Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शंकास्थान चवथें.
मानवी इतिहास काल व स्थल ह्यांनीं बद्ध झालेला आहे. कोणत्याहि प्रसंगाचें वर्णन द्यावयाचें म्हटलें म्हणजे, त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखविला पाहिजे. प्रसंगाचा परिष्कार कालानें व स्थलानें विशिष्ट कसा झाला आहे, हें दाखवितांना त्या कालीं व त्या स्थळीं कोणत्या व्यक्ती प्रामुख्यानें पुढें येतात हेंहि इतिहासकाराला स्वाभाविकपणेंच सांगावें लागतें. सारांश, काल, स्थल व व्यक्ती ह्या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देतां येते. कोणत्याहि बखरींत किंवा इतिहास हें प्रौढ नांव धारण करणा-या ग्रंथांत जेथें ह्या त्रयींतील एकाची किंवा सर्वांची गफलत अगर लोप केलेला असतो तेथें ऐतिहासिक प्रसंगाची यथास्थित व सशास्त्र मांडणी झाली नाहीं असें म्हणावें लागतें. परीक्षेकरितां घेतलेल्या बखरींत व इतिहास हें प्रौढ नांव धारण करणा-या ग्रांट डफच्या ग्रंथांत योग्य आधार न मिळाल्यामुळें किंवा योग्य आधार मिळविण्याची खटपट न केल्यामुळें, किंवा शिक्षणाभावामुळें किंवा केवळ अज्ञानामुळें वर सांगितल्या त्रयींतील एकाचा किंवा अनेकांचा लोप वेळोवेळीं झालेला वाचकांच्या नजरेस आणून दिला आहे. ज्यानीं प्रसंग घडवून आणिले, त्या व्यतींच्या नांवांचा लोप किंवा गफलत, जेव्हां प्रसंग घडले त्या कालचा लोप किंवा गफलत, व जेथें प्रसंग घडले त्या स्थलांचा लोप किंवा गफलत बखरकारांच्या बखरींत व ग्रांट डफच्या इतिहासांत अनेक प्रसगीं झाल्याकारणानें प्रसंगाचा कालानुक्रम, त्याचे व्यक्तिमाहात्म्य, व त्यांचें स्थलवैशिष्ट्य व्यवस्थित रीतीनें ध्यानांत येणें मुष्कील होतें व इतिहासाच्या अस्तित्वाचें मुख्य प्रयोजन व हेतू निष्फल होतात. व्यक्तींच्या हातून विशिष्ट कालीं व विशिष्ट स्थलीं घडलेल्या अनेक प्रसंगांचे मुद्देसूद, तपशीलवार व व्यवस्थित वर्णन देतां देतां विशिष्ट कालीं व विशिष्ट देशांत कोणत्या महाविचाराची कशी उत्क्रान्ति झाली व काय परिणाम झाले, हें वर्तमान व भावी पिढ्यांना दाखवून देण्याचें भूत व वर्तमान इतिहासाचें मुख्य प्रयोजन आहे. हें प्रयोजन मराठी व मुसलमानी बखरींतील व ग्रांट डफच्या ग्रंथांतील मजकुरांवरून व्हावें तसें साध्य होत नाहीं. ह्याला मुख्य कारण ह्या ग्रंथांत कालाचा, स्थलांचा किंवा व्यक्तींचा योग्य व व्यवस्थित निर्देश झाला नाहीं हें होय. अर्थात् इतिहास व तज्जन्य उपदेश ह्या बखरींतील व इतिहासांतील मजकुरापासून उदभूत होत नाहींत. विशिष्ट काल, विशिष्ट स्थल व विशिष्ट व्यक्तींचें आचरण ह्या तीन घटकांचा संघात झाला असतां प्रसंग ही वस्तू बनली जाते व अनेक प्रसंगांच्या व्यवस्थित संततीपासून इतिहास म्हणून ज्या वस्तूस म्हणता येईल तिची निर्मिती होते. ही निर्मिती होत असतां अनेक कालांशांनीं घटित जो कालाचा महाभाग- ज्यास epoch, age, मन्वंतर वगैरे संज्ञा देतात, त्यांत कोणत्या विचाराचें प्राधान्य आहे हें सहज समुद्भूत होतें. ह्या विचारापासूनच वर्तमान व भावी पिढ्यांना गतकालीन पिढ्यांच्या कर्मसंततीचें ज्ञान होतें. कोणती कर्मसंतती घेऊन आपला समाज जन्माला आला आहे व कोणत्या दिशेचें आचरण ठेविलें असतां, वर्तमान व भावी समाजाचा कर्मलोप होऊन समाज आत्यंतिक सुखाचा वाटेकरी, कालान्तरानें का होईना, पण होईल हेंहि ह्या गतकालीन विचारापासून अंशतः कळूं लागतें. गतकालीन पिढ्यांच्या कर्माचें जे ज्ञान-ज्यास युगमाहात्म्य, Spirit of the age, Esprit d’epoc, वगैरे निरनिराळ्या भाषांतून समानार्थक संज्ञा आहेत-त्यासच इतिहासाचा आत्मा म्हणतात, किंवा इतिहासाचा आत्मा अशी औपचारिक भाषा योजण्यापेक्षां, त्यासचं इतिहास हा व्यपदेश सामान्येंकरून देतात. हें युगमाहात्म्य, हें कालमाहात्म्य, हा इतिहासाचा आत्मा दाखवून देण्याचें अवघड काम अद्यापपर्यंत महाराष्ट्रांत कोण्याहि इतिहासकारानें यथास्थित केलें नाहीं. कां की, वर निर्दिष्ट केलेल्या घटकत्रयीचा पत्ता क्रमवार ह्या इतिहासकारांना लागला नाहीं.