Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
पुरोहिता सुद्धां हे आठ अधिकारी ऊर्फ प्रधान प्रताप बिंबा बरोबर होते. फक्त एकटा पुरोहित तेवढा ब्राह्मण, बाकीचे सात एकोनएक मराठे. ह्या साता हि मराठ्यांना गोत्रें होतीं व तंत्रागमानुरूप त्यांच्या निरनिराळ्या कुळदेवता होत्या. ह्या सर्व समुदाया (सैनिक, अधिकारी व बुणगे) सह प्रताप बिंब मोहिमेस निघाला, तो थेट लाट देशांतून उत्तरकोंकणांत शिरला नाहीं. कारण, लाट देश त्या कालीं अणहिलपट्टणच्या अंमला खालीं नसून, बारप्प चौलुक्याच्या स्वत:च्या व वंशजांच्या अंमला खालीं होता. हा बारप्प चौलुक्य अणहिलपुरकर चौलुक्यांच्या विरुद्ध असून कल्याणीच्या तैल चालुक्याच्या बाजूचा होता. सबब, लाटदेश उजवी कडेस टाकून, प्रताप बिंब नर्मदा उतरून व सातपुडा वलांडून बहुश: अजंठ्याच्या घाटानें पैठणास गेला. त्या काली नर्मदा, सातपुडा, अजंटा व पैठण त्या प्रांतांत निरनिराळे संस्थानिक असून, हे संस्थानिक कल्याणीच्या चालुक्यांना विरोध करणा-यां पैकीं होते. शिवाय, पैठणास त्या काली भौम आडनांवाचा जो संस्थानिक होता तो चांपानेरच्या बिबांच्या स्नेहसंबंध्यांतला, बहुश: शरीरसंबंध्यांतला होता. पैठणच्या विक्रम भौमानें (बखरींत भोम अशीं अक्षरें आहेत) प्रताप बिंबाला त्याच्या परिवारा सह, म्हणजे त्याच्या दहा हजार सैन्या सह, दोन वर्षे खतः जवळ ठेऊन घेतलें. प्रताप बिंबाला हि पैठणास तळ देऊन पाहुणचार खाण्याशिवाय गत्यन्तर नव्हतें. कारण, त्याची पैशाची टंचाई होती. दोन वर्षांत मुख्य प्रधान बाळकृणराव सोमवंशी यानें पैशाची व्यवस्था लावून, शक १०६२ त पैठणाहून दक्षिणेस चाल केली. प्रताप बिंबाला उत्तर कोंकणांत म्हणजे सध्यांच्या रामनगर, जव्हार, कल्याण, ठाणें व मुंबई या टापूंत शिरावयाचें होतें. तेव्हां पैठणाहून देवगिरी, अंकाईटंकाई, बागलाण ह्या रस्त्यानें नवसारी प्रांतांत न उतरतां, प्रताप बिंब पैठण, नेवासें, जुन्नर ह्या रस्त्यानें दवणप्रांतांत उतरला, पैठणाहून हरबाजी देशमुख ऊर्फ देस प्रताप बिंबाला, कोणाच्या सांगीशिफारसीनें नव्हे तर स्वत:च्या ईर्ष्येनें, येऊन मिळाला आणि विक्रम भौमाच्या शिफारसी वरून युद्धांत प्रखर म्हणून नांवाजलेला बाळाजी शिंदा दोन हजार घोड्या निशी प्रताप बिंबाच्या साह्यास सिद्ध झाला. एकूण बारा हजार घोड्या निशी प्रताप बिंबानें दवण प्रांता वर झडप घातली, कल्याण, ठाणें, माहुल ह्या दक्षिणेकडील महालांत न उतरतां, दमण प्रांतांत च सह्याद्रीच्या रानांतून शिरण्याचें कारण असें कीं उत्तरकोंकणची राजधानी जें ठाणें शहर तेथें शिलाहारांचें ऐश्वर्यानें जरी नव्हे तरी वास्तव्यानें अस्तित्व होतें. उत्तरकोंकणस्थ शिलाहारांत प्रतापानें प्रखर असा कोणी हि पुरुष यद्यपि त्या कालीं नव्हता, तत्रापि शिलाहारवंशांतील अपरादित्य, यशवंतराव वगैरे कित्येक राजन्यक ठाणेप्रांतांत व शहरांत रहात असत. करतां, त्यांच्याशीं त्यांच्या मुख्य शहरांत जाऊन टक्कर घेण्या पेक्षां, उत्तरे कडील दमण प्रांतांत भोकं पाडून, तेथून रागरंग पाहून उत्तरकोंकणचें राज्य आक्रमण करण्याचा सोपा मार्ग प्रताप बिंबानें स्वीकारिला, खुद्द ठाणें शहरा वर हल्ला केला असतां, परमप्रतापी जो क-हाडचा विजयादित्य शिलाहार त्याच्याशीं प्रसंग पडेल व प्रथमप्रासीं च मक्षिकापात घडेल, या भीतीनें प्रताप बिंबानें दूरच्या दमण महाला वर चाल केली. दमणास त्या काळीं काळोजी सीरण्या नामें करून कोणी पुंड राजा म्हणून मिरवत होता. ठाणेकर शिलाहारांच्या पडत्या काळांत ठिकठिकाणचे जे अनेक नाइकवडे स्वतंत्र बनले त्यांपैकीं काळोजी सीरण्या हा दमण प्रांतांत राजा बनला होता. तो प्रताप बिंबास दर्शनमात्रें च शरण आला. तेणें करून दमण पासून चिखली पर्यंतचा प्रांत प्रताप बिंबाच्या हवाली झाला. दमण शहर व प्रांत स्वभावतः च बहुत रम्य आणि तेथील समुद्रतीर तर केवल नयनमनोहर ! तें रम्य स्थळ काळोजी सीरण्याच्या रानटी धबडग्या खालीं उद्धस्त व वैराण होऊन गेलें होतें. त्या स्थळाची ऊर्जा करण्या करितां तेथें प्रताप बिंबानें कायस्थ हरबाजी, कुळकरणी अधिकारी ठेविला. तेथून चाल करीत तारापुरा वरून प्रताप बिंब महिकावतीस ऊर्फ माहिमास प्रविष्ट झाला. माहिमास त्या काळीं विनाजी घोडेल राज्य करीत होता. केवळ आगमनें करून त्या घोडेलाला प्रताप बिंबानें दूर केलें आणि कांहीं काल माहिमास राहून देशाची स्थिती अवलोकन केली. सर्व देश वैराण व उद्धस्त झालेला दिसला. घोडेल वगैरे अतिशूद्रांच्या हातांत राज्ययंत्र जाऊन, ढुंगणाला वस्त्र देखील नाहीं अश्या नीच लोकांच्या कचाटींत रम्य समुद्रतीर सांपडलेलें आढळलें. शिलाहारां सारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या अंमलांत सुपीकतेचें बाळसें जें देशाला चढलें होतें तें पार ओसरून जाऊन, देश पावरी, घोडेल, कोळी व ठाकरे वगैरे वन्य लोकांच्या बदअंमला खालीं पोरक्या पोरा प्रमाणें अन्नान्न दशे प्रत पोहोचलेला दिसला.