Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
भराडी व गोंधळी डफा वर जेवढें गाणें म्हणतात तेवढा गाण्याचा जो पद्यमय भाग तो च फक्त पोवाडा, अशी समजूत शाळिग्रामाची झाली. पद्यभागाला जोडून प्रत्येक कडव्याच्या प्रारंभाला, मध्यें व शेवटीं भराडी व गोंधळी जो गद्य भाग म्हणत असतात तो भाग पोवाडा नव्हे, अशी समजूत शाळि. ग्रामाची झाली. त्या मुळें शाळिग्रामानें छापिलेला प्रत्येक पोवाडा अपूर्ण राहिला. प्रत्येक पोवाड्याच्या प्रत्येक कडव्याच्या आदीं, मध्यें व अंतीं शाहीर जो गद्य भाग स्पष्टीकरणार्थ म्हणतो तो संप्रदायशुद्ध पद्धतीनें म्हणणा-या जाणत्या पटाईत शाहिराच्या तोंडून जसा चा तसा उतरून घेऊन गद्यसंवलित पद्य शाळिग्रामानें छापिलें असतें म्हणजे त्यानें सबंद व संपूर्ण पोवाडा छापिला असें म्हणतां आलें असतें. पोवाडा हें केवळ श्राव्य काव्य नव्हे. हें दृश्य काव्य हि आहे. पोवाडा हें एकप्रकारचें नाटक आहे. त्यांत अनेक पात्रें असतात. मुख्य शाहीर व त्याचा साथीदार हे दोघे पोवाड्यांतील व्यक्तींच्या सोंगांची बतावणी करतात. कडव्यांत वर्णिलेल्या प्रसंगांतील मुख्य पात्राची बतावणी मुख्य शाहीर करतो व गौण किंवा प्रतिस्पर्धी पात्राची बतावणी साथीदार करतो. मुख्य पात्राची बतावणी मुख्य शाहीर किंवा गोंधळी तर करतो च. परंतु त्या हून हि आणीक एक काम शाहीर करीत असतो. नाटकांत ज्याला सूत्रधार म्हणतात व ज्याचें काम नाटकांतील संविधानाचें सूत्र अथ पासून इति पर्यंत सबंध ठेवावयाचें व उकलावयाचें असतें त्या सूत्रधाराचें ति-हाईतपणाचें हि काम शाहीर करीत असतो. बतावणीचें व कथानकाचा धागा शाबूत ठेवून कथेचें तात्पर्य ति-हाईतपणें सांगण्याचें काम शाहीर ऊर्फ सूत्रधार कांहीं गद्यांत करतो व वीरश्रीचा अतिरेक झाला असतां एकदम पद्याच्या वातावरणांत उड्डाण मारतो. वीरश्रीचा संचार होऊन जे वृत्तमय बोल शाहीराच्या मुखांतून प्रतिभेच्या विकसनानें अनिवारपणें प्रस्त्रवूं लागतात ते बोल पोवाडानामक चंपू काव्यांतील पद्य होत. वीरश्रीच्या आगीनें धगधगणारें व रसरसणारें तें पद्य सहजच तुटक असून, कथानकाचा बराच मोठा भाग अध्याहृत ठेवितें. तो अध्याहार शाहीर योग्य अभिनयानें गद्य भाषेनें पुरा करून दाखवितो. कोणी समजेल कीं हें गद्य भाषण कुचकामाचें असेल. तर तसा भाग नाहीं. शब्दांची ठेवण, म्हणण्याचा ठसका, विकारांचा हुंदका, वगैरे काव्याचे जे जे कांहीं ढंग पद्याच्या ऊर्मीत आविष्कृत करण्यास सवड सांपडत नाहीं ते ते सर्व नखरे शाहीराच्या जिव्हे वर नाचणारी सरस्वती वैशिष्यें करून गद्य भागांत च दाखविण्याची हौस बाळगिते. ह्या करितां, सबंद पोवाडा ज्यांस ऐकावयाचा व पहावयाचा असेल, त्यानें ह्या गद्य भागाला काट देण्यांत मतलब नाहीं. असले हे गद्यपद्यमय पोवाडे महिकावतीच्या केशवदेवाचे महिकावतीच्या आसपासच्या प्रांतांतील संस्थानिकांच्या ऐकण्यांत व पहाण्यांत येऊन, कित्येकांना राजपितामह या आढ्यतेच्या शब्दांची चीड आली. त्यांतील धारचंपावतीच्या भोजराजाला तर अतिशय क्रोध आला. हें कालचें पोर स्वतःला सर्व राजांचा पितामह म्हणवितें, असें उद्गार काढून, भोजानें आपल्या दळवय्याला पाचारण केलें व ठाणेंकोंकणा वर हल्ला करण्याचा हुकूम केला. भोजाचें सैन्य कळव्यास येऊन ठेपलें. " परदळ देखतां केशवदेवानें देसायांना हंकारा केला. देसाय देसाय देश मिळाला. सिंध्याचा जमाव थोर झाला. नगा-या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगें, डफ, काहाळा, विराणीं वाजलीं. पाइकापाईक झाली. कळव्या युद्ध थोर जालें. देवनरचे विनायक म्हात-यानें राया भोजाच्या छत्रीची खीळ एक्या बाणें विंधोन पाडिली. दुस-या बाणें भोजाच्या शिरींचा गंगाळटोप पाडिला.