दत्ताजी राजे खंडागळेचे हत्तीस्तव विठोजी राजाचे लेंक संभाजी राजाकडून दैवगतीत पावले ह्मणावेंयाचे वर्तमान कळून, तसेच या संभाजी राजे खेलोजीराजावरी, युत्धास आले. । तेव्हां शाहजी राजानीं, यादव राजे अपले सासरे जाहले तरहीं आपले चूलत भाऊ संभाजीराजे व खेलोजी राजे या उभयतांवरी युत्धास आले कां, म्हणून, त्या युत्धास आपण पुढें होऊन युत्ध केले । तेव्हां सासरा यादवरायाचा हात चालून शाहजी राज मुर्च्छागत जाहले । तेव्हां यादवराजानी, आपले जावाई शाहजी राजे मूर्च्छागत जाहले त्यावरी हात करिनासें, त्यांच्या सैन्यावरी युत्धास प्रवर्तले । त्या युत्धांत विठोजी राजाचे लेंक संभाजी राजे, याद वराजाकडून, रणास आले । सवेंच शाहजी राजेहीं मुर्च्छेतून सावध होऊन युत्धास प्रवर्तते समई हे वर्तमान येकंदर निजामशाहा बादशहास कळून यादवराजास पुत्रशोक जाहल्या करितां पराक्रम असेल त्या समंई युत्ध कामा नये, म्हणून राहतें करून, त्यां त्यांस त्यांचे स्थलास निरोप दिल्हे । यादवराजें स्वस्थळास जाऊन विमनस्क होऊन होते ।

येणेंप्रमाणें यादव राजे विमनस्क आहेत ह्मणावयाचे हीं, विमनस्क होण्यास कारण हीं, विजयदुर्गाचें राज्य करणार अल्लीयदलशाहास कळून, त्या अल्लायदलशाहानी योजना केली जे–देवदुर्गाचे निजामशाहा पादशहास अह्मास विरोध पडून येक दोनिदा युत्धारंभ केल्यांत, सेनेसहीत आपण मग्न जाहले, त्यास कारण, मुख्य शाहजी राजे व यादव राजे प्रभृति शूर निजामशाहा पादशहाकडे मिळून आहेत करितां, त्यां पैकीं यादव राजा महाशूर तो प्रस्तूत विमनस्क जाहला आहे, करितां त्याला संविधान करून आपलें करून घेऊन, निजामशाहासी युत्धास आरंभ करून जयप्रद व्हावें म्हणून, दृढ योजना करून, यादव राजासी संविधान करून भेटी गोष्टी जाहल्यांत, यादव राजानी सांगीतलें जे, केवळ तुमच्या आमच्या सैन्येकडूनच निजामशाहा जिंतिला जाईना, कां ह्मणिजे त्यांकडें शाहजी राजे प्रभृति कित्तेक प्रख्यात शूर आहेत,