Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
आतां सदाशिवरावाच्या मनांत अशी योजना आलीं कीं यमुनेच्या दक्षिणतीरानें मथुरा, दिल्ली, कुंजपुरा ह्या शहरांवरून जाऊन पश्चिमोत्तरेकडून यमुना उतरून अंतर्वेदींत याचे व अबदालीला पूर्वेकडे कोळजळेश्वर, सकुराबाद वगैरे ठाण्यावरून रेटीत गोविंदपंताच्या अंगावर नेऊन सोडावें. ह्या योजनेच्या साधनार्थ सदाशिवराव स्वतः मथुरेच्या दिशेनें चालता झाला व गोविंदपंतानें कोळजळेश्वर ऊर्फ अलीगडपर्यंत मराठ्यांचीं ठाणीं बसवावी, अबदालीच्या भोंवतालचा मुलूख वैराण करावा, रोहिल्यांच्या मुलुखांत सोरमच्या घाटानें उतरण्याची अवाई घालावी व सुजाउद्दौल्याच्या प्रांतांत दंगे माजवावे असें त्याने ठरविलें. सदाशिवराव १६ जुलैला मथुरेस आला (लेखांक २१७). तेथून शिंदे, होळकर व बळवंतराव गणपत यांस त्यानें दिल्लीस पुढें रवाना केलें व स्वःत ३० जुलैला त्या शहरीं जाऊन पोहोचला (लेखांक २२४). दिल्ली शहर बळवंतराव मेहेंदळ्यानें अगोदरच सर केलें होतें (लेखांक २२३). आंतील किल्ला घ्यावयाचा राहिला होता. तो सदाशिवरावभाऊ आल्यावर १ आगस्टाला मराठ्यांच्या हातीं पडला. याकूबअल्लीखान म्हणून अबदालीचा कोणी सरदार किल्ल्यांत होता, तो एकटाच इतर लोकांना टाकून नावेंतून पळून गेला (लेखांक २४६). किल्ल्याच्या आंत अबदालीकडील लोक होते त्यांस कौल देऊन हत्यारांसुद्धां बाहेर काढून दिलें व पावसाळा सुरू झाला म्हणून मराठे दिल्लीभोवतीं सुमारें दोन महिने तळ देऊन राहिले. मराठ्यांनीं दिल्ली घेतली ही बातमी लवकरच पसरली. दिल्ली शहर म्हणजे चकत्यांच्या पातशाहीचें मुख्य ठिकाण. तें मराठ्यांनीं अबदालीच्या लोकांपासून हिसकावून घेतलें ह्या गोष्टीनें मराठ्यांचा दरारा पूर्वी होता त्यापेक्षांहि आतां जास्त वाढला व त्याच मानानें अबदालीचा कमी झाला. खुद्द अबदालीच्या सैन्यांत व त्याच्या साथीदारांत फूटफाट होऊं लागली. हफीजरहिमतखान, अहमतखान बंगष, सादुल्लाखान, फजुल्लाखान वगैरे रोहिल्यांची राजकारणें भाऊकडे पूर्वीपासूनच लागलीं होतीं. ह्या लोकांना मराठ्यांनी दिल्ली घेतल्यापासून अबदालीच्या बलाचा व सामर्थ्याचा संशय येऊं लागला व ते त्याच्यापासून विभक्त होण्याची खटपट करूं लागले. कित्येक गिलचे व अफरीदी लोकहि अबदालीला सोडून निघाले (लेखांक २३३). सुजाउद्दौल्यालाहि आपण अबदलीला मिळालों ह्या गोष्टीचा खेद वाटूं लागला. अबदालीनें सुजाउद्यौल्यावर मारेकरी घातले व त्याच्यापाशीं तो खर्चाकरितां पैसा मागूं लागला. नजीबखानानें सुजाउद्दौल्याला अबदालीकडे आणिला, त्यांतील मुख्य हेतु सुजाकडून पैसे काढावयाचे हा होता (लेखांक २०४). सुजापाशीं अबदाली जेव्हां पैसा मागू लागला तेव्हां त्या तरुण व उल्लू मनुष्याला नजीबखानाच्या कुंटणपणाचें व अबदालीच्या मतलबाचें इंगित कळले (लेखांक २४६).