Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

ही तीन वचनांची तीन रूपे होत. यांच्या रूपह्नसिद्धीत स् हा एक संख्यावाचक उपसर्ग मूळशब्दाच्या मागे लागत असल्यामुळे, तिन्ही रूपे म्कारान्त दिसतात. देव शब्दाच्या रूपाप्रमाणे ह्कारान्त, औकारान्त किंवा अ:कारान्त दिसत नाहीत. तिन्ही मकारान्त रूपे पाहून पाणिनी संकटात पडला. वस्तुत: हलन्त शब्दांच्या शिरस्त्याप्रमाणे अस्मद् शब्दाची अस्मत् द्, अस्मदौ, अस्मद: अशी रूपे व्हावीत. परंतु ती तशी न होता, लोकांच्या बोलण्यात व वेदभाषेत अहम्, आवाम् व वयम् अशी तिन्ही मकारान्त रूपे पाहून पाणिनीला आदेशाचा आश्रय करून, अस्मत् पासून ही तिन्ही रूपे हटाने काढावी लागली. उपसर्गी भाषा असतात व प्रत्ययी भाषा असतात या बाबीचे स्वप्नही पाणिनीला नव्हते. त्यामुळे प्रत्ययांना आदेश, अंगाला नाना आदेश व अंत्याला आदेश करून, कशीतरी अहम्, आवाम्, वयम् ही रूपे पाणिनीने अस्मद् शब्दापासून निर्माण केली. मूळशब्द अस्मद् नव्हे, हम् आहे, हेही त्याला माहीत नव्हते. समासांत अस्मद् रूप येते, सबब अस्मद् हे प्रातिपदिक त्याने स्वीकारले. परंतु समासांत अस्मद् हे अनेकवचनी येते, एकवचनी येत नाही, हा जो या अस्मद् शब्दाचा विशेष त्याकडे जितके लक्ष द्यावे तितके त्याने दिले नाही. समासात एकवचनी मद् हे रूप येते हे तो पहात होता. मग, मद् हेच प्रातिपदिक धरण्यास काय हरकत होती? किंवा मद् व अस्मद् ही दोन्ही प्रातिपदिके धरण्यास कोणती अडचण होती? शिवाय, पाणिनीने असा विचार करावयाचा होता की, समासात एकवचनी मद् व अनेकवचनी अस्मद् प्रातिपदिक येते. तसे द्विवचनाचे आवद् प्रातिपदिक का म्हणून येत नाही? द्विवचनाला काय म्हणून गाळले? तसेच, अस्मद् हे प्रातिपदिक धरून त्यापासून अहम् आवाम्. वयम्, मद् इत्यादी रूपे आदेश करून जशी काढता येतात, तशीच मद् हे प्रातिपदिक धरून त्यापासून अस्मद्, अहम्, इत्यादी रूपेही आदेश करून काढता येतील. तात्पर्य मूळ शब्द काय आहे, त्याची रूपे वैदिकभाषेत कशी आली, पूर्ववैदिकभाषात
मूळ शब्द कसा चाले, इत्यादी बाबीचे ज्ञान नसल्यामुळे, उत्तम पुरुषसर्वनामाच्या रूपसिद्धी संबंधाने पाणिनीची लंगडशाई पराकाष्ठेची झालेली आहे.