Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६३ आता आर्धधातुकात साध्या धातूंची काय हालहवाल आहे तो शोधू आर्धधातुकांपैकी तनादि व चुरादि धातूंच्या उगमाचा विचार वर झालाच आहे. तसेच, कर्मणि व प्रयोजक धातूंरूपांचाही विचार प्रत्येकी दिवादि व चुरादि धातूंच्या विवेचनाबरोबर झाल्यासारखाच आहे. दिवादि धातूं परस्मैपदी आहेत व कर्मणि धातू आत्मनेपदी आहेत इतकाच फरक; बाकी दोहोंचाही गम यङ् आहे. चुरादि धातू म्हणजेच प्रयोजक धातू, प्रयोजकात व चुरादिकात भेद एवढाच की हेतुत्वाची कल्पना प्रयोजक धातूंत जागरूक असते आणि चुरादिक धातूंत अतिपरिचयाने अस्तास गेलेली असून फक्त मूळ स्वार्थ तेवढा शिल्लक रहातो. आर्धधातुकांपैकी लिटाची रूपे अभ्यस्त असल्यामुळे साधेपणाचे ढोंगही त्यांना करता येण्याची सोय नाही. सन्नन्त अभ्यस्त जोडधातू आहे. आशीर्लिङ् व लिङ् बोलून चालून जोडधातू आहेत, तेव्हा साधेपणाच्या कामी त्यांचे नावही घेण्याचे कारण नाही. राहता राहिला लुङ् लुङाचे एकंदर ७ प्रकार पैकी ज्यांना लुङाचे चवथा, पांचवा व सातवा प्रकार म्हणतात ते तिन्ही वैदिक अथवा पूर्ववैदिक लेट्चे भूतकाल आहेत. येथे पूर्ववैदिक लेट् म्हणजे काय ते सांगितले पाहिजे. जसे णिच्, लिट्, सन् व यङ् किंवा यङ्लुक् हे स्वतंत्र अंगे तयार करून लट् व लङ् आणि शतृ व शानच् वगैरे प्रत्यय घेतात त्याप्रमाणेच पूर्ववैदिककाली लेट् म्हणून पाणिनी ज्या लकाराला म्हणतो तो लट्, लङ्, लोट्, लिङ् वगैरेंचे प्रत्यय घेत असे. म्हणजे साधे मूळ धातू आणि णिच्, लिट्,सन् व यङ् किंवा यङ्लुक या जोड किंवा अभ्यस्त धातूप्रमाणेच लेट् हे एक स्वतंत्र प्रकरण असे व त्याला लट्, लङ्, लिङ् इत्यादी प्रत्यय होत असत. पूर्ववैदिककाली लेट् चा असा प्रकार होता. पुढे वैदिककाल आला. त्यात लेट्चे राज्य थोडे अव्यवस्थित झाले व त्याचा प्रचार किंचित कमी कमी होत होत पाणिनीय संस्कृतांत लेट् अजिबात लुप्त किंवा बंद झाला. फक्त लुङ् मधील चवथ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या प्रकारात तेवढा लेट् राहिला. परंतु हा लेट् चा लङ् आहे हे पाणिन्यादि संस्कृत वैय्याकरणांना ओळखता सुद्धा येईना. ओळखता न येण्याची कारणे दोन असू शकतील; १) पाणिन्यादि वैय्याकरण मंद व मूढमति होते, किंवा २) पूर्ववैदिकभाषा व वैदिकभाषा यांच्यात व पाणिनीय भाषा यांच्यात इतका थोर काळ गेला असावा की कशाचे मूळ काय आहे हे सहजासहजी कळण्यास मार्ग राहिला नव्हता. हा दुसरा अभ्युपगम स्वीकार्य दिसतो. पूर्ववैदिककाल व पाणिनीयकाल यांच्यात कालाचे महदन्तर होते इतकेच नव्हे तर वैदिककाल व पाणिनीयकाल यांच्यातही दोन तीन हजार वर्षांचे अंतर असावे, असा तर्क करावा लागतो. पूर्ववैदिककाल व पाणिनीय काल यांच्यात तर पाच चार हजार वर्षाचे अंतर असावे, अस्त तर्क करणे अपरिहार्य होते. अन्यथा सबंध लेट् च्या लेट् स्मृतीतून व व्यवहारातून नाहीसा होण्यास नीट कारण देता येत नाही. काल कितीही लहान मोठा असो, इतके खरे की पाणिनीयकाली लेट् ह्न चा प्रघात भाषेतून गेला होता व लेट् ची जी काही रूपे पाणिनीय भाषेत राहिली होती ती लेट् ची आहेत हे कुशाग्रबुद्धीच्या पाणिनीसारख्या वैय्याकरणांनाही ओळखता येत नव्हते. पूर्ववैदिकभाषेतील लेट् ची काही अंगे येथे देतो, त्यापासून लङ् ची रूपे कशी साधतात ते दाखवितो आणि लेट्ं च्या लङ्ं ला पाणिनी लुङ् म्हणतो हेही स्पष्ट करतो :