प्रस्तावना

१४. ऐतिहासिक प्रमाणपद्धतीनें साधनांच्या सत्यासत्यतेची छान करतांना कालसंकलनासंबंधानें मोडकांची जंत्री व Dixit and Sewell यांचें Indian Calendar संशोधकाला फार उपयोगी पडेल. मोडकांच्या जंत्रींत दिलेल्या तिथि आणि वार कोठें कोठें एकेक दिवसाच्या अंतराने चुकलेल्या आहेत. परंतु सर्वसाधारण दृष्टीनें शक १६५१ पासून शक १८०० पर्यंतच्या सर्व तिथी आणि वार या संदर्भग्रंथांत दिलेल्या आहेत. शक १३०० पासून शक १६५१ पर्यंतच्या तिथी, वार व तारखा ज्यांत दिलेल्या आहेत, असा एक संदर्भग्रंथ अद्याप तयार होणें आहे. ह्या कालसंदर्भग्रंथाच्या सहाय्याने साधनांचा कालानुक्रमिक वर्ग केला म्हणजे साधनें प्रसिद्ध करण्याच्या स्थितीला यावयाला आणखी एका संस्काराची जरूर आहे. तो संस्कार म्हणजे देशानुक्रमानें व प्रसंगानुक्रमानें साधनांचें वर्गीकरण. एकाच कालीं निरनिराळ्या प्रांतांतील निरनिराळ्या राज्यांत निरनिराळे प्रसंग घडत असतात. तेव्हां त्या त्या प्रांताला तीं तीं समकालीन साधनें लावून देणें सोईचें होतें. हें वर्गीकरण झालें, म्हणजे प्रसिध्यर्थ साधनें सिद्ध झालीं.

१५. मराठ्यांच्या इतिहासाचीं किवा महाराष्ट्राच्या इतिहासाचीं साधने संस्कृत, प्राकृत, फारसी, कानडी, गुजराथी, मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषांत सांपडतात. तेंव्हा या भाषा संशोधकाला अवगत असल्यास, त्याचें काम चागलेंच व्यापक होईल, हें उघड आहे. अन्यथा, जी लिपि कळत नाहीं त्या लिपींत लिहिलेल्या लेखांकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो. ह्याशिवाय आंकड्यांच्या व अक्षरांच्या काहीं गुप्त लिपींतही कांहीं पत्रे सांपडतात. त्यांचाही संशोधकानें साक्षेपानें संग्रह करावा. मानभाव लोक आपले गुह्यग्रंथ तर गुप्तलिपींतच सर्व लिहितात.

१६. संशोधकाला काय काय माहिती असावी, त्याची ठोकळ हकीकत येथपर्यंत दिली. आजपर्यंत आपल्या इतिहासाच्या कोणत्या साधनांचा कितपत शोध झालेला आहे व पुढें व्हावयाचा राहिला आहे, तें सांगतो. कीर्तने, साने, खरे, पारसनीस वगैरे शोधकांच्या श्रमानें शक १६५१ पासून शक १७२२ पर्यंतच्या ७१ वर्षांच्या राजकीय इतिहसाचीं अस्सल साधनें बरीच उपलब्ध झालेली आहेत. शक १७२२ पासून १७८० पर्यंतच्या अस्सल साधनांचा व शक १२०० पासून शक १६५१ पर्यंतच्या अस्सल साधनाचा अद्याप पत्ता बिलकुल लागलेला नाहीं. सर्व अंधेर आहे. १६५१ पासून १७२२ पर्यंतच्या साधनांतही मोठमोठीं खिंडारे आहेत. ह्या ७१ वर्षांतील मराठी भाषेंतील तेवढा राजकीय पत्रव्यवहार उपलब्ध झालेला आहे. परंतु तोही अपुराच आहे. अद्याप हैदराबाद, ग्वाल्हेर, बुंदेलखंड, राजपुताना, इंदूर, बडोदें, अयोध्या, श्रीरंगपट्टण, दिल्ली, नागपूर वगैरे संस्थानांतील राजकीय पत्रव्यवहार शोधावयाचा राहिलाच आहे. जो कांहीं थोडाबहुत शोध झाला आहे, त्याची व्याप्ति नाशिकापासून साता-यापर्यंतच्या प्रदेशाच्या पलीकडे गेलेली नाहीं. साता-यापासून नाशिकापर्यंतचा प्रांतही वरवरच ओरखडला आहे, त्याची कसून बारीक तपासणी झालेली नाहीं. इतिहाससाधनांचा शोध व्हावयाला लागून नुकती कोठें तीस वर्षे झाली; आणि शोधकांची संख्याही एका दोहोंहून जास्त कधींच नव्हती. तेव्हां सर्वच काम तांत्रिक व्हावें, यांत नवल नाहीं. ह्यावरून ऐतिहासिक शोधाची साक्षेप दृष्टीनें, फारच शोचनीय जरी नव्हे तरी अपूर्ण स्थिति आहे, हें तद्धितेच्छूंच्या ध्यानांत येईल. शक १२०० पासून १६५१ पर्यंतच्या राजकीय इतिहासाचीं अस्सल साधनें बिलकुल शोधिलीं गेलीं नसून, दुय्यम व तिय्यम प्रतीचीं साधनें-तवारिखी, तहनामे, वाके, वगैरे- फक्त फारसी भाषेंतून असलेलीं उपलब्ध आहेत. शक ५०० पासून शक १२०० पर्यंतचें एकही अस्सल पत्र उपलब्ध नाहीं. शक १२०० नंतरचीं मराठी व फारसी अस्सल पत्रे बारीक शोध केला असतां मिळतील असा अंदाज आहे.