Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

१९. एणे प्रकारें मुलूख आबादान करोन बिंबदेव जाधवानें राज्याची बंदिस्ती केली व माहीम जागा उत्तम रम्य स्थळ देखोन तेथें राजधाम स्थापिलें, बिंबदेवास दोन स्त्रिया. प्रथम राणीचें नांव नागरसिद्धि. द्वितीय राणीचें नांव गिरिजा. दोन पुत्र. वडिल पुत्राचें नांव प्रतापशा. धाकट्या पुत्राचें नांव पुरशा. शक १२१७ त माहिमास बिंबदेवानें राजधानी स्थापिली. बखरींत (पृष्ट ८९) राजधानी स्थापण्याचा शक १२२७ दिला आहे तो चुकला आहे, तेथें शक १२१७ पाहिजे. कारण, बिंबदेव शक १२१६ पासून ९ वर्षे १ मास व १४ दिवस राज्य करून शक १२२५ त शांत झाला. ह्या च बिंबदेवाचें नांव मुसुलमानी तवारिखांत भीमदेव म्हणून लिहिलें असल्याचा भास त्या तवारिख वाचणा-या आधुनिक इंग्रज लेखकांस झाला. कारण बिंब ह्या शब्दाचें फारसींत ज्या अक्षरांनीं अवतरण केलें जातें त्या अक्षरांचें वाचन बिंब, बीम्ब, बीम, भीम, असें चार सहा प्रकारांनीं होण्याचा संभव आहे. शक १२२५ ते बिंबदेव वारल्या उपर, त्याचा ज्येष्ठ पुत्र प्रतापशा गादी वर आला. प्रतापशा गादी वर आला तेव्हां वृद्ध रामदेवराव जाधव दक्षिणापथाचा नामधारी सम्राट होता. चेऊल ऊर्फ चंपावती येथे रामदेवरावाहून हि वृद्धतर असा नागरशा सत्तर ऐशीच्या घरांत गेलेला असून त्याचा पुत्र त्रिपुरकुमर यानें पन्नाशीचा उंबरठा नुकता च वलांडला होता. नागरशाचा दुसरा पुत्र केशवदेव त्रिपुरकुमरा हून चार पांच वर्षांनीं लहान असून, त्याचा नागरशा नामें करून पुत्र वयांत आलेला असावा. वृद्ध नागरशानें आपली एक मुलगी स्नेहवृद्धि स्तव प्रतापशास दिली होती. तथापि ह्या शरीरसंबंधानें चंपावतीकराचा व माहीमकर प्रतापशाचा वैरभाव शांत न होतां, तो जास्त च दुणावत चालला होता. वर्धमान वैरभावाचें कारण असें होतें कीं प्रतापशाचा आजा जो रामदेवराव जाधव त्याचा नूर अल्लाउद्दीनानें इतका कांहीं उतरला होता कीं तो अल्लाउद्दीनाचा कारभार देणारा क्षुद्र मांडलिक बनला होता. अर्थात् संकटसमयी कोंकणच्या प्रतापशाला साहाय्य करण्याची ताकत त्याच्या ठाईं फार च अल्प होती. पारडें असें फिरल्या मुळें नागरशा व त्रिपुरकुमर यांनीं एक कुरापत काढिली. येडक-मेढालगड नांवाचा प्रतापशाचा एक डोंगरी किल्ला त्रिपुरकुमरानें व केशवदेवानें आपला मेव्हणा जो प्रतापशा त्या जवळ मागितला. प्रतापशानें ही मागणी फेटाळून लावली. लढाईला हें कारण बस्स होऊन त्रिपुरकुमरानें प्रतापशाच्या प्रांता वर स्वारी करण्याची जंगी तयारी केली. प्रतापशाची ह्या वेळीं लढाईंची जशी साधनासिद्धि असावी तशी नव्हती. सबब रामदेवराव जाधवा कडे त्यानें मदत मागितली. रामदेवराव जाधवानें जीवननाईक सांवखेडकर व हेमपंडित यांना प्रतापशाच्या मदतीस कोंकणांत पाठविलें. त्यांचा पुरा मोड त्रिपुरकुमरानें माहुलीच्या मैदानीं केला. ह्या वर प्रतापशा व रामदेवराव जाधव यांनी पुनः सैन्याची दिन चार जुनाट प्रती जेव्हां सांपडतील तेव्हां खरे आंकडे कोणते तें निश्चित सांगतां येईल. जमवाजमव चालविली. द्वादश प्रभू नावाणिक पाचारून त्यांना त्यांच्या समुदाया सह प्रतापशानें युद्धार्थ सजविले. परंतु सजवणूक मना जोगती न झाल्या मुळें, प्रतापशा सैन्या सह सायवनांतील जो गड गगनमहाल त्याच्या आश्रयास गेला. नागरशा पुढें प्रतापशानें कच खादिली. इतक्यांत रामदेवराव अणहिलपट्टणच्या जयसिंगास मदतीस घेऊन आला. जयसिंग ह्या नांवा संबंधीं एक बाब येथें लक्ष्यांत ठेविली पाहिजे. अणहिलवाडचा प्रख्यात राजा जो सिद्धराज त्याचें एक बिरुद जयसिंह हें होतें. हें बिरुद प्रस्तुत बखरकार अणहिलवाडच्या प्रत्येक राजाला लावितो. सम्राट् रामदेवराव, अणहिलपट्टणचा जयशिंग व प्रतापशा, ह्या तिघांचे सैन्य नागरशा व त्रिपुरकुमर यांच्या वर चढाई करून आलें. तें विसामागड मणोरमहालीं पैलदेंच्या तांदूळवाडीस येऊन ठेंपलें. तेथून त्या सैन्यानें प्रतापपुर काबीज केलें. शेवटीं आंधेरीच्या रानांत दोहों कडील सैन्याची टक्कर झाली. मोठें तुंबळ युद्ध उद्भवलें व रामदेवराव जयसिंग व प्रतापशा ह्यांचा पूर्ण पराजय होऊन नागरशा व त्रिपुरकुमर यांनीं थोर विजय संपादिला. हा प्रसंग शक १२३२ च्या आधीं केव्हां तरी घडला. पुढे थोड्याच वर्षांनीं म्हणजे शक १२३२ च्या सुमारास रामदेवराव जाधव मृत्यू पावला. त्या मुळें प्रतापशाचा एक मोठा आधार गेला. ह्या च सुमारास चेऊल ऊर्फ चंपावतीचा नागरशा व त्याचे पुत्र त्रिपुरकुमर व केशवदेव वारून, दुसरा नागरशा चेऊलच्या गादी वर आला. दुस-या नागरशानें माहीमच्या प्रतापशास रेटीत रेटीत अगदीं रडकुंडीस आणून आस्तआस्ते केवळ धुळीस मिळविलें. शेवटीं नागरशानें प्रतापशाच्या प्रजेंत भेद पाडिला. बिंबदेव जाधव व प्रतापशा जाधव यांनीं आपल्या बरोबर जे पातेणे प्रभु सरदार आणिले त्यांना राज्यांतील मोठमोठे सर्व अधिकार देऊन टाकिले. तशांत, जातिशुद्धतेकरितां देसल्यांचीं यज्ञोपवीतें प्रतापशानें छेदिलीं होतीं, त्या मुळें पूर्वीचे देसाई, देसले, पाटील, पाटल्हारे केवळ निर्माल्यवत् बनले. ह्या असंतुष्ट देसल्यांना व पाटल्हा-यांना नागरशानें फितवून आपल्या कच्छपीं लाविले. देसले व पाटील ह्यांच्या द्वारा देशाचा वसूल येत ना सा होऊन, प्रतापशा व त्याचे प्रभु सरदार अन्नाला मोताद झाले. अश्या विपन्न स्थितीस पोहोचलेल्या प्रतापशाचें राज्य अखेरीस शक १२५४ त नागरशानें कायमचें खालसा केलें. शक १२४० त देवगिरिच्या जाधवांचें राज्य मुबारिक खिलजीनें रसातळास पोहोंचविलें होतें च. तदनंतर १४ वर्षांनीं प्रतापशा जाधवाचें माहीमचें राज्य चेऊलच्या नागरशानें स्वतःच्या राज्यास जोडिलें. " या प्रकारें नागरशानें प्रतापशाचें राज्य विना कष्टीं स्वहस्तगत केलें." राज्यभ्रंशा नंतर प्रतापशाला देसल्यांनीं आपलीं जानवीं तोडून टाकिलीं म्हणून ठार केलें.