Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

असले सावित्रीपतीत व्रात्य ब्राह्मण भूर्जकंटक, अवंति, वाटधान, इत्यादी देशात बहुत झाले; तसेच सावित्रीपतित व्रात्य क्षत्रिय झल्ल, मल्ल, निच्छिवि, नट, करण, खस, द्रविड, पौड्रक, औड्र, कांबोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद इत्यादी त्या त्या देशात झाले आणि व्रात्य वैश्य करुष, सात्वत इत्यादी देशपरत्वे झाले. ह्या लोकांची सावित्रीपतनापर्यंत प्रगती झाल्यावर ह्यांच्यापैकी नट नामक व्रात्य क्षत्रियांत जिन व शक नामक व्रात्य क्षत्रियांत गौतम बुद्ध ऊर्फ शाक्यमुनी ह्या दोघांनी स्वतंत्र अशा वेदबाह्य व चातुर्वर्ण्यविरोधी मतांची स्थापना करून व देशातील बहुतम व्रात्यांना व क्षुद्रांना एकजुटीत आणून शुद्धत्रैवर्णिकांचा अथवा शुद्ध चातुर्वर्णिकांचा बिमोड करण्याचा उद्योग आरंभिला. त्रैवर्णिकांचे ते भानगडीचे यज्ञयाग, क्लिष्ट शौचधर्म, सूक्ष्म उपनिषद्विचार ह्या सा-याच्या मुळावर ह्या दोघांनी व ह्यांच्या सारख्या इतरांनी इतके प्रहार केले की, सन्मार्गी व सद्धर्मी त्रैवर्णिकांना व विशेषत: ब्राह्मणांना खडबडून जागे होणे भाग पडले आणि आलेल्या संकटाचे निवारण करावे लागले. ह्या काली वैदिक संस्कृती वर संकटे ज्या अनेक बाजूंनी आलेली होती त्यांची याद खालीलप्रमाणे :

अ) जैनबौद्धांचा वैदिक धर्मावर हल्ला चढण्यापूर्वी पाणिनिकालाच्या अगोदर चार्वाकाने आपले लोकायतिक मत क्षुद्रांत व क्षुद्रोत्पन्न त्रैवर्णिकांत पसरवून ठेवले होते. लोकायत म्हणजे सामान्य लोकांच्या मताप्रमाणे चालणारे व त्यामतावर अवलंबून असणारे. ह्याशब्दावरूनच पाणिनिपूर्वी सामान्य लोकांत वैदिक धर्माबद्दल कुत्सितबुद्धी उत्पन्न झाली होती हे अनुमानता येते.

आ) जैनबौद्धांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र यांची चातुर्वर्ण्यव्यवस्था मोडून सर्वांची एकजात व एकसमता करण्याचा उपदेश व उद्योग आरंभिला.

इ) जैनबौद्धांनी क्षुद्रादि सर्व लोकांना समजणा-या ज्या प्राकृत भाषा त्यात लिहिण्याचा व बोलण्याचा उपक्रम करून त्रैवर्णिकांच्या संस्कृत व वैदिक भाषांना काट दिला. प्राकृत जनांच्या अपभ्रष्ट भाषांचा त्रैवर्णिक तिटकारा करीत, ही बाब जैनबौद्धांच्या पथ्यावरच पडली. संस्कृत व वैदिक भाषांना काट देण्याने वेदांचे व वैदिक परंपरेचेही उच्चाटन आयतेच झाले.