Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
वतनाची कष्ट मेहनत जीवाभ्य श्रमसाहस गणोजीराव शिर्के यांणींच केले ह्मणून चंदीचे साक्षींत गोतहजरापूर्वीच पुरले. त्याच समयीं विठोजी व दौलतराव व कान्होजीराव व बहिर्जीराव शिर्के यांशीं महाराजांनीं हुजूर आणून मनसुबीस राजी होऊन राजीनामे देणें ह्मणून आज्ञा केली. ते जामीन न देत व मनसुबीस उभे न राहात. यास्तव दोन्ही वतनास त्याजला संबंध नाहीं. तुमचे वडिलीं दोनी वतनें अनभवावीं ऐशीं राजपत्रें जालींच आहेत. त्याजउपरी पुन्हां महाराजापाशीं उभयतां वादियांचा फिरोन कजिया पडिला. यास्तव पुन्हां चंदीचे साक्ष मोझे मनास आणून महाराजांनीं गोतमहजर शिक्यानिशीं करून दिल्हा. त्याच अन्वयें कान्होजीराव शिर्के यांणीं संवादपत्रें लेहून दिले. व मातुश्री ताराऊसाहेब यांणीं चंदीचे माहितगिरीनें मनास आणून शपथपुरस्सर निवाडपत्र करून दिल्हें. येकुण तिन्हीं पत्रें यथान्यायें जालीं असतां फिरोन कजिया उपस्थित करून, कान्होजी शिर्के यांणीं श्रीकृष्णेचें दिव्य केलें. त्याचा विचार पाहतां तुह्मां उभयतां वादियांचा मूळपुरुष वाघोजी शिर्के; त्यास पुत्र तानाजीराव, पिलाजीराव येकूण दोघे; पैकीं वडील तान्हाजी याशी पुत्र कानोजी; त्याचे रामोजी; त्याचे कान्होजी; त्याचे हल्लीं लक्ष्मणराव; धाकटे पिलाजी; त्यास पुत्र देवजीराजे शिर्के; त्यांचे हल्लीं तुह्मी : हा एका मूळपुरुषाचा वंश असतां मामले रायरी शिर्काण येथील सरदेशमुखीचे वतनाचे वडीलपण शिक्का आपला ऐसे देवजी शिर्के ह्मणत नसतां, वडीलपण आह्मी देऊं ते देवजीराव शिर्के यांणीं घ्यावें ऐसें कान्होजीराव शिर्के यांचे बोलणें असतां, वडीलपण शिक्का आपला ह्मणून श्रीकृष्णेचें दिव्य कान्होजीराव यांणीं केलें. त्यास, कान्होजीराव यांचे घराणें वडील असतां वडीलपण शिक्का आपला ह्मणून दिव्य केलें, तें दिव्य विरुध्द कैसे पडले ? व दिव्याचे उच्चारांत देवजी शिर्के यांशी वतनास संबंध नाहीं ऐसें असतें तरी दिव्य लागतें. ते गोष्ट कांहींच नाहीं. तेव्हां वडील असतां वडीलपणाचें दिव्य केल्यामुळें देवजी शिर्के यांशी वतनास संबंध नाहीं ऐसें कसें घडेल ? वडिलोपार्जित वृत्तीचे जीर्णोध्दाराविशी कोणत्याही भावबंदांनीं टकापैका खर्च करून मेहनत केली असिली तथापि वरकड भावापासून तक्षिमेप्रमाणें खर्चाचा ऐवज घेऊन ज्याचा विभाग त्यास द्यावा असें असतां, कष्ट मेहनत येकले रामोजीराव शिर्के यांणींच केली ऐसेंही नाहीं. राज्यांत मातबरी गणोजी राजे यांची. त्यांचे भिडेवरून व त्यांणीं चंदीचे समयीं जिवाभ्य मेहनत श्रमसाहस केल्यामुळें दोनी वतनें साधन केलीं. ऐसे चंदीचे साक्षमोझे महाराजांनीं पाहिलें असतां, त्याविशी दिव्य करणें योग्य नव्हे हाच अर्थ महाराजांनीं समजोन, पुढें दोन वर्षांनीं तुळाजी आंग्रे सरखेल यांशीं हातरोखा सौभाग्यवती सकवारबाईसाहेब यांचे आग्रहास्तव दिव्यपत्राचें अन्वयें सिध्द झाला त्या हातरोख्याचे शेवटीं माहाराजांनीं स्वदस्तुरें लिहिलें आहे कीं, यांशी पूर्वी राजश्रियांहीं पत्रें वतनाचीं दिल्हीं आहेत त्याप्रमाणें आह्मीं दिल्ही आहेत, त्याप्रमाणें तुह्मी चालवणें. उजूर न करणें ह्मणून लिहिलें आहे. तेव्हां दिव्य भिडेमुळें जालें असें तेच समयीं महाराजांचे ध्यानांत येऊन पूर्वील पत्राप्रमाणें चालवणें ह्मणून लिहिलें आहे. व या दिव्याचा विचार सालतिगस्ता तुमचे नांवें निवाडपत्र दिल्हें आहे त्या निवाडपत्रीं सर्व मजकूर उगवलाच आहे.