Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(११) प्रभाकरपंत जोशी याणीं श्रीमंतांस खोटी मुदत झाली असें सांगितल्यावरून वैशाख व॥ ८ शुक्रवारीं ८-५-१७ छ २० जमादिलाखरी कैद करून कांही दिवस संगमावर कैदेंत ठेवून साष्टीस रवाना केले.
(१२) किल्ले हवाली केल्यावर त्रिंबकजीस धरण्याची तजवीज करून इंग्रज सरकाराशी दोस्ती कायम राखावी हा मार्ग श्रीमंतांनी सोडून, निघोन जावें असा विचार मनांत करूं लागले. फौजा नेहमी वाडयाजवळ तयार रहात होत्या व मसलतीस बापू गोखले यांचाच भरवसा श्रीमंतांनी धरिला. गोखले याणी चिंतामणराव यास अनुकूल करून घेतलें, श्रीमंतांची खात्री केली की सरकारची फौज व होळकर, भोसले, मीरखान, शिंदे असा चहूंकडे बिघाड झाला असतां या मुलकांत इंग्रजांचे माणूस नाहीसें करूं, व त्याचे लष्कर असेल तेथे आसपास फौजा फिरोन त्यास चारा अनाज न मिळे असें करू, भोवताले आगी लावून त्यास खावयास न मिळे असें झाले ह्मणजे आपले आपण जेर होतील. अशी सल्ला दिल्ही. त्याजवरून श्रीमंतास भरंवसा आला. परंतु येवेळेस बिघाड करावा तर बरसात जवळ येऊन पोहोचली, शिंदे, भोसले, होळकर यांच्या फौजा दूर राहिल्या, निभावणी होणार नाही. तेव्हां जसे ह्मणतील तसे कबूल करून बरसात जाऊं द्यावी, आपलीहि फौज आणखी तयार करावी, नंतर बिघाड करावा, असा विचार करून, सफाईचे बोलणे बोलावयास पाट साहेब व मोर दीक्षित व बाळाजी लक्ष्मण साहेबाकडे जाऊं लागले.
(१३) बाळोजी कुंजर वैशाख व॥ ९, छ २१ जमादिलाखर, पंढरपूरचे मुक्कामी मृत्यू पावले.
(१४) चतुर्सिंग कांगोरीच्या किल्ल्यावर कैदेंत होते, तेथेच मृत्यू पावले.
(१५) लाडया न्हावी प्रतिनिधीचे फार लोभांत, आपलेपेक्षा त्याचा इतमाम अधिक व सारा भार त्याजकडेस, असे झालें होते. त्याची वर्तणूक नीट नाहीं, सबब गोखले यांनी कैद करून कांगोरीस पाठविला. त्यास किल्ल्यावरून लोटून दिल्हा.
(१६) चिमणाजी नारायण याजवर इतराजी होऊन त्यास कोकणांत रवाना केले. त्यांचे ऐवजी रामचंद्र भिकाजी करंदीकर कामांत वागूं लागले.
(१७) श्रीमंतांचे तर्फेने मोर दीक्षित व बाळाजी लक्ष्मण यांनी साहेबाजवळ बोलणी बोलोन तहनामा ठरविला. त्यांतील हांशील वसईचे मुक्कामी १९ कलमांचा तहनामा ठरविला. त्याजवर पुणे मुक्कामी सात कलमांचा तहनामा झाला. त्याजवर मध्ये खलेल आला होता तो दूर करावयाकरितां, पहिले तहनामे झाले आहेत. त्यांचे मजबुतीकरितां हल्ली त्याच तहनाम्यांची कलमें लिहिली जात आहेत.
(१) गंगाधरशास्त्री कारभारी व वकील निसबत आनंदराव गायकवाड यास त्रिंबकजी डेंगळे यांणी मारिलें. त्यास, असें कर्म केलें त्याचें पारपत्य व्हावें व पुढें कोणी असे कर्म न करी अशी दहशत सर्वांस पडावी हें करणें दोहीं सरकारास लाजीस आहे. त्यावरून त्रिंबकजी डेंगळे इंग्रजी सरकारचे हवाली जाहाले. तेथून कैदेतून निघून गेले. आणि बंड जमा करून लोकांस मारावें व लुटावें असें करूं लागले. हा दुसरा अपराध केला. त्यास, श्रीमंत अंत:करणापासून स्वच्छतेने करार करतात ते त्रिंबकजीस आश्रय न देतां मगदूर प्रयत्न करून इंग्रजी सरकारचे हवाली होईल याप्रमाणें करार करतात. त्यास तो हाती येईतोपर्यंत त्याचे कबिले व मुलें सरकार कंपणी इंग्रज यांजवळ असावी. व त्याचे बंडांत सामील आहेत त्यादिवशीं श्रीमंतांनी सनदा लिहिल्या आहेत त्याप्रमाणें जे सरकारांत रुजू न होतील त्यांचे पारिपत्य चांगले तऱ्हेनें होईल याप्रमाणें श्रीमंतांचें सरकारांतून होत आहे.