Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

रसद त्याजकडे जावयाची आढळेल ते लुटणें, दबाव पाडणें, म्हणजे चहूंकडून घाबरा होईल. हेहि युक्त तुम्हांस बहुत वेळ लिहिली. परंतु तुम्ही येत नाही. सारीच डोळेझांक करतां. परंतु असा समय चाकरी करून दाखवावयाचा पुढें कदापि येणें नाहीं. या हंगामी जो आपले शक्तीपेक्षां चाकरी अधिक करून दाखवील त्याचे रूप आहे. हें दूरदेशीं ध्यानांत आणून सर्व गोष्टी लिहिल्याप्रमाणें करणें. ऐवज पाठवणें. तुम्हीं येणें. लहानसहान गढ्यामुळें गुंतोन मोठ्या कामाच्या उपयोगांतून जाल असें करून न घेणें. तुम्हीं दरमजल बागपतचे सुमारें अंतर्वेदींतून येऊन रसद मारणें. नजीबखानाचा मुलूख जाळून लुटून फस्त करणें. दोन चार हजार चांगलीं निवडक फौज लांब लांब मजली करून लिहिलेप्रमाणें रोहिलियांच्या मुलुखांत दंगा करणें व रसद बंद करणें. कांहींच न झालें तरी परिछिन्न तुम्हांवर शब्द येईल. वारंवार लिहावयाची, आपले अबरूची ईरे धरून काम बजावून आणणे. या दिवसांत तुम्ही येऊन लिहिलेप्रमाणें पावला असता तर किती काम होतें. अजून तरी करून दाखवणें. गंगापार जमीदारांकडून दंगा करवणें. गोपाळराव गणेश फौजसुद्धां गंगापार उतरून जमीदार सामील करून सुजाउद्दौला, रोहिले यांचा अंमल उठवावा. याप्रमाणें करणें. मसलत मोठी. या दिवसांत ज्यास जें लिहावें त्याप्रमाणें होऊन न येई मग तुम्ही आमचे कामाचे काय? याउपरि आज्ञेची व चाकरी करून दाखवावयाची सीमा झाली!” ह्याप्रमाणें टोंचून व खोंचून लिहून गोविंदपंताची कानउघाडणी सदाशिवरावानें केली (लेखांक २६४). नारो शंकरानें नोव्हेंबरच्या ३ -या तारखेस अशाच अर्थाचें एक पत्र गोविंदपंतास लिहिले (लेखांक २६३). तरीहि गोविंदपंताने आपला दिरंगाईचा व सुस्तपणाचा क्रम सोडिला नाहीं. अबदालीचें पूर्णपणें पारपत्य करण्याची ही तर ऐन वेळ होती. सदाशिवरावानें मुद्दाम उत्तरेकडे कुंजपुन्यास जाऊन अबदालीला दिल्ली येथील सैन्याच्या व आपल्या पानिपत येथील सैन्याच्या मध्यें धरिलें होतें. अबदालीला समूळ चीत करण्यास २५ अक्टोबरपासून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तम संधि होती. ह्या अवधींत अबदालीच्या लष्करांत अत्यंत महर्गता होती; मराठ्यांनीं २ नोव्हेंबरला अबदालीचा सामान्यसा पाडाव केला होता व अबदालीहि मराठ्यांचें अकटोविकट सैन्य पाहून भयभीत झाला होता. ह्यासंबंधानें ५ नोव्हेंबरला कोल्हापूर येथील जोशीराव यांचा पूर्वज कृष्ण जोशी संमेश्वरकर लिहितो:- “श्रीमंतांनीं चोहोंकडे तोफखाना पसरला आहे. यवनास थोर भय झालें आहे. पुढे येववत नाहीं. आमचे सैनिक यवनाचें समक्ष उभे राहून, नित्य शेंपन्नांस यवन मारून उंच घोर्डी आणितात. दोन हत्ती पेंढारी यार्णी काल आणिलें. यवनाच्या सैन्यांत महर्गता झाली आहे. आमच्या सैन्यांत सवंगाई आहे. आणखी दोन चार दिवसांत यवन चालोन तोफावरी येईल तरी क्षणमात्र बुडेल. न ये तर आमचे लोक जाऊन युद्ध करणार. सर्व सैन्यास उत्साह आहे कीं अबदाली व नजीबखान व सुजाउद्दौला आठा चौ दिवसांत क्षयास जातील. अबदाली शहानशाहा म्हणवीत होता. त्यानें युद्धें बहुत केलीं आहेत. परंतु तो दो कोसांवरी येऊन, आठ दिवस बसोन, कांहीं पराक्रम होत नाहीं. यामुळें आमची फौज बहुत शेर आहे. अबदालीनें स्वदेशास जावें तरी मार्ग नाहीं. युद्ध करावें तरी परिणाम नाहीं. उगेंच बसावें तरी भक्षावयास नाहीं. याप्रमाणें विचारांत पडला आहे (लेखांक २६५).