Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
अल्लाउद्दीनाची धाड येण्या पूर्वी कर्नाटक, कोंकण, इत्यादि बहुतेक सर्व प्रांतांतून मांडलिक राजे बेलगाम होऊन सम्राट्सत्ता नांवाला मात्र राहिली होती. रामदेवराव जाधव, शाहू राजा, बाजीराव रघुनाथ, इत्यादि दुर्बल राजपुरुषांच्या मनाची रचना च अशी विघटित असते कीं दुर्दैंवानें आंगावर पडलेल्या सम्राट्सत्तेचा भार त्यांना सहन होत नाहीं, कारभाराचा व्याप आकलन करण्याचा मगदूर त्यांच्या ठाईं जन्मत:च गैरहजर असतो आणि राज्यलक्ष्मीचा संसार थाटानें व शिताफीनें चालविण्याच्या करामतीची उणीव त्यांच्यांत निसर्गसिद्ध व परिस्थितिसिद्ध असते. अश्या दुर्बल राजाला शक १२१६ त अल्लाउद्दिनानें चार घटकेंत (बखरींतील शब्द) चूप केलें यांत मोठेंसें नवल नाहीं ! राज्य यंत्र पटकाविण्याची सामान्य तयारी केलेला कोणी हि इसम हें कृत्य ह्या हून हि थोड्या अवधींत करता. त्रिपुरकुमर ह्या ठाणेंकोंकणच्या सामान्य संस्थानिकानें रामदेवरावाला दटावण्याचा व पिटाळण्याचा हा क्षुद्र चमत्कार वीस वर्षां पूर्वीं शक ११९६ त कसा केला तें मागें सांगितलें च आहे. अल्लाउद्दीनानें शक १२१६ देवगिरी वर प्रथम स्वारी केली म्हणून म्लेच्छ तवारिखकार लिहितात. परंतु, त्या सालाच्या अगोदर चार वर्षे म्हणजे शके १२१० त अल्लाउद्दीनानें पैठणा वर स्वारी केली होती असें प्रस्तुत बखर म्हणते (पृष्ट ८९). ह्या शक १२१० च्या स्वारींत रामदेवराव व त्याचे पातेणे प्रभु सरदार यांचा पराभव झाला. ह्या पराभवा नंतर असें दिसतें कीं विशेष भानगडींत न पडतां, अल्लाउद्दीन परत क-हामाणिकपुरास गेला. देवगिरीस केशवदेव किल्ला बळकावून म्हणजे बळकट करून राहिला. हा केशवदेव पुढें थोड्या च काळांत मरण पावला व त्याचा पुत्र धाकटा रामदेवराव देवगिरी वर अंमल करूं लागला. प्रतापशा राजगुरू हेमाडपंता सह अळंदापुरपाटण येथें जसा चा तसा च होता. बिंबदेव उदगीरीस होता. त्यानें गुजराथेच्या बाजूनें स्वारी करून सालेरमोलेर, नंदनबारे म्हणजे सध्यांचे नंदूरबार, दाहिटें, केशवपुर, वडानगर पावेतों चाल करून शक १२१६ त ठाणेंकोंकणांत प्रवेश केला. शक १२१६ त अल्लाउद्दीनानें देवगिरी वर चाल केली त्या च सुमारास बिंबदेव यादवानें गुजराथे वर स्वारी करून कोंकणांत प्रवेश केला. गुजराथे वर स्वारी करण्याचें कारण उघड आहे. देवगिरी वर चालून आलेल्या अल्लाउद्दीनाला गुजराथेंतून जाऊन माळव्याच्या बाजूनें पायबंद देण्याचा बिंबदेवाचा उघडउघड हेतू दिसतो. बिंबदेवाचा हा डाव ओळखून व रामदेवरावाशीं झटपट तह करण्याचा फार्स लगबग उरकून अल्लाउद्दीन परत क-हामाणीकपुरास गेला. त्या मुळें बिंबदेवानें देऊं घातलेला पायबंदाचा शह त्याच्या मागचा चुकला. हा डाव फसल्या वर व अल्लाउद्दीनाची धाड परत गेल्या वर, बिंबदेवानें गुजराथेंतून माळव्या कडे जाण्याचा रोख बदलून गुजराथेच्या दक्षिणे कडील नागरशा व त्रिपुरकुमर वगैरे लहान सहान नाइकांच्या म्हणजे राजकांच्या ठाणेंकोंकण प्रदेशा कडे आपला मोर्चा शक १२१६ त वळविला. ह्या वेळीं नागरशाचा पुत्र जो त्रिपुरकुमर त्याच्या हातीं ठाणेंकोंकणची सर्व सत्ता गेली होती. ठाणेंकोंकणच्या भोंवतालील इतर लहानसहान संस्थानिकां हून त्याचें सामर्थ्य यद्यपि मोठें होतें, तत्रापि बिंबदेव जाधवा सारख्या सम्राट्पुत्राच्या बड्या सैन्याशीं बरोबरीच्या नात्यानें वर्षोनवर्ष टक्कर देत बसण्याची त्याची ऐपत नव्हती. बिंबदेव ठाणेंकोंकणांत शिरून परतापुर येथें सैन्या सह मुक्काम करून राहिला आणि माहीम बेटांत आपल्या सूर्यवंशी सोमवंशी व शेषवंशी सरदारांची वसाहत करून कायमचा बसला. याचा अर्थ असा झाला कीं माहीम प्रांत त्रिपुरकुमराच्या हातचा जाऊन, चेऊल, उरण, पनवेल, पेण वगैरे दक्षिणे कडील प्रांतांचा त्याला आश्रय करावा लागला. शक १२१६ पासून शक १२२५ पर्यंतच्या नऊ दहा वर्षांत घेतलेल्या प्रांतांची स्थिरस्थावरता करून, बिंबदेवानें बरोबर आणिलेल्या सरदारांची स्थापना माहीम बेटांत कायमची केली. सरदारांची यादी बखरकार जी देतो ती अशी:- (यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)