Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

पिठोर राजाचा दोन दोन तीन तीन वेळां उल्लेख करून, भोसल्यांचे मूळ पुरुष राजपुतान्यांत प्रथम कोठं होते व व नंतर ते दक्षिणेंत केव्हां आले वगैरे मूळपीठिका बखरनविसांनीं दिली आहे. ती देतांना मल्हाररामरावानें दोन कथा, गोविंद-खंडेरावानें तीन कथा व शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें दोन कथा नमूद केल्या आहेत. मल्हाररामरावाच्या दोन कथांपैकीं चितोडच्या एकलिंगजीची कथा बप्प रावळाच्या संबंधाची आहे. चितोडचे राणे एकलिंगजीचे दिवाण ह्या नांवानें प्रसिद्ध आहेत. बप्प रावळ इसवी सनाच्या आठव्या शतकांत उदयास आला. (Tod's Rajasthan, chap, II and Ind. Ant. for December 1887). बप्पानें एकलिंगजीची आराधना केल्याची गोष्ट पिठोर राजांच्या पूर्वी घडून आली म्हणून मल्हाररामराव म्हणतो तें खरें आहे. परंतु पिठोराचा रकनुद्दिनानें पराभव केला म्हणून जें तो म्हणतो तें मात्र अविश्वसनीय दिसतें. अमीर रुकनुद्दीन याचें नांव टॉडच्या ग्रंथात पहिल्या खंडाच्या चवथ्या परिशिष्टांत दिलेल्या लेखांत आलें आहे. तो लेख ६६२ हिजरींत म्हणजे शके ११८७ त लिहिलेला असल्यामुळें रुकनुद्दिनाचा पिठोराशीं सामना होणें अशक्य भासतें. मल्हाररामरावानें दिलेली दुसरी कथा पद्मिणीसंबंधाची आहे. चितोडचा लक्ष्मणसिंह शके १०१२ त राज्यारूढ झाला म्हणून टॉड म्हणतो (Tod's Rajasthan chap. VI). ह्या वेळीं भीमसिंग चितोडाच्या गादीवर बसला म्हणून रा. सरदेसाई लिहितात तें बराबर नाहीं. (हिं. अ. इतिहास पृष्ठ ९९). लक्ष्मणसिंह अज्ञान असल्यामुळें त्यांचें पालकत्व भीमसिंगाकडे आलें होतें. चितोडच्या नौबतीची कथा तिन्ही बखरनविसांनीं दिली आहे. शिवदिग्विजयाचा कर्ता काकाजीची कथा देतो ती सजणसिंहासंबंधाची आहे. शिवप्रतापांत ही काकाजीची कथा, नौबतीची कथा वगैरे कथा आहेत. हा काकाजी किंवा सजणसिंह भोसल्यांचा मूळपुरुष असावा असा सार्वत्रिक ग्रह आहे. तो कितपत खरा आहे तें पाहिलें पाहिजे.

भोसल्यांच्या वंशावळींची ताळेसूद व्यवस्था लावण्याचा कित्येकांनीं प्रयत्न केला आहे. परंतु त्या प्रयत्नापासून विशेष निष्पत्ति झाल्याचें दिसून येत नाहीं, व पुढेहि केव्हां दिसून येईल किंवा कसें ह्याविषयी संशय वाटतो. कांकीं सातारकर महाराजांच्या दप्तरांतील, चिटणीसांच्या दप्तरांतील किंवा रजपुतान्यांतील दप्तरांतील वंशावळी तपासून हें काम भागण्यासारखें नाहीं. ह्या सर्व वंशावळी एकाच मूळाच्या निरनिराळ्या प्रती आहेत; व खुद्द मूळाच्या विश्वसनीयत्वाबद्दलच संशय आहे. ह्या वंशावळींचें मुख्य मूळ म्हटलें म्हणजे मेवाडच्या वंशावळी व रासाग्रंथ होत. मेवाडच्या भाटांच्या रासाग्रंथांत शिवाजीची वंशावळ दिली आहे, म्हणून टॉड म्हणतो. (Tod's Rajasthan, chap. VI). अजयसिंहाचा पुत्र सजणसिंह दक्षिणेंत शके १२२५ च्या सुमारास आला म्हणून तो म्हणतो. सजण, दिलीपसिंहजी व भोसाजी एकामागून एक सौंधवाड्यास राज्य करीत असतां त्यापैकीं भोसाजी शके १२०० बहुधान्य संवत्सरीं म्हणजे इ. स. १२७८ त दक्षिणेंत आला म्हणून मल्हार रामराव म्हणतो. अल्लाउद्दीनानें चितोड शके १२२५ त घेतलें व त्या वेळीं सजणसिंह हयात होता. त्याच्यापासून चौथा पुरुष जो भोसाजी तो शके १२०० त दक्षिणेंत आला हें जें मल्हार रामराव म्हणतो तें अर्थात् अविश्वसनीय ठरतें. काकाजी ऊर्फ सजणसिंह दक्षिणेंत दौलताबादच्या पातशहाच्या आश्रयास जाऊन राहिला म्हणून शिवदिग्विजयांत व शिवप्रतापांत लिहिलें आहे. परंतु १२२५ त दौलताबादेस पातशाही झाली नव्हती. दौलताबादेस यवनी अम्मल शके १२३४ त सुरू झाला. येणेंप्रमाणें बखरनविसांच्या लिहिण्यांत विश्वसनीयत्वाचा भाग फार थोडा आहे हें उघड दिसतें. आतां खुद्द मेवाडच्या रासाग्रंथांतील वंशावळीसंबंधीं विचार करावयाचा. टॉडनें मेवाडच्या इतिहासाचा बराच भाग पृथुराजरासा व खोमानरासा ह्या दोन ग्रंथांवरून मुख्यतः घेतलेला आहे. पैकीं पृथुराजरासांत शाहबुद्दीनाच्या हस्तें पिठोराचा पराभव होई तोंपर्यंत म्हणजे शके १११५ पर्यंतची कथा आहे. त्यांत शिवाजीची वंशावळ येणें अशक्य आहे. खोमानरासा हा ग्रंथ अलीकडचा आहे म्हणून टॉड आपल्या प्रस्तावनेंत म्हणतो.