Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
इ. स. १७०० मध्यें मराठ्यांच्या संरक्षणाचे कामीं ज्यांचा विशेष उपयोग झाला, ते किल्ले जमीनदोस्त करण्याचा औरंगजेबानें निश्चय केला. याकरतां तयार केलेल्या सैन्याचें आधिपत्य स्वतःकडे घेऊन झुलपिकारखानानें राजारामाच्या सैन्याशीं मैदानावर सामना द्यावा असा त्याला हुकूम दिला. याप्रमाणें किल्ल्यामागून किल्ले काबीज करून त्यानें अखेरीस साता-यास वेढा दिला. प्रयागजी प्रभूनें पुष्कळ वेळ मोठ्या शौर्यानें किल्लयाचें रक्षण केलें, पण शेवटीं किल्ला औरंगजेबाचे हातीं आला. याच सुमारास सिंहगड मुक्कामीं राजाराम मरण पावला व शाहू अजून मोंगलाच्या छावणींत अटकेंत असल्याकारणानें राजारामाचा वडील मुलगा दहा वर्षांचा होता त्यास गादीवर बसवून रामचंद्रपंत पूर्वीप्रमाणें राज्याची व्यवस्था पाहूं लागले. धनाजीस कर्नाटकांतून परत बोलाविलें व त्याच्या आणि रामचंद्रपंताच्या देखरेखीखालीं मराठे सरदार पूर्वीसारखेच नेटानें लढाई चालवून सर्व मुलखांतून चौथाई, सरदेशमुखी व घासदाणासुद्धां वसूल करीत. इकडे बादशहाही हट्टास पेटला व त्यानें सुरूं केलेलें युद्ध तसेंच चालू ठेवून चार वर्षांत छापे घालून किल्ल्यामागून किल्ले घेतले. परंतु औरंगजेबानें धरलेला हा मार्ग त्यास हितावह नसून उलट जाचकच झाला. किल्ल्यांतून बाहेर पडल्यावर मराठे सर्व देशभर पसरले. खानदेश, व-हाड व गुजराथ या प्रांतांवर त्यांनी स्वारी केली. एक टोळी तर नमदा उतरून माळव्यांत शिरली व तेथेंच तिनें आपलें कायमचें ठाणें दिलें. सरतेशेवटीं इ. स. १७०५ मध्यें औरंगजेबाच्या लष्करी व मुलकी सल्लामसलतगारांनीं, मराठ्यांबरोबर तह करावा, अशी त्याला सल्ला दिली. त्यानें बादशहाचें मन थोडेसें वळलें, व महाराष्ट्रांतील सहा सुम्यांतील सरदेशमुखीचा हक्क मराठ्यांनीं घेऊन त्याबद्दल महाराष्ट्रांत व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्यांचेवर असावी अशा शर्तीवर त्यांच्याशीं बादशहा तह करण्यास कबूल झाला. आपल्या पदरच्या शिंदे व जाधव या मराठे घराण्यांतील दोन मुलींशीं बादशहानें शाहूराजाचें लग्न करून त्याला अक्कलकोट, इंदापूरनिवासें व बारामती या जहागिरी अंदण दिल्या. परंतु मराठ्यांनीं आपल्या मागण्या वाढविल्यामुळें हें तहाचें बोलणें तसेंच तहकूब राहिलें. मोंगलांनीं लढाईचें काम जेमतेम चालूं ठेविलें. पण मराठ्यांनीं पिमळा परत आपल्या स्वाधीन करून घेऊन, आपला राजा शिवाजी व त्याची आई ताराबाई यांचे राहण्याचें ठिकाण केलें. पावनगड, वसंतगड, सिंहगड, राजगड व सातारा हे किल्ले मोंगलांकडून परत घेतले व पुढें (इ. स. १७०७) धनाजीनें पुणें व चाकण हीही घेतलीं. याप्रमाणें औरंगजेबाचे सर्व बेत फसले, तेव्हां मराठेमंडळांत फाटाफूट करण्याच्या इच्छेनें शाहूच्या हातून स्वतःचे सहीचें एक पत्र मराठे ---नरांस, त्यांचे आपण राजे या नात्यानें, लिहविलें. त्यांत मरा...नीं बादशहास शरण यावें असा उपदेश केला होता. हा बादश---चा अगदीं शेवटचा, निरुपाय होऊन केलेला प्रयत्न, पण त्याचासुद्धां कांहीं उपयोग झाला नाहीं. औरंगजेब जिवंत असेपर्यंत शाहूच्या सुटकेविषयीं कांहींच प्रयत्न झाला नाहीं. पण त्यानें लावलेलें तहाचें बोलणें, व त्याच्या सांगण्यावरून शाहूनें लिहिलेलीं पत्रें, यांवरून असें दिसतें कीं, आज वीस वर्षेपर्यंत मराठ्यांविरुद्ध युद्ध चालविलें, ही आपण अनर्थकारक चूक केली अशी बादशहाची खात्री झाली. त्याचें भव्य सैन्य निरुपयोगी झालें, पुष्कळ ठार झालें; त्याचा स्वतःचा तंबू लुटून नेला. खुद्द बादशहाही पकडला जाण्याच्या अगदीं बेतांत होता. तेव्हां अहमदनगर येथें मरतेवेळीं “आपला जन्म फुकट गेला '' असे जे बादशहानें उद्गार काढले ते निष्कारण नव्हते. बिचारा बादशहा ! सर्व आशा व महत्वाकांक्षा यांच्या चुराड्याखालीं खंगलेला-अखेरीस इहलोक सोडून चालता झाला.