Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
ऐसें युद्ध थोर जालें. राजा भोज अपेशी जाला. नंतर भोजाचा साथीदार जो भैसेदुर्गाचा म्हणजे म्हसगडचा संस्थानिक तो युद्धीं मिसळला. त्या वर एकसरकर पाईक उठला. त्याला सिंध्यानें मागें ओढिलें आणि म्हटलें कीं, मज असतां त्वां म्हाता-यानें युद्धास प्रवर्तावें हा न्याय नव्हे. असें म्हणून शिंद्यांनीं युद्ध सुरूं केलें. महामारी पेटले. दळ भोजाचें भंगिलें. भैसेदुर्गाचा राव जिवंत धरिला. मग केशवदेवासि भेटले. बंद हवाले केला. या रीती केशवदेव येशवंत जाला ". भोजराजाचा हा पराभव शक ११४६ त झाला. ह्या वेळीं कल्याण येथील चालुक्यांचें साम्राज्य समाप्त होऊन व देवगिरीच्या यादवांचें साम्राज्य सुरू होऊन सुमारें तीस पसतीस वर्षे लोटलीं होतीं. चक्रवर्ती सिंघण यादवाची कारकीर्द चालू होती. आणि बिंब वंशातील राजांचा अंमल ठाणेकोकणांतील साष्टी बेटा वर चालू होऊन ८६ वर्षे गेलीं होतीं. राजाधिराज जे सम्राट् ते यद्यपि बदलले तत्रापि लहानलहान संस्थानिक आपापलीं राज्यें निर्वेधपणें चालवीत असत. आणि संस्थानिका संस्थानिकांत आपसांत लढाया झाल्या तत्रापि वरिष्ठ सम्राटांचा त्यांना विशेष प्रतिबंध नसे. अगदीं च प्रतिबंध नसे, असा च केवळ प्रकार नसे. सम्राट्सत्तेला विरोध नसला, म्हणजे लहान संस्थानिक एकमेकांशीं भांडले, तंडले, मेले किंवा नष्ट झाले, तत्रापि तसे होऊं देण्याला सम्राटांचा प्रतिबंध नसे. आपापल्या वैरांचें निर्यातन करण्याची मांडलिक संस्थानिकांना मुभा असे किंवा हक्क असे. त्यांतला च प्रकार चेऊलचे भोज राजे व ठाण्याचे बिंब राजे यांच्या मधील तंट्यांचा होता. शक ११४६ तील युद्ध संपल्या वर चेऊलकर भोजाचा व केशवदेवाचा तह होऊन मित्रभाव उत्पन्न झाला. मित्रत्वाच्या नात्यानें भोजराजानें केशवदेवाला भेट म्हणून आंब्यांची फर्मास पाठविली, ती आंब्यांची डाली मध्यें रस्त्यांत भैसेदुर्गाचा राजा जो जश्वद्या ऊर्फ जसवंतदेव त्यानें जप्त केली. शक ११४६ तील युद्धांत हा जश्वद्या केशवदेवाच्या हातीं जिवंत सांपडला होता. त्याला केशवदेवानें जीवदान देऊन त्या वेळीं सोडून दिलें. ह्या नंतर जश्वद्या सिंघण यादवाला भेटून देवगिरीकर यादवांचा मांडलिक बनला. केशवदेव अनहिलवाडकर चौलुक्यांचा स्नेही पडला. सबब सम्राट जो सिंघण यादव त्याचें व केशवदेव याचें सहज वैर उद्भवलें. सिंघण यादव आपल्या हाता खालील मांडलिकांचा तोरा चालवून घेणा-या पैकीं नव्हता. सर्व उंचवटे खणून पाडून मैदान सपाट करणा-यां पैकीं होता. अश्या पराक्रमीं व वचकबाज सम्राटाची बगलबच्चेगिरी करणा-या जश्वद्यानें केशवदेवाला पाठविलेले आंबे मध्यें च उर्मंटपणें खाऊन टाकले. केशवदेवाची हि या काली वाढती कमान होती. त्यानें चेऊलच्या भोजाला पराभूत करून, शिलाहारसत्ता तर अगदी च संपुष्टांत आणून ठेविली होती. अश्या त्या केशवादेवाला आंब्यांची अफरातफर झालेली रित्या वेठ्यांच्या मुखजबानीनें कळली. केशवदेवानें जश्वद्या कडे भाट सांगून. पाठविला कीं तुमच्या सारख्या भल्या लोकांनीं चो-या कराव्या हें युक्त नव्हे, तो निरोप ऐकून जश्वद्यानें उलट निरोप पाठविला कीं, मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलपें फोडून आपले आंबे परत घेऊन जावे. निरोप ऐकून केशवदेव कोपला. जश्वद्या वर स्वारी करण्या करितां देशाला हंकारा केला. नगा-या घाव घातला. शेषवंशी, सूर्यवंशी व सोमवंशी, असे सर्व योद्धे मिळाले. भैसेदुर्गा वर चालले. वेढा घातला. बारा वर्षे वेढा पडला. परंतु किल्ला हातीं आला नाहीं ! चिंचांचें चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचो-या ज्या पडल्या त्या रुजून त्यांचे वृक्ष होऊन त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या. पण गड हातीं येता दिसे ना. तेव्हां भेद केला. आंधेरीचा कोणी म्हातरा होता. त्याची वृत्त तेथील देसायानें काढिली होती. तो पळून जाऊन जश्वद्याच्या आश्रयानें भैसेदुर्गा वर पाइकी करून पोट भरी. त्याला स्वदेशाची फार खंत उत्पन्न होऊन, किल्याचे दरवाजे चोरून खोलण्याची कामगिरी आपण करूं अशी इच्छा त्यानें केशवदेवाला कळविली, आणि त्या प्रमाणें तें नीच कृत्य त्या अधमानें बजाविलें. किल्ला केशवदेवाच्या हातीं पडला. जश्वद्या पुनः जिवंत सांपडला. भैसेदुर्ग आपल्या राज्यास जोडून, केशवदेवानें नवसारीचा राजा गोदराव म्हणून एक मदोन्मत्त नाईक होता त्याला नरम केलें. नंतर आपल्या सर्व सरदारांना यथायोग्य वाणें देऊन. केशवदेवानें ठाण्याचें राज्य पुढें पांच वर्षे केलें. उपरान्त एकाएकीं मरण पावला. त्याला दुर्दैवानें पुत्रसंतान नव्हतें. राज्य करावयास कोणी राजवंश्य नाहीं, सबब सर्व देसाई मिळोन, जनार्दन प्रधान यास गादी वर बसविलें. केशवदेवानें दिलेल्या सर्व वृत्त्या आपण अव्याहत चालवूं असें आश्वासन जनार्दन प्रधानानें दिलें. तें मान्य करून देसाई आपल्या घरोघर गेले. हा प्रकार शक ११५९ त घडला. जनार्दन प्रधान ठाण्याचें राज्य चार वर्षे जों चालवितो तो शक ११६३ त घणदिवीचा वैश्य राजा नागरशा ठाणेकोंकणा वर चाल करून आला.