरचा मलिक म्हणजे दिल्लीचा पातशाहा जो महमद तुघलघ त्याचा हस्तक. भाट कोंकणांत नागरशाच्या दरबारीं आला व पातशाहाच्या बिरुदांची नामावळी म्हणता जाला. म्लेच्छ राजाची ती नामावळी त्या देशाभिमानशून्य व धर्माभिमानशून्य भाटाच्या तोंडची ऐकतां च नागरशाचा पुत्र जो त्रिपुरकुमर त्याच्या पायाची आग मस्तकास पोहोंचली. पहिल्या नागरशाच्या पुत्राचें नांव जसें त्रिपुरकुमर होतें तसें ह्या दुस-या नागरशाच्या पुत्राचें नांव हि त्रिपुरकुमर च होतें. त्रिपुरकुमरानें त्या भिकार भाटाचें नाक कापून त्याला गांवा बाहेर हाकून दिलें. भाट दिल्लीस गेला. पातशाहास सर्व वृत्तान्त कळला. त्यानें निका मलिक नामें सरदाराला बारा शें घोड्यां निशीं नागरशा वर पाठविलें. रात्रिच्या थंड समयीं चालावें व दिवसा दबा धरून बसावें, असें करीत करीत, पायगांवचे मोरिया वरून नौकांनीं संभुजे वर मालिक उतरला. तेथून बारा खाड्या वलांडून निका मलिक कान्हेरसि आला. तेथें युद्ध होऊन, नागरशाच्या फौजेचा पराभव झाला. तेथून ठाणें काबीज केलें. शिंवां वर उतरला. माहिमास गेला. तेथें नागरशाची राणी होती. तिशीं दहा घटिका युद्ध होऊन, निका मलिकानें राणी मारली. राजा नागरशा वाळुकेश्वरीं होता. त्याची व मलिकाची गांठ भायखळ्यास पडली. थोर युद्ध झालें. नागरशा मारिला गेला. एणें प्रमाणें निका मलिकानें ठाणेंकोंकणचें राज्य घेतलें. शक १२७० त ठाणें कोंकणांत तुर्काण झालें.