Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शिवाजीचा उदय झाल्यावर त्याचा संबंध मेवाडच्या घराण्याशीं लावण्याकरितां चिटणिसांच्या घराण्यांतील एक पुरुष राजपुतान्यांत गेला होता (शिवदिग्विजय पृष्ठ ४११). वर्ष सहा महिने खटपट करूनहि शिवाजीचा मेवाडच्या घराण्याचीं संबंध लागेना व गागाभट्टादि मंडळी शूद्राला छत्रसिंहासनाचा अधिकार नाहीं, हें म्हणणें सोडीतना, तेव्हां बाळाजी आवजी चिटणीसानें दक्षिणेंतून रामचंद्र बाबाजीस उत्तरेस पत्र पाठविलें कीं, "उदेपूरचा व यांचा संबंध आहे". बाळाजी आवजीच्या ह्या सूचनेवरून शिवाजीचा व मेवाडच्या घराण्याचा संबंध शिवराजाच्या कीर्तीच्या व दरा-याच्या जोरावर युक्तीनें बसविण्यांत आला व राजपुतान्यांतील भाटांच्या वंशावळींत शिवाजीची वंशावळ नव्यानेंच दिसूं लागली. खुद्द शिवाजी महाराजांना ह्या आगंतुक संबंधाचें फारसें महत्त्व वाटत नव्हतें. "ज्याचे आंगीं सामर्थ्य तो राजा; कित्येक नीच होत्साता राज्यवैभव भोगतात कों नाहीं? हे क्षत्रियान्वय कोठें आहेत?" असे महाराजांचे स्वतःचे या वेळचे उद्गार आहेत. (शिवदिग्विजय ४१२). शिवाजीचा मेवाडच्या घराण्याशीं संबंध जोडण्यांत आला तो केवळ बाळाजीच्या स्वामीभक्तीचा प्रताप होय. गागाभट्टादि कर्मठ ब्राह्मणांचा किंतु घालविण्याकरितांच चिटणिसांनीं ही मेहनत केलेली आहे. धन्याचें न्यून असें भासवून द्यावयाचें नाहीं ह्या सदिच्छेनें बाळाजी आवजीनें हे गौडबंगाल केलें तेव्हां तें एका दृष्टीनें यद्यपि श्लाघ्य आहे तत्रापि आधुनिक इतिहासकाराला तें खरें धरून चालणें श्रेयस्कर होणार नाहीं. नेपोलियनाच्या राज्यरोहणाच्या वेळींहि असेंच एक गौडबंगाल रचण्यांत आलें. नेपोलियन कोशिकांतील एका सामान्य गृहस्थाचा मुलगा असून त्याच्या घराण्याचा संबंध कांहीं खटपटी लोकांनीं युरोपांतील एका अत्यंत पुरातन राजांच्या वंशावळीशीं जोडून दिला. त्या वेळीं नेपोलियनानें शिवाजीसारखेच उद्गार काढिले आहेत. (Alisons History chap XX, प्रारंभ). सारांश माझ्या मतें शिवाजीचा म्हणजे भोसल्यांचा मेवाडच्या शिसोद्यांच्या घराण्याशीं कांहीं एक संबंध नाहीं. ह्याला पुरावा भरभक्कम देतां येतो. (१) भोसल्यांचे व सिसोद्यांचे धर्माचार व कुळदैवत एक नाहींत. (२) शहाण्णव कुळींतील चाळके, माने, कदम, कचरे, जाधव, शाळुंके, मोरे, रठ्ठे, शिरके, मालुसरे, गुजर, पवार, वगैरे घराण्यांचा रजपुतांशीं जसा बिलकुल संबंध नाहीं, तसाच भोसल्यांचाहि नाहीं. चालुक्य, मानव्य, कदंब, कलचुरी, यादव, सोलंकी, मौर्य, रठ्ठे, श्रीक, मल्लसूर, गुर्जर, ह्या महाराष्ट्रांतील पुरातन लहानमोठ्या घराण्यांच्या नांवांचे वर दिलेल्या आधुनिक मराठ्यांचीं नांवे केवळ अपभ्रंश आहेत. त्याप्रमाणेंच भोज, भोजक ह्या पुरातन मराठी नांवाचा भोसले हा शब्द अपभ्रंश आहे. भोजें हें आडनांव मराठे लोकांत अद्यापहि ऐकूं येतें. भोज, भोजे, भोसके, भोसले, अशा परंपरेनें भोसलें हें आडनांव आलें असावें. (३) मराठ्यांचे रजपुतांशीं शरीरसंबंध होत नाहींत. परंतु भोंसल्यांचे मोरे, शिरके, पवार, जाधव ह्यांच्याशीं संबंध झाले आहेत. मोरे, जाधव हीं अस्सल मराठा कुळें होत. हीं कुळें महाराष्ट्रांत आज हजारों वर्षें आहेत. ह्यांचा संबंध रजपुतांशीं कोणत्याही प्रकारें लावतां येत नाही. शिवाजीचा शिसोद्यांच्या कुळाशीं संबंध लाविल्यापासून मात्र महाराष्ट्रांतील ह्या शुद्ध घराण्यांतील लोकांनींहि आपल्या कुळांचा संबंध रजपुतांशीं लावण्याचा प्रयत्न केला आहे. (४) मराठ्यांच्या व रजपुतांच्या शरीरांच्या ठेवणींत जो ढळढळीत भेद दिसून येतो त्यावरून ह्या मराठ्यांचा रजपुतांशीं कांहीं एक वांशिक संबंध नाहीं असेंच म्हणणें भाग पडतें. महाराष्ट्रांतील ब्राह्मण, प्रभु, मराठे, शेणवई, कुणबी, वगैरे अठरा पगड जातींतील लोकांच्या शरीराची ठेवण एका विशिष्ट प्रकारची आहे. त्या ठेवणीवरून हिंदुस्थानांतील इतर लोकांतून मराठ्यांना ओळखून काढतां येते.