Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

निरूपणाच्या भरांत शक १०६० पासून शक १३७० पर्यंतच्या ३१० वर्षांत राजकीय घडामोडी बरोबर सामाजिक पडझड काय व कोणती झाली तें सांगितलें. बिंब राजे उत्तम, अमदाबादेचे मुसुलमान पातशाहा अधम किंवा पोर्तुगीज लुच्चे, हा राजकीय इतिहास निवेदन करण्याचा केशवाचार्याचा मुळीं च कटाक्ष नव्हता. भगवान् दत्त व केशवाचार्य ह्यांची दृष्टि ही अशी सामाजिक व धार्मिक असल्या कारणानें, राजकीय इतिहासकथेंत फेरबद्दल, अफरातफर, आवडनिवड किंवा वगळावगळ ह्या दोघांच्या हि हातून झाली नाहीं, बखरींच्या रचनेचा व संकलनाचा हा असा प्रकार असल्या मुळें, शक १०६० पासून शक १४२२ पर्यंतच्या कालांतील महिकावतीच्या राज्यांतील राजकीय ऐतिहासिक व्यक्तींच्या नांवांची लब्धि जितपत अकलुषित व्हावी तितपत होण्याची सोय आपणास सुदैवानें लाभली आहे. अमदाबादच्या पातशाहांच्या नांवांचे अपभ्रंश बखरींत आढळतात, परंतु ते कोणत्या मूळ नांवांचे अपभ्रंश आहेत किंवा निव्वळ कल्पित अहेत ते विशेष प्रयास न पडतां अंधुकपणें ओळखतां येतात. ह्या पलीकडे व्यक्तिनामांचा अपभ्रंश बखरींत फारसा आढळत नाहीं.

११. एणें प्रमाणें काल, स्थल व व्यक्ति एतत्संबंधक विश्वसनीयता निश्चित केल्या नंतर, बखरीच्या गद्यभागांत व्यक्तिकृत कार्यांचा जो तपशिल सांगितला आहे त्याचें संगतवार प्रदर्शन अर्वाचीन मराठी भाषेंत करण्याचा उपक्रम क्रमप्राप्त होतो. आनर्त देशांत म्हणजे सध्यांच्या पालणपुर संस्थानांत सरस्वतीनदीच्या काठीं अहिनल वाडपाटण ऊर्फ अणहिलवाडपाटण नावांचें शहर व प्रांत शक १०६० च्या सुमारास होता. संक्षेपतः पट्टण किंवा पाटण असें हि ह्या शहराला व प्रांताला म्हणत. तेथें सोळंकी नांवाचें राजे राज्य करीत. त्या प्रांतांतील चंपानीवर ऊर्फ चांपानेर पंच्यायशी महालांत बिंब ह्या आडनांवाचें एक क्षत्रिय कुल असे. सूर्यवंशी क्षत्रियांच्या ह्या बिबोपनामक कुळाचें गोत्र भारद्वाज व शाखा कात्यायनी असून, प्रवर पांच असत व कुळदेवता प्रभावती असे, पंचप्रवरांचीं नांवें बखरींत दिलेलीं नाहींत. ह्या बिंब आडनांवाच्या क्षत्रियांचा संबंध पैठण येथें राज्य करणा-या भौम आडनांवाच्या क्षत्रियांशीं होता. ह्या वरून उघड च झाले कीं बिंब आडनांवाचे चांपानेरचे क्षत्रिय भौम आडनांवाच्या पैठणच्या क्षत्रियां प्रमाणें च महाराष्ट्रिय ऊर्फ मराठे होते. पट्टणचें सोळंकी ऊर्फ चौलुक्य हें मराठा कुळ जेव्हां अणहिलपट्टणा वर स्वारी करून राज्य करूं लागलें तेव्हां त्या कुला बरोबर इतर जी अनेक मराठा कुळें पाटणप्रांतीं गेलीं त्यांत बिंबांचें हि एक मराठा कुल त्या प्रांतीं जाऊन चांपानेर पंच्यायशींत लहानसे संस्थानिक किंवा सरदार म्हणून प्रस्थापित झाले. शक १०६० त चांपानेर पंचायशींतील ह्या लहानश्या संस्थानांत गोवर्धन बिंब नामें करून संस्थानिक राज्य करीत होता. त्याचा धाकटा भाऊ जो प्रताप बिंब त्यानें दक्षिणे कडील उत्तरकोंकण प्रांतावर मोहिम करण्याची परवानगी गोवर्धन बिंबा जवळ शक १०६० च्या सुमारास मागितली. शक १०६० च्या सुमारास म्हणजे शक १०६० च्या आधीं पांच दहा वर्षे उत्तर कोंकणा वर स्वारी करण्याचा बूट चांपानेर येथें निघाला असावा. उत्तरकोंकणा वर स्वारी करण्याचें कारण असें कीं त्या कालीं तो प्रांत बहुतेक अराजक अश्या स्थितींत होता. त्या प्रांतीं उत्तरकोंकणीय शिलाहारांचें राज्य नांवाला देखील होते किंवा नव्हतें अशी स्थिती होती. वस्तुतः शक १०६० त किंवा शक १०६० च्या पूर्वी पंचवीस तीस वर्षे तेथें शिलाहारवंशीय कोणी संस्थानिक राज्य करीत असल्याचा शिलालेखांतून किंवा ताम्रपटांतून दाखला मिळत नाहीं. शक १०१६ त उत्तरकोंकणांत शिलाहारवंशीय अनंतपाल राज्य करीत होता. तदनंतर शक १०६५ त शिलाहारवंशीय मल्लिकार्जुन गादी वर येई तों पर्यंतच्या पन्नास वर्षांत उत्तरकोंकणांत राजकीय गडबड चाललेली होती. ही गडबड कोणत्या स्वरूपाची होती तें विशद करण्या करितां तद्युगीन पाऊणशें शंभर वर्षांचा गुजराथ व महाराष्ट्र या देशांतील राजांचा इतिहास विहंगमदृष्ट्या नजरे खालीं घालणें इष्ट आहे.