Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
५३ (१) साधे धातू स्पष्टीकरण : वर सांगितले की पूर्ववैदिक भाषात अशी एक भाषा होती की, तीत आदी अंती किंवा मधी काही एक विकार न होता धातूंना पुरुषवाचक सर्वनामे लागत. पाणिनीय धातुपाठात जो धातूसमूह संकलित केला आहे त्यापैकी काही धातू अविकारी किंवा अविकरण धातुवर्गात मूलत: पडतात. उदाहरणार्थ, अद् धातू घ्या. अद्मि, अद्व:, अद्म: अशी या धातूची अविकरण रूपे त्या भाषेत होत. शक् धातू त्या अविकरण भाषेत शक्मि, शक्षि, शक्ति असा चाले. पुढे पाणिनीय काळ आला. त्याकाळी शक् धातूची शक्नोमि, शक्नूव:, शक्नु : व शक्यांमि, शक्याव:, शक्याम: अशी रूपे बोलण्यात असलेली आढळली व शक्मि, शक्ति ही रूपे अस्तंगत होऊन गेली किंवा वेदभाषेत अवशिष्ट असलेली दिसली. वेदभाषेत अशकम्, हनति, दाति, अकरम्, मरति, अदरत्, अरुहत् ही रूपे असलेली पाहून व स्वकालीन भाषेत ती नाहीत ते पाहून बहुलं छंदसि असा पाडा पाणिनी जेथे तेथे वाचू लागला. एका पूर्ववैदिक भाषेत विकरणाशिवाय धातू चालत ही बाब पाणिनीच्या लक्षात आली नाही. साध्या धातूंच्या संबंधाने पाणिनीच्या लक्षात न आलेली ही पहिली बाब. पाणिनीच्या लक्षात न आलेली एतत्संबंधाने दुसरी बाब म्हणजे कित्येक तद्भव धातूंची गणना तो साध्या धातूंत करतो. उदाहरणार्थ, जुहोत्यादी वर्गातील सर्व धातू, दिवादिवर्गातील सर्व धातू, भ्वादिवर्गातील बहुतेक सर्व धातू , अदादिवर्गातील काही धातू, तुदादि वर्गातील काही धातू, स्वादिवर्गातील धातू, क्रयादिवर्गातील धातू, तनादिवर्गातील धातू व चुरादिवर्गातील धातू मूलत: तद्भव असून त्यांची गणना पाणिनीने साध्या धातूंत केली आहे. हे धातू मूलत: काय आहेत हेच मुळी त्याला समजले नाही. पाणिनी तिसऱ्या एका बाबीसंबंधाने जो भ्रममाण झाला ती अशी की स्वादि तनादि, रुधादि व क्रयादि धातू मूलत: काय आहेत याचा उमज त्याला पडला नाही. अशा तीन स्थली पृथक्करणाच्या कामीं पाणिनीच्या कृतीत व्यंग पडले आहे. त्यामुळे धातूंचे त्याने केलेले वर्गीकरण इतिहासदृष्ट्या अत्यंत सदोष निपजले आहे. संस्कृत भाषेची जी स्थिती त्याच्याकाळी विद्यमान होती त्या स्थितीच्या दृष्टीने, इतिहासाकडे लक्ष न देता, त्याने केले ते वर्गीकरण योग्यच आहे. पाणिनीने प्रथम धातूंचे दोन मोठे वर्ग केले १) सर्वधातू व २) अर्धधातू. विकरण ज्यांना होते ते सर्वधातू व होत नाही ते अर्धधातू. एकच धातू कित्येक प्रत्यय पुढे असता सर्वधातू होतो व कित्येक प्रत्यय पुढे असता अर्धधातू होतो. उदाहरणार्थ, साध् धातू घेऊ. नुवीकरणारासह साघ्नु या जोडाला पाणिनी सगळा ऊर्फ सर्वधातू म्हणतो व नुसत्या साध् ला अर्धधातू म्हणतो. सर्वेण अनुषंगिक ह्न विकरणेन वर्तमान: धातु: सर्वधातु: असा पाणिनीचा समज असलेला स्पष्ट दिसतो. जे प्रत्यय पुढे असता धातू सर्वधातूचे रूप धारण करतो त्या प्रत्ययांना सार्वधातुक प्रत्यय ही संज्ञा पाणिनीने दिली आणि ज्या प्रत्ययांच्या पाठीमागे धातू जसाचा तसा रहातो त्यांना अर्धधातुक प्रत्यय ही संज्ञा दिली. सार्वधातुक आणि आर्धघातुक प्रत्यय बनविण्याचा खटाटोप पाणिनीला जो करावा लागला त्याचे कारण साधे धातू व तद्भव धातू यांच्यातील भेद काय तो त्याला कळला नाही. जुहोत्यादि धातू अभ्यस्त धातू आहेत, अदादि गणातील चकास्, जक्ष्, दरिद्रा इत्यादी अनेक धातूही अभ्यस्त आहेत, दिवादि धातू अभ्यस्त आहेत व भ्वादिवर्गातील सर्व इगन्त धातू अभ्यस्त आहेत, हे पाणिनीच्या लक्षात न आल्याकारणाने नी तील ई चा गुण होतो भू तील ऊ चा गुण होतो वगैरे कार्य त्याला सांगावी लागली दिवादि धातूंना य् विकरण होते, इष् चे इच्छ् होते, असे जेथे जेथे अडचण उभी राहिली तेथे तेथे, नवे नवे कार्य पाणिनीला सांगावे लागले. हन् चे जहि होतें, चकास् चे चकाद्धि होते, अस् चे एधि होते, अशी शेंकडो अडचणीची स्थले पाणिनीला भेटली व त्यांची व्यवस्था असे असे होते, या सांगण्यापलीकडे, त्याच्या हातून झाली नाही आणि तो ज्या सरणीने चालला होता त्या सरणीने ती होण्यासारखीही नव्हती. जहि, चक्राद्धि, एधि, ही रूपे अभ्यस्त धातूंची आहेत, या बाबीचे स्वप्नही पाणिनीला नव्हते. नयामि, भवामि, जक्षिमि, दौव्यामि, ही देखील रूपे अभ्यस्त धातूंची आहेत, हे तर पाणिनीच्या स्वप्नाच्याही आटोक्याच्या बाहेरचे होते. तसेच वन्दामि, वणद्मि, तृणेह्मि, अश्नामि व क्षुभ्नीम: ही रूपे एकाच वर्गातील आहेत, हे त्यास कोणी सांगितले असते तर तो आश्चर्याने चकित झाला असता. असे हे जे पाणिनीलाही भुलविणारे भ्वादि, अहादि, जुहोत्यादि दशवर्गातील धातू ते मूलत: काय आहेत व कोणत्या पूर्ववैदिक धातूंचे अवशेष आहेत याचे दर्शन खाली करून दाखवितो.