Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६२ येणेप्रमाणे सार्वधातुकांतील दाही वर्गातील धातूंचे परीक्षण झाले. त्यात आपल्याला असे कळून आले की अदादिवर्गातील काही थोडे धातू व भ्वादिवर्गातील तुरळक धातू व तुदादिवर्गातील काही थोडे धातू वगळले असता, बाकी पाणिनीय धातुपाठातील एकोनएक धातू सार्वधातुकात चालण्यात साधे नाहीत. पूर्ववैदिक सनन्त, यङ्, यङ्लुक् किंवा नामधातू यांचे संक्षेप आहेत. हे संक्षेप व अपभ्रंश पाणिनीला ओळखता न आल्याकारणाने, जेथे जेथे चमत्कारिक व वां डी रूपे भेटली, तेथे तेथे असा वाकडेपणा होतो हे तो नमूद करून समाधान मानतो. ब्रू धातू ब्रूमि, ब्रूव: ब्रू : असा पाणिनीय संस्कृतात न चालता ब्रवीमि,
ब्रूव: ब्रू : असा चाललेला पाहून, पाणिनी एवढेच सांगतो की अपवाद म्हणून ब्रू चे ब्रवीमि असे रूप होते. ब्रवीमि हा पूर्ववैदिक बोब्रवीमिचा संक्षेप आहे व ब्रूव: हा बुब्रूव: चा संक्षेप आहे आणि दोन भाषांतील रूपे एकत्र मिसळून ब्रवीमि, ब्रूव: ही रूपे संमिश्र संकृत भाषेत आली आहेत, हा तपशील त्याला बिलकूल माहीत नाही. भ्वादि, दिवादि, तुदादि, चुरादि, स्वादि, तनादि, रुधादि व क्रयादि गणातील न आगमा संबंधाने पाणिनीचे अज्ञान पराकाष्ठेचे आहे. भू धातू, भूमि, भूव: भूति असा न चालता भवामि, भवाव: भवति असा चाललेला पाहून पाणिनी सांगतो की भू तील उ ला गुणादेश होतो, अ विकरण लागते व दीर्घ होतो. त्याला हे माहित नाही की पूर्ववैदिकभाषेत यङ्लुक् चे बोभो असे अंग होते, त्यापुढे आमि हे सर्वनाम येऊन संधी बोभवामि होतो व आद्य बो चा लोप होऊन भवामि हे रूप रहाते. शिवाय, आमि प्रत्यय न लागता, नुसता मि प्रत्यय लागला तर बोभोमि रूप होऊन त्याचा संक्षेप भोमि असा होत असे. एकंदरीत वैदिक व पूर्ववैदिक भाषांचा अभ्यास पाणिनीचा जितका सूक्ष्म व व्यवस्थित असावयास हवा होता तितका नाही.