Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

कालान्तरानें उत्पन्नाच्या उत्पादना संबंधानें व वांटणी संबंधानें, न्यायाच्या न्याय्यान्याय्यत्वा संबंधानें आणि बलिष्ट शत्रूंशी झगडण्याच्या सामर्थ्यासामर्थ्या संबंधानें, ग्रामस्थांत भांडणें, तंटे वगैरे असंतोष उद्भवून किंवा बलिष्ट अस परचक्र येऊन, ग्रामसंस्थाबाह्य अश्या परकीय वरिष्ट सत्तेचा स्पर्श व पगडा निर्माण झाला आणि त्या बलिष्ट सत्तेला ऊर्फ बलिष्ट राजाला गांवच्या कृषीवल व कारू यांनीं निर्मिलेल्या संपत्तींतून वांटा देणें आवश्यक झालें. राजदाय ऊर्फ सरकारदेणें म्हणून एक नवीन बाब उत्पन्न झाली. प्रस्तुत बखरींत (पृष्ट ९२।९३।९४।९५।९६) ह्या सरकार - देण्याचे चार भाग सांगितले आहेत; (१) खुद्द राजभाग, (२) धर्म, (३) सीळोत्तर व (४) नगद, पैकीं पहिले तीन भाग सरकारभाताच्या पोटांत समविष्ट होत. उदाहरणार्थ, ९२ व्या पृष्टा वरील दहावें गांव जें पोवै त्याच्या उपजेची रक्कम अश मांडिली आहेः-पोवै सरकारभात मुडे ६८ राजभाग मुडे ५६ धर्म ४ सीळोत्तर ८ नगद दाम ३००. ह्यांतील राजभाग ५६ + धर्म ४ + सीळोत्तर ८ मिळून सरकारभात एकंदर मुडे ६८ होतें. ६८ मुडे भात पोवै गांवांतून सरकाराला मिळे. पैकीं ४ मुडे धर्म व ८ मुडे सीळोत्तर वजा जातां राजांच्या वाट्याला ऐन भात मुडे ५६ रहात. नगद दाम ३०० हे कारू वरील सरकारदेण्याचें एकंदर द्रव्य होय. राजा हा दंडाधिकारी व राज्याचा प्रधान अंश, सबब तत्पोषणार्था कडे राजभागांचा विनियोंग होई. तडीतापसी, अतीथअभ्यागत, शास्त्रीपंडित, भटभिक्षुक, ग्रामदेवपूजक, इत्यादींच्या निर्वाहा कडे धर्म ह्या सदरा खालीं पडणा-या दायाचा विनियोग होई. जननमरण इत्यादि संस्कारांची वासलात लावणारा जो ग्रामजोशी तो गांवचा वृत्तिवंत असे, म्हणजे ग्रामस्थां बरोबर ग्रामस्थापनेच्या वेळी स्वयंभू अवतरलेला असे. त्याचा निर्वाह ग्रामस्थांच्या द्वारा हेाई, राजद्वारा होत नसे. तडीतापसी, शास्त्रीपंडित इत्यादि योगी, विद्वान् वगैरे उच्च संस्कृतीचे जे प्रतिनिधि त्यांचा चरितार्थ राजद्वारा सरकारी उत्पन्नांतून हाई. ठाणेंकोंकणांतील समुद्रकांठचे जे गांव तेथील खाजणांतून पावसाचें व समुद्राचें खारेंगोडें पाणी आंत घेण्यास किंवा बाहेर काढून लावण्यास चर करावे लागतात, बांध घालून दरवाजे ठेवावे लागतात व ते दरवाजे दगडांनीं बंद करावे लागतात किंवा दगड काढून मोकळे करावे लागतात. ह्या कृत्याला शिलोत्तार ही प्राचीन संज्ञा असे. शिलोत्तार ह्या शब्दाचा मराठी अपभ्रंश शीळोत्तर. शीळोत्तराचें काम करणारा जो माणूस तो शिळोत्तरा पाटील. हा पाटील ग्रामनिर्मित नसे, राजनिर्मित असे व ह्याचा निर्वाह सरकारांतून होई. निर्वाहाच्या दायाला शीळोत्तर ही संज्ञा असे. शिळोत्र असा हि उच्चार प्रचारांत आहे. शिलोत्तार म्हणजे बांधाच्या दरवाज्यांतील शिळा बसविण्या बद्दल किंवा काढण्या बद्दल जें उत्तार म्हणजे उतरण्याचें शुल्क म्हणजे कर तो. नगद दाम ह्या शब्दांतील दाम म्हणजे सजगाणी व सजगाणी म्हणजे फद्या. दाम, सजगाणी व फद्या हीं नाण्यांचीं तीन नांवें ह्या बखरींत येतात. चाळीस दामांचा एक रुपाया. रुपायाचे त्या कालीं ८० पैसे धरीत. अर्थात् दाम दोन पैश्यांचा होई. सजगणी व फद्या हीं दोन्हीं नाणीं त्या कालीं दोन पैश्यांचीं असत. हीं तिन्हीं नाणीं शुद्ध तांब्याचीं किंवा प्रायः मिश्र धातूंचीं असत. मुडा त्या कालीं त्या प्रांतांत २५ मणांचा असे. सध्यां कोळंबा भाताचा मुडा पेणपनवेलप्रांतीं २५ मणांचा धरतात. पोवै गांव त्या कालीं ९०० दाम राजाला कारूं वरील कर म्हणून देई, रुपयांत बोलावयाचें म्हणजे २२ १।२ साडे बावीस रुपये देई. पोवै गांव सरकारांत ६८ मुडे भात भरी. सरकार जमीनीच्या एकंदर उत्पन्नाचा षष्ठांश घेई. तेव्हां पोवै गांवाचे त्या कालीं भाताचें एकंदर उत्पन्न ४०८ मुडे म्हणजे सध्यांच्या वसिमणी ५१० खंडी असे. प्रस्तुत बखरींत एकंदर १२५गांवांच्या उपजेची वगत दिली आहे. तींत सरकारभाताचे जे राजभाग, धर्म व शीळोत्तर असे तीन वांटे दिले आहेत त्यांचे आंकडे बरेच ठिकाणीं चुकलेले आहेत. बिंबाख्यानाची एक लेखी प्रत मज जवळ आहे ती वरून खरे आंकडे सत्ताविसाव्या रकान्यांत देण्याचा थोडाबहुत प्रयत्न केला आहे. परंतु, बखरीच्या आणीक कित्येक गांवांच्या वहिवाटदारांचीं नांवे बखरींत नमूद आहेत, ब-याच गांवांचीं नाहींत. हा हि तपशील बखरीच्या आणीक प्रती हातीं आल्या खेरीज पुरा करतां येणार नाहीं.