Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
१६. माहीम ऊर्फ बिंबस्थान म्हणजे बिंबराजांच्या सैन्याच्या छावणीचें स्थान येथें प्रताप बिंबानें एकंदर नऊ वर्षे राज्य केलें. त्या काळच्या रूढी प्रमाणें त्याची राणी त्याच्या बरोबर सती निघाली. नंतर मही बिंब गादी वर आला. त्यानें शक १०६९ पासून शक ११३४ पर्यंत ६५ वर्षे गादीचा उपभोग घेतला. त्याच्या अमदानींत संवत् १२४५ त म्हणजे शक १११० त चंपावतीच्या म्हणजे चेऊलच्या भोजराजानें बिंबांच्या राज्या वर चाल केली. उरणापासून शहाबाज परगणा मारीत थेट ठाण्याजवळील कळव्या पर्यंत भोजाचें सैन्य येऊन पोहोचलें. मही बिंबा जवळ ८००० आठ हजार दळ होतें. खाडी उतरून, कळव्यास दोन्हीं दळांचें थोर युद्ध झाले. त्यांत भोज राजा प्राणास मुकला. तेव्हां भोजाचा प्रधान मही बिंबाच्या आड आला. त्याचा वध शेषवंशी केशवराव यानें केला. हा दुसरा पराभव पाहून, भोजराजाचा पाळकपुत्र युद्धास सज्ज झाला. त्याला मरोळच्या हंबीररावानें यमसदनास पाठविलें. तेव्हां नामोहरम होऊन भोजाचें राहिलेंसाहलें सैन्य पळोन गेलें, महीबिंबाला मोठा जय मिळाला. युद्धांत ज्यांनीं पराक्रम केले त्यांना राजानें पदव्या व पारितोषकें दिलीं. देसायांना वृत्या दिल्या. शेषवंशी केशवरावाला गळ्यांतील पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. देवनरच्या पाइकानें थोर नामोष केला, सबब त्याला ठाकूर पद दिलें. मरोळकर देसायाला कहाळांच्या दोन श्रुती वाजविण्याचा मान मिळाला. गंगाधर नाईक सांवखेडकर यांना पराक्रमा बद्दल वाद्यें, विराणें व वीरगांठ प्राप्त झाली. रघुनाथ पंताच्या पदरांत सरदेशकी पडली. उतनचे बारा राऊत पडले त्यांच्या कुळास राऊत पद वंशपरंपरा झालें, कांधवळीच्या दहा पाइकांच्या वंशजांस चौगुलकी मिळाली. साहारकर, कोंडिवटेकर, देवनरकर, चेंभूरकर, नरसापुरकर, वगैरे शेलके वीर, कडी, तोडे, सांखळ्या, वीरगांठी, वगैरे त्यां त्यां योग्य अशीं बक्षिसें पावले. एणें प्रमाणें आसपासच्या बरोबरीच्या संस्थानिकांना वचकांत ठेवून मही बिंबानें ६५ वर्षे सुखानें राज्य करून शक ११३४ त देह ठेविला. त्या वेळीं त्याचा पुत्र केशवदेव याचें वय पांच वर्षांचे होतें. त्यांची आई कामाई इजकडे राज्य चालविण्याची जोखीम आली. मंही बिंबाच्या उतार वयांतील ही त्याची शेवटची बायको वयानें तरुण व रूपानें सुंदर होती. तिच्या विषयीं प्रधानाला पापवासना उत्पन्न झाली. कामाई आपल्या मनीं बहुत खिन्न झाली. तिनें माहीमच्या हरद पुरोस प्रधानाची ही दुष्ट वासना निवेदिली. हरद पुरो म्हणाला, तू आम्हा सर्वांची माता, तुज पाहे ऐसा कोण आहे ? असें म्हणून हरद पुरोनें देशांतील कित्येक विश्वासाचे राऊत मिळविले आणि कुसुंबा भांग चढवून रात्रीस प्रधानाच्या महालास वेढा दिला. तेथें जंगी झटापट होऊन हांहां म्हणता हरद पुरोनें प्रधानाचा शिरच्छेद केला आणि तें शीर नेऊन कामाईच्या पुढें टाकिलें. कामाई प्रसन्न झाली व ज्यांनीं ज्यांनीं ह्या कामीं मेहनत केली त्या सर्वांना सरफराज केलें. नंतर हरद पुरोनें पळसवलीकर, पहाडकर व वनेवाळकर ब्राह्मणां करवीं शुभमुहुर्तावर केशवदेवास राज्यीं अभिषेकिलें व त्याच्या गळां राज्यसिक्के घातले. त्या समईं केशवदेवानें कामाईच्या अनुमतें देसायांना वाणें दिलीं त्याचा तपशील:-- (पुढील तपशील वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
अश्या देणग्या केशवदेवानें दिल्या. केशवदेवानें मोठ्या ऐश्वर्यानें बारा वर्षे राज्य केलें. त्यानें राजपितामह, म्हणजे आसपासच्या सर्व लहान सहान संस्थानिकांचा आजा, ही पदवी धारण केली व त्या अर्थाचे बडेजावीचे गद्यपद्य पोवाडे रचिले. ते पोवाडे केशवदेवाचा भाट संस्थानिकांच्या राजधान्यांतून जाऊन गाऊं लागला. त्याचा राग संस्थानिकांना सहजच आला. तत्कालीन पोवाडे म्हणजे काय प्रकरण असे त्याचें स्पष्टीकरण केलें म्हणजे आसपासच्या संस्थानिकांना राग कां आला तें उलगडेल. सध्यां जे पोवाडे शाळिग्राम वगैरे मंडळीनें छापिले आहेत ते सर्व पद्य आहेत, त्यांत गद्याची एक हि ओळ नाहीं. केशवदेवाच्या काळचे म्हणजे शक ११००।१२०० च्या सुमारचे पोवाडे, तसेच शहाजीशिवाजींच्या वेळचे पोवाडे व पेशवेशिंदेहोळकर यांच्या वेळचे हि सर्व पोवाडे पद्य असून शिवाय गद्य हि असत. पोवाडा म्हटला म्हणजे तो गद्यपद्य असा दुरंगी असावयाचा. ज्याला संस्कृतांत चंपूकाव्य म्हणतात त्या काव्याच्या सदरांत पोवाडा पडतो, एवढें सांगितलें म्हणजे पोवाडां हें काव्य गद्यपद्य असतें, केवळ गद्य किंवा केवळ पद्य नसतें, हें सांगण्याची जरूर नाहीं. शाळिग्रामानें जे पोवाडे गोळा केले ते, पोवाड्यांचें खरें सबंद रूप काय असतें त्याचा नीट बोध त्याला न झाल्या मुळें, एथून तेथून सर्व अर्धवट गोळा केले.