Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

दिल्लीचा पातशाहा औरंगझेब याणें संभाजी महाराजांस तुळापुरी ठार करून, त्यांची बायको येसूबाई व मुलगा ह्यांस इ. स. १६९०त धरिले. त्यावेळेस शिवाजीचे वय ६ वर्षांचे होते. औरंगझेबाची मुलगी बेगम इणें शिवाजीस आपला मुलगा समजून त्याचे व
येसूबाईचें पालण उत्तम प्रकारे केलें. संभाजी आपल्याकरितां मेला, सबब लग्न करणे नाहीं, असा निश्चय बेगमेनें केला होता. औरंगझेबाचा मृत्युकाल समीप आल्यावेळी बेगमेनें विनंति शाहूस मुक्त करण्याविषयी केली. तेव्हा पातशाहानें उत्तर दिल्हें की मजला हल्ली तीन पुत्र आहेत व एक कन्या तूं आहेस. तुझा चौथा वाटा तुझे पुत्रास ह्मणजे शाहूस दिला व याशिवाय सहा सुभे दक्षणची सरदेशमुखी वतन दिल्हे. असे सांगून सनदा तयार करून मुदबखांतून एक भाकर आणून त्यातून अर्धी भाकर व सनदा शाहूचे ओट्यांत घातल्या आणि मस्तकीं हात ठेवून बहुत दिवस राज्य करशील असा आशीर्वाद दिल्हा आणि आह्मीं असतां यास सोडिले असता आमचे नेमांत अंतर पडेल याजकरितां आमचे पश्चात् यास सोडावे असे बेगमेस बोलून शके १६२८ मार्गशीर्ष  व. ३० शनिवारी निवर्तले, नगर मुकामीं त्यांची कबर रोज्यास नेऊन केली. ती मोकळी आहे. तिजवर घुमट नाहीं. त्या कबरीवर बेगमेंने आपल्या हातें जाईचा वेल लाविला तो अद्याप कायम असून, बारमाहीं फुले येऊन कबरीवर पडत असतात. ग्रांट डफचे बखरीत ता. २१ फेब्रुवारी सन १७०७ इसवीत मयत झाल्याची तारीख लिहिली आहे तींत व वरील मित्तींत अजमासें दोन महिन्यांचे अंतर आहे. 

औरंगझेबास तीन पुत्र होते, वडील सुलतान माजूम, दुसरा अजीमशा व तिसरा कामबक्ष. त्यांमध्यें तक्ताविषयीं भांडण लागलें. सुलतान माजूम व अजीमशा यांची लढाई झाली. तींत अजीमशा पुत्रासहित मरण पावला. कामबक्ष याजवर सुलतान माजूम याणें झुलफिकरखानास पाठविलें. त्या लढाईत कामबक्ष मरण पावला. मग माजूम तक्ताधीश झाला. सुलतान माजूम याने झुलफिकरखानास दक्षिण प्रांतांचा अधिकार दिला. औरंगझेब मरतेसमयी जवळ एक पुत्र अजीमशा होता. त्यानें मराठ्यांचे उपद्रवामुळें शाहूची आई व भाऊ व बायको ओलीस ठेऊन शाहूस मुक्त केलें. तेव्हां शाहूमहाराजांनी त्यांशी करार केला होता कीं मला राज्यपद मिळाल्यास मी तुमचे आज्ञेंत वागेन. त्याजवर अजीमशानें उत्तर केले की, जर तूं नीट वागलास तर तुझे बापानें घेतलेला मुलूख व भीमा आणि गोदा या दरम्यानच्या मुलूखांपैकी कांहीं देऊं.