Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

६४ तर मग प्रश्न असा येतो की पाणिनी ज्यांना सार्वधातुक व आर्धधातुक म्हणतो त्यांच्यांत जर धातूंची निर्भेळ साधी अंगे अपवादादाखल केवळ तुरळक सापडतात, तर ती साधी निर्भेळ अंगें मुबलक कोठे सापडतील? ती साधी व निर्भेळ अंगे कोणत्या पूर्ववैदिक भाषेत कधी प्रचलित होती? ती प्रचलित होती याला पुरावा व गमक काही आहे की नाही? धातूंच्या साध्या निर्भेळ अंगांना काडीचाही विकार न होता, प्रत्यक्ष किंवा परोक्ष सर्वनामे लागून निर्माण झालेलीं रूपे कोठे सापडतील? अशी रूपे पाणिनीय संस्कृत भाषेत राहिली तरी आहेत काय? इत्यादी एकच अर्थाचे अनेक प्रश्न संशोधकापुढे उभे राहतात व समर्पक उत्तरांची वाट पहातात. या प्रश्नांना उत्तर असे की मूळ धातूला गुण, वृद्धी, प्रारंभी मध्ये किंवा अंती कोणताही आगम न होता किंवा आदेश न होता, परोक्ष किंवा प्रत्यक्ष सर्वनामे लागल्याची उदाहरणे पाणिनीय सूत्रात काही आहेत. अमुक धातूला अमुक होते असे सांगताना पाणिनी धातूंचा निर्देश चार पाच प्रकारांनी करतो. ब्रुवो वचि:, रुळ: प: भियो षुक् या सूत्रात ब्रू, रुह् व मी हे धातू जसेच्या तसे नामे म्हणून षष्ठयन्त चालविले आहेत. धातूंची निर्देश करण्याचा हा एक प्रकार इकागाम करून रञ्जि, शदि, रभि, गमि असा धातूचा निर्देश, करण्याचा दुसरा प्रकार ह्न आणि लट्च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनाने धातूचा निर्देश करण्याचा तिसरा प्रकार, जसे तनोते विंभाषा, तिष्ठते रित् या तिसऱ्या प्रकारात तीन तऱ्हा आहेत. एक तऱ्हेत तनोति, तिष्ठत्ति अशी पाणिनीय भाषेत चालू असलेली सविकरण रूपे येतात. दुसऱ्या तऱ्हेत सर्ति, अर्ति अशी गुणीभूत यङ्लुक्ची जुनाट रूपे येतात आणि तिसऱ्या तऱ्हेत कोणताही विकार न होता लट्च्या प्रथमपुरुषाच्या एकवचनाचा ति प्रत्यय मूळ धातूला लावून धातूचा हंति, अस्ति, ऋति, कृति, सृति, भूति, सूति, वक्ति, रव्याति, अत्ति असा निर्देश केलेला आढळतो. पैकीं तनोति तिष्ठति व सर्ति अर्ति; ही रूपे शदि रमि गमि व अस्ति कृति वक्ति या रूपांहून अर्वाचीन कारण विकृत आहेत. तेव्हा सर्वात जुनी व साधी ऊर्फ अविकृत रूपे म्हटली म्हणजे १) शदि रमि गमि आणि २) अस्ति कृति वक्ति ही होत. अस्ति कृति वक्ति यामधील ति हे सर्वनाम सर्वप्रसिद्ध आहे. शदि, रमि, गमि यामधील इ हे सर्वनाम इतके प्रसिद्ध नाही, कारण ते अतिजुनाट आहे. ति व इ ही सर्वनामे जुनाट काळी कोणत्याही धातूला लागत. जसे वक्ति रूप होई, तसेच वचि हेही रूप होई, गमि गंति, रमि रंति, शकि शक्ति, दृशि दृष्टि, अशी दोन्ही प्रकारची रूपे होत.