Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

"ह्याप्रमाणें अबदालीची दु:स्थिति होती. तिचा पूर्णपणें नफा घेण्याचा सदाशिवरावाचा विचार होता परंतु, एका गोविंदपंताच्या कुचराईमुळें सर्व काहीं बिघडण्याच्या रंगास येण्याचीं चिन्हें दिसत होतीं. गोविंदपंताच्या कुचराईसंबंधानें नारो शंकर ७ नोव्हेंबराला लिहितो- “दाजीबा ! आणीक सर्व कामें एकीकडे ठेवून, रात्रीचा दिवस करून दाखवावयाचा प्रसंग असतां, तुम्ही यावयास ढील करतां, यावरून काय म्हणावें? पत्र पावतांच जेथें असाल तेथून कुच करून दुमजला येऊन पोहोंचणें. तुम्हांपाशीं दहा हजार फौज असोन पंचवीस लाख रुपये खात असतां, खावंदास कामाची निकड असतां, तुम्ही लटके बहाणे करून मुलुखांत रहावें हे गोष्टी तुम्हांस योग्य नाहीं! खावंद वारंवार लिहतात, तुम्ही गढ़ीकोटांचे बहाणे लिहितां, हा सेवकलोकांचा धर्म नव्हे (लेखांक २४३).” भाऊसाहेबानें अबदालीचें पारपत्य करण्याची आपल्याकडून होईल तितकी उत्तम तयारी केली होती. इभ्राईमखानाच्या तोफखान्याचा मजबूत आधार असल्यामुळें भाऊनें स्वत: मोगलाइ पद्धतीनें लढण्याचा विचार केला व गोविंदपंतास गनिमी त-हेनें शत्रूस भंडावून सोडण्यास सांगितलें (लेखांक २६०, २४४, टीप ३१७). गोविंदपंताच्या गनीमी लढाईची वाट भाऊनें बरेच दिवस पाहिली व शेवटीं १५ नोव्हेंबरला येणेंप्रमाणें गोविंदपंतास लिहिलें:- “ लिहिलेप्रमाणें एकहि काम होऊन न आलें. फार दिवस खावंदानें लहानाचें थोर केलें, वाढविलें, त्याचें सार्थक केलें ! अजून तरी सावध होऊन लिहिलेप्रमाणें येऊन पोहोचणें' (लेखांक २६८). परंतु गोविंदपंत वेळेवर कसचा येऊन पोहोंचतो ! त्याच्या मनांत भाऊचा, पक्का अंत बघावयाचा होता व त्याशिवाय त्याला दुसरें गत्यंतर नव्हतें. आजपर्यंत केलेली सर्व पापें झांकण्याची सोय मराठ्यांवर कांहींतरी भयंकर विपत्ति आल्यावांचून लागण्यासारखी नाहीं हे पंतमजकूर जाणून होता. तेव्हां भाऊला मदत न करण्याची व्यवस्था आपल्याकडून जेवढी होईल तेवढी हा इसम करून चुकला. इकडे भाऊनें मात्र आपली हिंमत शेवटपर्यंत सोडिली नाहीं. आपल्या सैन्यांतील लोक एकदिलानें लढतील याची भाऊला शंका नव्हती. शिवाय यवनांनी कधी पाहिला नव्हता असला तोफखाना भाऊच्या पदरीं होता सारांश, भाऊ सैन्याच्या उपकरणांच्या बाबतींत अबदालीहून सर्वप्रकारें श्रेष्ठ होता. परंतु एका गोष्टींत १५ नोव्हेंबरच्या पुढें भाऊचें व्यंग पडूं लागलें. तें हें कीं, अबदालीला रसद अंतर्वेदींतून यथेच्छ मिंळू लागली व भाऊची रसद दिल्लीकडून येण्याचें मान दिवसेंदिवस कमी होत चाललें. अबदालीला उठवून लढाईला आणण्याचा भाऊनें वारंवार प्रयत्न केला. परंतु, अबदाली चिरडीस जाऊन आपल्या गोटाच्या बाहेर स्वत: बरेच दिवस पडला नाहीं. अबदालीच्या मनांत निराळाच डाव होता. जी विंपत्ति अबदाली १५ नोव्हेंबराच्यापूर्वी स्वत: भोगीत होता तीच किंवा त्याहूनही भयंकर अशी विपत्ति आतां मराठ्यांना भोगण्याची पाळीं आली. तेव्हां उपासमारीनें मराठ्यांना पूर्ण जेरीस आणून मग त्यांचें यथेच्छ पारपत्य करण्याचा अबदालीनें बेत केला.