Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

सबब, त्यानें शका बरोबर संवताचा हि आंकडा आपल्या लिखाणांत नमूद करून ठेविला. परराज्य आलें म्हणजे सरकारी दिवाणांतून, कचे-यांतून, शाळांतून, जाहिरनाम्यांतून, वतनपत्रांतून, व सर्वत्र परकीय कालगणना व तिचा वर्ष, महिना, पक्ष, दिवस घटिका व पळें वगैरे तपशील सुद्धां येथून तेथून परकीय होऊन जातो व राष्ट्रांतील शेंकडा साडेनव्याण्णव जे पोटभरु लोक त्यांच्या डोक्यांत तो परकीय तपशील दोन तीन पिढ्यांत बेमालूम भिनून जातो आणि स्वकीय कालगणनेचा तपशील दैवदुर्विलसितानें परकीय वाटूं लागतो. परकीय कालगणनेच्या विषानें भारून गेलेल्या लोकांस विषमुक्त करण्याची हांव धरणा-या केशवाचार्या सारख्या विद्वानास व नायकोरावा सारख्या क्षत्रियास हि ह्या पोटभरूंच्या पंक्तीस, मनांत नसतां, बसावें लागून, परकीय संवताचा प्रथम उच्चार करावयास लागला आणि नंतर स्वकीय शकाचा दुय्यम दर्जानें उल्लेख करण्यांत समाधान मानावें लागलें. कालगणना अशा या दोन त-हांनीं करणें भाग पडल्या मुळें, संवत्सराचें नांव नमूद करणें सहज च, अशक्य जरी नव्हे तरी, श्रमाचें बनून गेलें. शकवर्षाचे संवत्सरनाम निराळें आणि विक्रमसंवताचें संवत्सरनाम निराळें. अश्या द्वैधीभावांत संवत्सरनाम मुदलांत च वगळून टाकण्याचा मार्ग बखरकारांना स्वल्पिष्ट श्रमाचा दिसला. संवत्सरनामाची ही जशी अडचण आली तशी अडचण तपशिलाच्या इतर कोणत्या हि बाबी संबंधानें आली नाहीं. शकगणनेंत व संवत्सरगणनेंत पक्षगणनेच्या बाबींत किंचित् वांधा यावयाचा आणि तो वद्यपक्षा संबंधानें यावयाचा. शकवर्षाच्या वर्तमानमहिन्याचा जो वद्य व दुसरा पक्ष तो विक्रमसंवताच्या आगमिष्यमाण महिन्याचा प्रथम पक्ष असतो. करतां, संवत् व शक ह्यांच्या आंकड्या बरोबर जर महिना आणि वद्यपक्ष दिला असेल, तर तो महिना व पक्ष शालिवाहनशकाचा कीं विक्रमसंवताचा तें गणित केल्याशिवाय ओळखतां येणें सुलभ नाहीं. प्रस्तुत बखरींत शालिवाहनशक व विक्रमसंवत् ह्यांचे आंकडे दिले असून, हा महिन्याचा वांधा अनुभवगोचर झाला नाहीं. त्याचें कारण असें आहे कीं, प्रस्तुत बखरींतील कालगणनेच्या तपशिलांत कर्मधर्मसंयोगानें वद्यपक्षांतील तीथ एक सुद्धां आलेली नाहीं. आली असती तर संशोधकदृष्टीनें बरें होते; मित्त्या तपासून घेण्याला वर्षांक, महिना, तीथ व वार या चार बाबींच्या जोडीला आणीक एक पांचवी बाब जास्त मिळाली असती व तपासणीची उतरणी जास्त सूक्ष्म झाली असती. शालिवाहनशक व विक्रमसंवत् ह्या दोन कालगणने प्रमाणें इसवीसनाचा --ज्याला बखरकार फिरंगी शक म्हणतो--हि उद्धार प्रस्तुत बखरींत, तत्कालीं त्या प्रांतांत फिरंग्यांचा अंमल असल्या मुळें, झाला आहे. शालिवाहनशक, विक्रमसंवत् व इसवसिन ह्यांचा उल्लेख ज्या प्रमाणें त्या त्या अमलाला अनुलक्षून ह्या बखरींत झालेला सांपडतो, त्या प्रमाणें--सकृद्दर्शनी आश्चर्याची गोष्ट वाटेल--मुसलमानी अंमल उत्तर कोकणांत तीन साडेतीन शें वर्षे चालल्या सारखा भासत असून हि हिजरीसनाचा किंवा फसलीचा आंकडा ह्या बखरींत एकदा देखील दिलेला नाहीं. हिजरीसन किंवा फसलीसन किंवा कोणता हि मुसलमानी सन न उद्धरण्याचीं कारणें चार संभवतात. एक कारण असें कीं उत्तर कोंकणांत मुसलमानी अंमल जितका स्थिर होऊन लोकांच्या संवयीचा व्हावा तितका कधीं च झाला नाहीं. दुसरें कारण असें कीं कोंकणच्या डोंगरी व रानवट झाडींतील रानटी प्रजेला मुसलमानी अंमलाचा स्पर्श बहुतेक न झाल्यासारखा होता. तिसरें कारण असें कीं केशवाचार्य, नायकोराव वगैरे मंडळीस म्लेच्छार्णवाचा मना पासून द्वेष वाटत होता. आणि चवथें व शेवटचें कारण असें कीं शक १४२२ च्या पश्चात् पोर्तुगीजांच्या हालचालीं पुढें मुसलमानांचें तेज ह्या प्रांतांत फारसें टिकलें नाहीं. अश्या ह्या चार कारणांचा समवाय होऊन, मुसलमानांच्या कालगणने कडे केशवाचार्यादि मंडळीनें अगदीं च दुर्लक्ष्य केलें. उत्तरकोंकणांत गांवगन्ना जर हिजरीसनाची किंवा फसलीची ओळख वरघाटच्या देशांतल्या प्रमाणें दाट असती, तर हे बखरकार हिजरीसनानें किंवा फसलीसनानें वाचकांचे कालज्ञान सवकारित्या वांचून सहसा रहाते ना, तेव्हां हें च खरें कीं मुसलमानी अमलाची पक्की मगरमिठी उत्तरकोंकणांतील झाडीला व रानांना जशी बसावी तशी बसली नव्हती. तशांत केशवाचार्यांदिकांचा म्लेच्छद्वेष तर अत्यन्त जाल्वल्य. सबब, प्रस्तुत बखरींत मुसलमानी कालगणनेचा उल्लेख हि नसावा हें युक्त च आहे.