Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
अर्कबाणे च शाके च शालिचाहनकः शकः ।
पैगंबरादि विख्यातो प्रारंभो यवनोदयः ॥
हा अशुद्ध श्लोक मजजवळील यादीकारांनीं, मल्हार रामरावानें व शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें आपापल्या पुस्तकांत दिला आहे व ५१२ शकांत यवनांचा उदय झाला म्हणजे पिठोराचा यवनांनी पराभव केला असा अर्थ ह्या श्लोकांचा ह्या सर्वांनीं केला आहे. अर्क = १२ व बाण = ५, मिळून ५१२ होतात, हें या यादीकारांना ठाम माहीत होतें व अर्कबाणे ह्या एवढ्या एकट्याच पदावर ५१२ त पिठोराचा यवनांनीं पराभव केला व तेव्हांपासून यवनांचा उदय झाला वगैरे इमारत ह्यांनीं उठवून दिली आहे. पिठोराच्या वेळेस पैगंबरादींचा उदय झाला, असेंहिं ह्या यादीकारांचें मत होतें. पैगंबरानें व सुलतान रुकनुद्दिनानें एक विचार करून पिठोराचा पराभव केला, असें मल्हार रामराव म्हणतो. पैगंबर व रुकानुद्दीन ह्याबद्दल फकीर व शहाबुद्दीन अशीं नांवें शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें दिलीं आहेत. सारांश, ५१२ शकांत (१) पिठोर राजाचा पराभव झाला, (२) रुकनुद्दीन किंवा शहाबुद्दीन ह्यांनीं तो पराभव केला व (३) पैगंबराचा म्हणजे महंमदाचा उदय ह्या वर्षी झाला, ह्या तीन गोष्टी ह्या श्लोकाच्या आधारानें ह्या लेखकांनीं काढिल्या आहेत. आतां ह्या तिन्ही गोष्टी ५१२ त झाल्या नाहींत हें सुप्रसिद्ध आहे. (१) पिठोर राजाचा पराभव शके १११५ त झाला, (२) तो १११५ त शहाबुद्दीनानें केला, व (३) शके ५१२ त म्हणजे इ. स. ५९० त हिजरीसनाला प्रारंभहि झाला नव्हता. येणेंप्रमाणें शके ५१२ त ज्या गोष्टी झाल्या म्हणून हे बखरकार किंवा यादीकार सांगतात त्या, त्या शकांत मुळींच झाल्या नाहींत हें सिद्ध आहे. परंतु ५१२ ह्या आंकड्याचा अर्थ काय ह्याचा ह्या सिद्धीनें कांहीं उलगडा झाला नाहीं व तो तर होणें अत्यंत इष्ट आहे. हा उलगडा बखरकारांनीं दिलेल्या रमलशास्त्रांतील श्लोकाचा नीट अर्थ लागल्यास कदाचित् झाला तर होईल. परंतु नीट अर्थ लागण्यास मूळ श्लोक जशाचा तसाच मिळाला पाहिजे. श्लोक कोणत्या रमलशास्त्रांतून घेतला त्याचा उल्लेख बखरनविसांनीं केला नाहीं. आनंदाश्रमांतील रमलशास्त्र्याच्या पंधरा वीस पोथ्या मीं तपासून पाहिल्या; परंतु त्यांत हा श्लोक कोठें सांपडत नाहीं. प्रत्यक्ष हाच श्लोक सांपडत नाहीं तत्रापि ह्याचाच सारखा एक श्लोक आनंदाश्रमांतील ६२४३ नंबरच्या रमलरहस्याच्या पोथीच्या ६३५ पृष्ठावर, मला सांपडला. तो श्लोक असाः-
संवत्सरः पंचगुणेंदुहीनः १३५ शाकोभवेद्विक्रमराज्य या-॥ शाकेविहीने कुकु पंच ५११ शेष मोहर्म्मादौ हिजरीती सन्नः॥१॥
विक्रमशकांत १३५ वजा केले म्हणजे शालिवाहन शक येतो व शालिवाहन शकांत ५११ वजा केले म्हणजे हिजरी सन येतो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. रमलरहस्य हा ग्रंथ शके १६२३ त लिहिला असें ह्या पोथींत लिहिलें आहे. त्या शकांत हिजरी सन १११२ होता. शके १६२३ त ५११ वजा केले म्हणजे हिजरी १११२ येतात म्हणजे शके १६२३ त शालिवाहन शकांत व हिजरी सनांत अंतर ५११ होतें असें ह्यावरून ठरतें. शके १५९० त हिजरी सन १०७८ होता व त्या दोहोंत अंतर ५१२ होतें. शके १५६० त हिजरी सन १०४७ होता व त्या दोहोंत अंतर ५१३ होतें. येणेंप्रमाणें शकांत व हिजरी सनांत दर ३३ वर्षांनीं एकेक वर्ष अंतर जास्त किंवा कमी पडत जातें. अर्थात् शके १६२३ त लिहिलेल्या रमलशास्त्राच्या ग्रंथांत हिजरी सन काढण्याकरितां वजा करण्यास जो आकडा दिला असेल त्यापेक्षां शके १५९० तल्या ग्रंथांत वजा करण्याची रक्कम एकानें जास्त होईल.