Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

७ च्या आकृतींतील गांठीचें टोंक मूळ जुनाट लेखांत लेखणीच्या फटका-यानें जर किंचित् ओळीच्या खालीं ओढलें गेलें, तर साताचा आंकडा पांचा सारखा दिसण्याचा संभव आहे. माघशुद्ध पंचमीस शनिवार आहे. शनिवाराला सौरीवासर असें हि दुसरें नांव असे. सौरीवासरे हें जुनाट नांव परिचयाचें नसल्या मुळें व सौरीवासरे ह्या शब्दांतील सौ व री हीं अक्षरें पुसट झाल्या मुळें, परिचयाचा सोमवासरे हा शब्द नकलकारानें लिहिला असण्याचा संभव आहे. म्हणजे ही नोंद ‘‘शक १०६० माघशुद्ध ५ सौरीवासरे '' अशी, किंवा " १०६० माघशुद्ध ७ सोमवासरे " अशी, अश्या दोन त-हां पैकीं कोणत्या तरी एका त-हेनें मूळांत लिहिली. असली पाहिजे. पैकीं अमुक च त-हा मूळ टिपणांत स्वीकारिली होती हें निश्चयानें सांगण्यास साधन अहे. माघशुद्ध षष्ठी किंवा चतुर्थी किंवा अष्टमी म्हणजे ४, ६ किंवा ८ हे आंकडे मूळांत नव्हते, एवढें निश्चयानें सांगतां येतें. कारण, मोहिमेस मुहर्ता वर निघाल्याचा खुलासा नोंदींत केला आहे. माघशुद्ध पंचमी म्हणजे सर्व प्रसिद्ध वसंतपंचमी आणि माघ शुद्ध सप्तमी म्हणजे तितकी च सर्वप्रसिद्ध रथसप्तमी, माघशुद्ध चतुर्थीस, षष्ठीस किंवा अष्टमीस असा कोणता हि सुमुहूर्त नसल्या मुळें, वसंतपंचमी व रथसप्तमी ह्या दोन तिथींचे ५ व ७ हे दोन आंकडे शिल्लक रहातात. तसें च शनिवारा पेक्षां सोमवार हा दिवस गमनास सरस धरिला तर ७ च्या आंकड्यास प्राधान्य द्यावें लागतें; आणि मूळ जुनाट लेखांत " माघ शुद्ध ७ सोमवासरे " अशी अक्षरें होतीं असा निश्चय करण्या कडे प्रवृत्ति होत्ये. तात्पर्य, ह्या हि नोंदींतील तीथ व वार विश्वासपात्र आहेत. येणें प्रमाणें बखरींतील वर्ष, महिना, पक्ष, तीथ व वार असा सर्व तपशील मुळचा बराबर आहे. नक्कलकारानें आंकड्यांच्या व अक्षरांच्या वाचण्याच्या चुक्या केलेल्या आहेत. परंतु त्या बखरींची परीक्षा करण्याची संवय झालेल्या कोणा हि अभ्यासकास सहजासहजीं शुद्ध करून घेतां येण्या सारख्या आहेत.

८. बखरकारानें, अथवा खरें म्हटलें म्हणजे, प्रकरणकारांनी शक ४३९ पासून शक १७४१ पर्यंतच्या ह्या सत्तावीस मित्त्या आणिल्या कोठून ? शक १७४१ हा नकलेचा आंकडा गाळला, तर बाकीच्या सव्वीस मित्त्या बखरकारांनी किंवा प्रकरणकारांनीं आणिल्या कोठून, हें पहाणें जरूर आहे. संवत् १५३५ व संवत् १५०५ हे आंकडे सहाव्या व दुस-या प्रकरणांच्या समाप्तीचे लेखकांनीं स्वतः दिलेले असल्या मुळें त्यांच्या उगमा संबंधाचा प्रश्न च रहात नाहीं. बाकीच्या तेवीस मित्त्या प्रकरणकारांनीं आपल्या जवळ असलेल्या जुन्या टिपणांतून घेतल्या असल्या पाहिजेत. म्हणजे केशवाचार्यादि लेखकां जवळ जुनीं टिपणें होतीं असें झालें. संवत् ५७४ ऊर्फ शक ४३९ शकांतील नोंदीचें टिपण जवळ असणें म्हणजे प्रकरणकारा जवळ त्याच्या पूर्वीच्या एक हजार वर्षांचे जुनें टिपण होतें, असें कबूल करणें भाग पडतें. प्रकरणकार नुसते वर्षांचे आंकडे च तेवढे देऊन गप्प बसत नाहीं, तर तीथ, वार व महिना हि देतो. त्या वरून म्हणावें लागतें कीं प्रकरणकारां जवळ काळाचा बारीक तपशील देणारीं राजकीय बाबीचीं टिपणें होतीं. बिंबानें वर्षे ९ मास १ व दिन १४ राज्य केलें आणि प्रतापशानें वर्षे २८ मास ३ राज्य केलें, ह्या अर्थाच्या दोन नोंदी वरून तर असें दिसतें कीं प्रकरणकारां जवळ तत्प्रांतस्थ राजांचीं व राजवटींचीं तपशीलवार टिपणें होतीं. अशी तपशीलवार टिपणें ठेवण्याचा प्रघात भारतवर्षांत फार पुरातन आहे. कित्येक पुराणांतून कित्येक राजांच्या राजवटींचीं वर्षे महिने व दिवस दिलेले सर्वांच्या ओळखीचे आहेत. कित्येक पुराणांतून अमूक राजानें एक हजार वर्षे, अमुक राजानें दोनशें वर्षे, अमुक राजानें पांच हजार वर्षे राज्य केलें, अशी टिपणें सांपडतात. तेथें वर्ष म्हणजे दिवस असा अर्थ घेणें सयुक्तिक दिसतें. हजार दिवस म्हणजे सुमारें आपलीं सध्यांचीं अडीच तीन वर्षे होतात व वीस हजार दिवस म्हणजे आपली सध्यांचीं पन्नास साठ वर्षे होतात. साठ साठ वर्षे म्हणजे वीस-पंचवीस हजार दिवस राज्य करणारे राजे वर्तमान काली हि होऊन गेलेले आहेत, तेव्हां वीस पंचवीस हजार दिवसांच्या ऊर्फ पौराणिक वर्षांच्या आंकड्यानें भांबावून जाण्याचें कारण नाहीं. एखादा राजा शंभर वर्षे जगल्यास व त्यानें गर्भस्थ असल्या पासून राज्य केलें असल्यास त्यानें छत्तीस हजार वर्षे राज्य केलें असें पुराणांनीं म्हटले असतां तें ही विश्वासार्ह होईल. परंतु, पुराणें जेव्हां अमुक राजाने शत कोटी वर्षे ऊर्फ दिवस राज्य केलें, अश्या सारखीं विधानें करतात, तेव्हां त्यांच्या वरील विश्वास सहज व डळमळतो. असलीं विश्वासानर्ह विधानें प्रस्तुत बखरींत नाहींत. कालसंबंधक सर्व विधानें ह्या बखरीच्या गद्य भागांत मानवी आटोंक्यांतली असून, त्यांत अतिशयोक्तीची किंवा अद्भुताचा लवलेश हि नाहीं. कालाच्या तपशिला संबंधानें प्रस्तुत बखर बहुतेक पूर्णपणें विश्वसनीय समजावी.