Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

२०. राज्यभ्रंशा नंतर व प्राणहरणा नंतर प्रतापशाचें नांव हि काढण्याचें कारण बखरकाराला राहिलें नाहीं. त्याच्या पातेणे सरदारांचें हि नांव ह्या नंतर बखरींत कोठें आलेलें नाहीं. त्या वरून दिसतें कीं, हे पातेणे प्रभू कसे तरी माहीम बेटांत जीव कंठून कालक्रमणा करीत असावे. शक १२१६ पासून शक १२५४ पर्यंतचीं ३८ वर्षे पातेणे प्रभू माहीम बेटांत मोठ्या ऐश्वर्यानें नांदले. तदनंतर ते जे कायमचे खालावले त्यांतून त्यांनीं पुढें आजपर्यंत राजकीय दृष्ट्या वर डोकें म्हणून कधीं च काढिलें नाहीं. सरदारकी सोडून अथवा सरदारकी सुटून कायमचें कारकूनमत व कारकूनवृत्ति त्यांनीं स्वीकारिली, असा विलाप केशवाचार्यानें केलेला बखरींत नमूद आहे. पातेणे ऊर्फ पातेणे प्रभू शक १२१५ त उत्तरकोंकणांत बिंबदेव जाधवाच्या अनुषंगानें आले ही बाब निश्चित असल्या मुळें, कायस्थ प्रभूंच्या उत्तरकोंकणांतील आगमनकाला प्रमाणें पातेणे प्रभूंच्या आगमनकाला संबंधानें कोणत्या हि प्रकारची अनिश्चितता नाहीं. शक १२१५ पूर्वी कोणी हि पातेणा प्रभु उत्तरकोंकणांत नव्हता, इतर जातींचे प्रभू होते, परंतु पातेणे प्रभू नव्हते. प्रभू म्हणजे काय तें येथें सांगितलें पाहिजे. प्रभु म्हणजे गांवचा इजारदार, जमीदार किंवा मोकासदार. हा प्रभु नांवाचा अमलदार राजानें नेमिलेला असे. ग्रामाधिकारी जो ग्रामस्थापनारंभींचा ग्रामकूट ऊर्फ गाउंडा तो स्वयंभू असून, त्याची वृत्ति वंशपरंपरा चालणारी असे, राजदत्त नसे, इतकेंच नव्हे तर लोकदत्त हि नसे, प्रभुपणा राजदत्त असल्या मुळें, त्याची शाश्वती राजाच्या मर्जी वर राही. राजा दुर्बल झाला असतां किंवा राजक्रांति झाली असतां, प्रभु वंशपरंपरात्वाचा हक्क सांगण्या कडे प्रवृत्ति दाखवी. परंतु ती प्रवृत्ति नवा राजा ताबडतोब खोडून काढी. तत्रापि कित्येक इजारदार व त्याचे वंशज वैशिष्ट्या करितां किंवा बडेजावी करितां, प्रभुपणाचा अधिकार हातून गेला असतां हि, आपल्या नांवा पुढें प्रभू हें उपपद आडनांवा दाखल जोडीत व त्या जोडीच्या आड कोणी फारसा येत नसे. सध्यां पारशांत ब्राह्मणांत व इतर जातींत घराण्याच्या मूळ संस्थापकाच्या धंद्याचें नांव-बाटलीवा कूपर; देशपांडे, पंडित, पुराणिक--ज्या प्रमाणें आडनांवा दाखल व्यक्तिनांवा पुढें जोडतात; त्या प्रमाणे च पूर्वी मूळपुरुषानें कधींकाळीं केलेल्या प्रभुपणाचा दर्शक जो प्रभु शब्द तो आपल्या नांवा पुढें कित्येक घराणी माहीम प्रांतांत लावतात. ही घराणीं बिंबदेव जाधवाच्या काळीं सर्व पातेण्यांचीं हेातीं, सबब सर्व पातेणे आपणास प्रभु म्हणवितात आणि वैशिष्ट्या करितां पातेणे प्रभू ही संज्ञा धारण करतात. कारण जवळच्या पेण, पनवेल व महाड प्रांतांत प्रभू हें उपपद चांद्रसेनीय कायस्थ हि आपल्या जातीला लावतात. पातेणे हे ज्या प्रमाणें माहीमप्रांतीं गांवांचे प्रभू शक १२१५ नंतर बिंबदेव जाधवाच्या कारकीर्दीत झाले, त्या प्रमाणें पेणपनवेलमहाडप्रांतांत कायस्थ हे केव्हां तरी तत्रस्थ गांवांचे प्रभू झाले. एणे प्रमाणें उत्तरकोंकणांत दोन प्रकारचे प्रभू अस्तित्वांत आले; पातेणे प्रभू व कायस्थ प्रभू. पातेणे प्रभू म्हणजे पातेणे जातीचे प्रभू व कायस्थ प्रभूं म्हणजे कायस्थ जातीचे प्रभू. राजापूरप्रांतीं कित्येक क-हाडे ब्राह्मण प्रभु उपपद धारण करणारे आहेत; परंतु तें उपपद देसाई या आडनावांच्या पाठी मागें जोडलें जातें, स्वतंत्रपणें आडनांव म्हणून किंवा जातिनाम म्हणून योजिलें जात नाहीं. प्रभुदेसाई हें आडनांव क-हाड्यात आहे. गांवचा प्रभुपणाचा अधिकार ज्या देसायांच्या पूर्वजांनी कधींकाळीं भोगिला त्यांचे वंशज आपणांला प्रभुदेसाई म्हणवितात. सर्व क-हाड्या ब्राह्मणांना प्रभुपणाचा अधिकार केव्हां हि मिळाला नसल्या मुळें, प्रभु हें उपपद क-हाड्यांत जातिवाचक झालेलें नाहीं. परंतु मूळचे कोंकणांत आलेले सर्व पातेणे व सर्व कायस्थ कोंकणांतील गांवांचे एके काळीं प्रभू झाल्या मुळें, प्रभू व पातेणे आणि प्रभू व कायस्थ ह्या शब्दांचें सामानाधिकरण्य झालें. प्रभु हें नांव ज्या प्रमाणें अधिकाराचें वाचक होतें त्याच प्रमाणें कायस्थ हें हि नांव एका कनिष्ट अधिकाराचें वाचक होतें. काय म्हणजे गांवचा वसूल. काया वर स्थापिलेला जो अधिकारी तो कायस्थ. कायस्थ प्राचीन कालीं ब्राह्मण वगैरे वाटेल त्या साक्षर जातीचे असत. शक ११०९ च्या परळ येथील दुस-या अपरादित्याच्या शिलालेखांत वालिग पंडित नांवाच्या ब्राह्मणाला कायस्थ हें विशेषण लाविलेलें आहे. तात्पर्य कायस्थ म्हणजे कुळकरणी ऊर्फ कुलकरणिक. इतर जातींच्या कायस्थां पासून स्वत:स विशेषिण्याची अपेक्षा जेव्हां प्रभु कायस्थांस भासूं लागली, तेव्हां त्यांनीं आपल्या नांवा पाठी मागे दुसरें एक विशेषण जोडलें. तें विशेषण चांद्रसेनीय हें होय.