Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

पाणिनीहून शहाणे म्हणविणारे वर्तमानकालीन जे आपण, पाणिनीहून निराळ्यादृष्टीने म्हणजे इतिहासदृष्टीने पहाणारे जे आपण व पाणिनीला मिळाली नव्हती ती साधने मिळविलेले जे आपण, त्या आपणाला तरी रानटी आर्यांचा मूळ धातू कोणता होता, भू होता की भव् होता, ते शोधिता येईल काय ? पाहू. आदौ एवढे लक्षात ठेविले पाहिजे की रानटी आर्यांना, बोलताना आपण अमुक धातूंची रूपे बोलत आहोत, ही कल्पना बहुश: बिलकुल नसावी. परंपरागत जी रूपे पुस्त दर पुस्त चालत आली ती ते व्यवहारात बोलत. रूपातील धातुत्वाची कल्पना व पृथक्कृती यांची उठाठेव ते प्राय: करीत नसावे. वडिलांचे भाषण वारंवार ऐकून, लहान अर्भके ज्याप्रमाणे वर्तमान, भूत व भविष्य रूपे क्रियापदांची बोलतात तीच गत रानटी आर्यांची असे. अशी जरी अर्भकांची व रानटी लोकांची सर्वसाधारण तऱ्हा असते, तत्रापि रानटी आर्यांतील एखाद्या कल्पक व्यक्तीने एखाद्या नव्या क्रियेला एखादा नवा शब्द सहज स्फूर्तीनें सादृश्यावरून निर्माण केला असेल तेव्हा त्या क्रिया शब्दाची वर्तमान, भूत, भविष्य इत्यादी कालीन रूपे इतर धातुरूपांच्या धर्तीवर बनवावी लागताना, धातूची पृथक्कल्पना ज्ञानत: जरी नव्हे तरी अज्ञानत: त्याच्या मनात येऊन जात असे यांत संशय नाही. याचा अर्थ असा की रानटी माणूस झाला तत्रापि धातूची जागृत जरी नव्हे तरी सुप्त कल्पना त्याच्या मनात असते. रानटी माणसाच्या मनातील ही धांतुत्वाची सुप्त कल्पना त्याच्या पश्चात हजारो वर्षांनी झालेल्या भाषा संशोधकांनी जाणावयाची कशी? रानटी मनुष्य आपल्या भाषेचा जर काही मागमूस ठेवील तरच रानटी मनुष्याच्या भाषेतील सुप्त कल्पना संशोधकाला गवसण्याचा संभव आहे. असा मागमूस रानटी आर्यांनी किंचित् ठेविलेला आहे. रानटी आर्यांचे वंशज जे वैदिक ऋषी त्यांची गाणी ज्यास ऋग्वेद म्हणतात ती आपणाला उपलब्ध आहेत व रानटी आर्यांचे वंशज जे वर्तमानकालीन आपण ब्राह्मणादी चातुर्वर्णिक लोक त्यांच्या प्राकृत भाषा सध्या प्रचलित आहेत. वेदभाषेत व आपल्या सध्याच्या प्राकृत भाषेत रानटी आर्यांच्या भाषांचे मागमूस राहिलेले आहेत. वेद भाषेत व पाणिनीय भाषेत बभूव, बोभोमि, बोभूति, बोभवीमि, बुभूषति, अबीभवत् अशी रूपे येतात. प्रत्यय व उपसर्ग काढून टाकले म्हणजे बभू, बुभू, बोभू, बोभो व बोभवी अशी पाच अंगे शिल्लक रहातात आणि एक बोभौ असे अंग अभ्यस्ताची वृद्धी होऊन होत असे मिळून सहा अंगे झाली. या सहातून मूळ धातू कोणता? भू, भो, भौ, का भवी? अत्यंत जुनाट जो प्रयोग असेल त्यात जे रूप येईल ते जुनाट धरण्यास हरकत नाही. पाणिनी बोभूति या रूपाचे निपातन करून असे दाखवितो की बोभोति या रूपाहून बोभूति हे रूप जुनाट व पाणिनीच्या मते आडनीड आहे. बोभूति या रूपात भू धातू आहे. सबब मूळधातु भू धरावा असे मत करून घेणे न्याय्य दिसते.