Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६५ क्रियापदरूपांच्या वरील पृथक्करणावरून स्पष्ट होते की, उघड्या नागड्या क्रियाशब्दापुढे दर्शक सर्वनामे व पुरुषसर्वनामे योजून प्राथमिक ऋषिपूर्वज वाक्ये बोलत असत. क्रियेचा एक कर्ता दाखवावयाचा असल्यास एक मुख्य सर्वनाम व दोन, तीन, चार किंवा पाच कर्ते दाखवावयाचे असल्यास दोन, तीन, चार किंवा पाच सर्वनामे ते लोक क्रियाशब्दापुढे योजीत. कर्ता जवळचा प्रत्यक्ष खास स्वत: हजर आहे हे दर्शविण्याकरता कर्तृवाचक सर्वनामाला जवळ हा अर्थ दर्शविणारी सर्वनामे विशेषणे म्हणून मुख्य सर्वनामाला जोडीत. कालांतराने बहुत्ववाचक अन् व त्रित्ववाचक रिर, इर व र् ही सर्वनामे त्रिवचन व बहुवचन दर्शविण्याकरता क्रियाशब्दापुढे हे लोक लावू लागले. क्रियाशब्दापुढे उत्तमपुरुषी अ, ह्म, इ, उ, अस् किंवा अह्, हन्, स, स्म् ही सर्वनामे, मध्यमपुरुषी त्व, त्, स्, तह्, अत्, अम्, उ, अन् ही सर्वनामे व प्रथमपुरुषी अ, इ, उ, त्, अत्, अस्, उस्, अन्, अम् ही सर्वनामे येत. म्हणजे एकंदर स्म्, ह्म, अह्, त्व्, तह्, त्, स्, अ, इ, उ, अत्, अस्, उस्, अन्, (अ+न्) अम् (अ+म्), रिर्, इर्, र् इतकी सर्वनामे प्राथमिक आर्यपूर्वज क्रियाशब्दांच्यापुढे योजीत व प्राय: एक, दोन, तीन क्कचित् चार किंवा पाच कर्ते क्रियेचे आहेत हे दर्शवीत. तात्पर्य, क्रियाशब्दांना सर्वनामे जोडून वचने बनतात.