Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
२. महाराष्ट्रांत स्वदेशाच्या इतिहासाची आस्था अठराव्या शतकांत व एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थांत बरीच होती व तत्समाधानार्थ बखरी निर्माण झाल्या.
हिंदुस्थानांत इतिहास काय तो दोन भाषांत लिहिलेला आढळतो; एक फारशींत व दुसरा मराठींत. कारण, इतिहास लिहून ठेवण्यासारखीं कृत्यें हिंदुस्थानांत मुसुलमानांच्या व मराठ्यांच्या हातूनच काय तीं म्हणण्यासारखीं घडलीं आहेत. शीख, रजपूत, मवास व पाळेगार ह्यांनींहि पुंडावे व बखेडे बरेच केले आहेत. त्यांचे गद्यपद्य इतिहास अधून मधून पहाण्यांत येतात; परंतु, संगतवार इतिहास ज्यांचा अभिमानानें सांगतां येईल अशीं व्यवस्थित प्रौढीला पोचलेलीं राष्ट्रें म्हटलीं म्हणजे एक मराठ्यांचें व दुसरें मुसुलमानांचें. इराण, तुराण, अफगाणिस्थान व अरबस्थान ह्या देशांतील मुसुलमानांना इतिहासाची गोडी पूर्वीपासूनच आहे. मुसुलमानांच्या सहवासानें, त्यांच्या तवारिखा पाहून, मराठ्यांनींहि बखरी लिहिण्याचा प्रघात पाडला. सध्यांपर्यंत छापून प्रसिद्ध झाल्या आहेत त्या सर्वांत बडोदें येथें छापलेली चिटणिशी बखर अगदीं जुनी आहे. त्याच्या अगोदर लिहिलेलीं कोणतीहि बखर उपलब्ध नाहीं. त्याच्यापुढें मात्र पुष्कळ बखरी लिहिल्या गेल्या. खुद्द पेशव्यांच्या येथें बखरनवीस असत. त्यांचा धंदा जुने कागदपत्र पाहून बखरी सजविण्याचा असे. खुद्द पेशव्यांना वाचण्याकरितां ज्या बखरी लिहिल्या जात असत त्यांतील मजकूर कालानुक्रमानें लिहिलेला असे. ह्या बखरींच्या गांवोगांव ज्या नकला होऊन गेल्या त्यांत नांवांचा व तारखांचा घोटाळा होण्याचा संभव असे. कांहीं बखरी प्रांतोप्रांतीच्या माहितगार मंडळींनीं कर्णोपकर्णी ऐकून लिहिलेल्या आहेत. त्यांत मोठमोठे प्रसंगहि वाकडेतिकडे व पौरोणिक त-हेनें व बाष्कळ रीतीनें वर्णिलेले आहेत. पेशव्यांच्या येथील बखरींतील मजकूर कालानुक्रमानें लिहिला जात असे असें म्हणण्यास मजजवळ आधार आहे. दुस-या माधवरावाची आजी ताई साठी म्हणून होती. तिच्या वंशजांनीं आपलें दफ्तर मला दाखविलें. त्यांत सवाईमाधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांना वाचण्याकरितां एक लहानशी बखर साळबाईच्या तहापर्यंत लिहिलेली आहे. तिच्यांतील मजकूर बहुतेक कालानुक्रमानें लिहिलेला आहे. गेल्या शतकांत व पंचवीस तीस वर्षांपाठीमागें ह्या शतकांत महाराष्ट्र देशांत बखरी लिहिण्याचा व वाचण्याचा सपाटा फार असे. अक्षर चांगलें झालें म्हणजे मुलाकडून एक तरी बखर लिहवून घेण्याचा परिपाठ सार्वत्रिक असे. गांवोगांव व खेड्यापाड्यानें सुद्धां ब्राह्मणांच्या येथें व पाटील कुळकर्ण्यांच्या येथें बखरी सांपडण्याचा संभव असे. आजपर्यंत महाराष्ट्रांत खालील बखरी छापून प्रसिद्ध झाल्या आहेत –
१. शहाजी महाराज भोसले यांची कैफियत (पत्रें व यादी ४३८). २. चिटणीसकृत शिवछत्रपतीचें सप्तप्रकरणात्मक चरित्र. ३. चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर. ४. चिटणीसकृत थोरले राजाराम महाराज यांची बखर. ५. चिटणीसकृत शाहूमहाराज यांची बखर. ६. चिटणीसकृत धाकटे रामराजे यांची बखर. ७. चिटणीसकृत शाहूमहाराज यांची बखर चतुर्शिंगाचे हकीकतीसह. ८. चित्रगुप्तविरचित शिवाजी महाराजांची बखर. ९. सभासदविरचित शिवछत्रपतीचें चरित्र. १०. शिवदिग्विजय. ११. शिवप्रताप. १२. भूषणकविकृत शिवराजभूषणकाव्य. १३. पुरुषोत्तमकविकृत शिवकाव्य. १४. मराठी साम्राज्याची छोटी बखर. १५. पेशव्याची बखर सोहनीकृत. १६. बाळाजी विश्वनाथ यांची कैफियत (पत्रें व यादी ४९४). १७. बाजीराव बल्लाळ यांची कैफियत (पत्रें व यादी ४९५). १८. नारायणराव पेशवे यांची बखर. १९. पांडुरंगकृत नारायणराव पेशवे यांचें ओवीबद्ध चरित्र. २०. भाऊसाहेबांची बखर. २१. भाऊसाहेबांची कैफियत. २२. रघुनाथ यादवकृत पानिपतची बखर. २३. साष्टीची बखर. २४. विंचुरकरांची बखर. २५. दाभाड्यांची हकीकत. २६. गायकवाडांची हकीकत. २७. खर्ड्याच्या स्वारीची बखर. २८. ब्रह्मेंद्रस्वामीचें चरित्र. २९. जयराम स्वामींचें चरित्र. ३०. रामदासस्वामींचें चरित्र. ३१. होळकरांची कैफियत. ३२. नागपूरकर भोसल्यांची कैफियत. ३३. मल्हाररामरावकृत राजनीति. ३४. संभाजी महाराजकृत राजनीति. ३५. पंतप्रधान ह्यांची शकावली. ३६. कंपनीप्रतापमंडनम्. ३७. गोविंदपंत बुंदेल्यांची कैफियत. ३८. पंतप्रतिनिधींची कैफियत. ३९. काशीराजाची बखर (भाषांतर). ४०. पोवाडे. ४१. नानाची बखर. ४२. अमात्य बावडेकर यांची कैफियत.