Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

५. वसईच्या वालजी पाटलानें प्रस्तुत बखर ज्या मूळा वरून केली तें मूळ स्वतः दुस-या एका नकलेची नक्कल होतें असें म्हणण्यास प्रमाण आहे. तिस-या पृष्टांतील एकविसाव्या ओवीचा तिसरा चरण व एकाण्णवाच्या पृष्टांतील दहाव्या ओळींतील व एक्यायशीव्या पृष्टांतील सव्विसाव्या ओळींतील गाळलेला मजकूर वालजी पाटलानें ज्या नकले वरून आपली नक्कल उतरली त्या नकलेंत नव्हता, म्हणजे वालजी पाटला पुढें मूळ ग्रंथ नव्हता, नक्कल होती व ती नक्कल अपूर्ण होती. अपूर्ण नक्कले वरून अपर्ण नक्कल उतरल्यास, त्याचा दोष नकलकारा कडे येत नाहीं. परंतु मूळांतलि अक्षरें किंवा आंकडे नकलकारानें हलगर्जीपणानें किंवा अज्ञानानें वगळल्यास किंवा विपर्यस्त केल्यास किंवा निराळे व वाचल्यास, दोषाचा शिक्का त्याच्या कपाळा वर मारणें सर्वस्वीं वाजवी ठरतें. असें दोष वालजी पाटलाच्या नकलेंत खालील स्थलीं झालेले आढळतातः

पृष्ट ओळ अशुद्ध शुद्ध
३४    वरून ३ ११२५ ११९५
४१    वरून १४ १२२८ १२९८
६६    खालून ६ ११३५ ११९५
७०   खालून १० ११२५  ११९५
१०६   वरून १५ ११२५  ११९५

११९५ बद्दल ११२५, १२९८ बद्दल १२२८ व ११९५ बद्दल ११३५, अशीं अशुद्धें वालजी पाटलाच्या नकलेंत असलेलीं आढळतात. मूळ शक १३७० तील व १४६० तील लिखाणांत ११९५ व १२९८ असें आंकडे होते. ते वालजी पाटलानें ज्या नकले वरून आपली नकल उतरली त्या नकलेच्या लेखकानें ११२५ व १२२८ असे वाचले. असे अशुद्ध कां वाचले तर त्या लेखकाला शक १३७० तील व १४६० तील मूळच्या लेखांतील नवाचा जुना आंकडा अर्वाचीन दोहोंच्या आंकड्या सारखा भासला. शक १३७० त व शक १४६० त नवाचा आंकडा महाराष्ट्रदेशांत २ सारखा काढीत व शक १६०० नंतर किंवा सुमारास ९ असा काढीत. म्हणजे अर्वाचीन ९ नवाच्या आंकड्याचे प्रारंभींचें जें गोंडगोळें संपूर्ण चोहों कडून कडबाच्या आकाराचें वांटोळे आहे तें शक १३७० त डाव्या बाजूस किंचित् तुटलेलें म्हणजे २ सारखें दाखवीत. नवाचा हा जुना आंकडा शक १६०० च्या सुमारच्या नकलकारास ओळखतां येत नाहींसा झाला होता. त्या मुळें ११९५ व १२९८ हे जुने आंकडे त्यानें ११२५ व १२२८ असे नव्या त-हेचे वाचले आणि हे चुकलेले आंकडे त्या नकलेंतून वालजी पाटलानें आपल्या नकलेंत शोध न करतां जसे चे तसे उतरून घेतले. वालजी पाटलानें जर एखाद्या जंत्री कडे पाहिलें असतें, तर शक १०६० ला संवत् ११९५ येतो, संवत् ११२५ येत नाहीं, हें त्याच्या तेव्हां च लक्ष्यांत येतें. परंतु, हा लहानसा शोध वालजीनें केला नाहीं. कारण ११२५ वाचण्यांत चूक होत आहे, असा संशय च मुळीं त्याला आला नाहीं. “स्वस्ति श्रीनृपविक्रमार्कसमयांति-संवत् ११२५ तत् राजिंद्रचक्रचूडामणौ शालिवानशके १०६० " असें वाक्य त्याच्या पुढें होतें.