मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

परंतु याप्रमाणें जरी महाराष्ट्र देशाच्या वैभवास मोठी ओंहटी लागली होती व पुढें चांगले दिवस येतील अशी आशा करण्यास कुठें कांहीं जागा नव्हती, तरी या प्राप्त झालेल्या संकटांनींच शिवाजीच्या तालमींत तयार झालेल्या देशाभिमान्यांच्या एका टोळीस, ते द्रव्यहीन व साहाय्यहीन होते तरी, आपलें गेलेलें राष्ट्रीय स्वातंत्र्य परत मिळविण्यास व औरंगजेबाचें अजस्त्र सैन्य हिंदुस्थानांत परत हुसकून लावण्यास तयार होण्याविषयीं जागृत केलें. शिवाजीचा धाकटा मुलगा राजाराम यास संभाजीनें रायगडीं अटकेंत ठेविलें होतें. संभाजी मेल्यानंतर रायगड मोंगलांच्या ताब्यांत जाण्याच्या आंत राजाराम किल्ल्यांतून पळाला व तोच या टोळीचा मुख्य नायक झाला. त्याचें वय यावेळेस सुमारें वीस वर्षांचें होतें, तरी पण बापाच्या अंगचे पुष्कळ अलौकिक गुणत्याचें धाडस व चातुर्य, दुर्गुणापासून परावृत्ति, शांत स्वभाव व औदार्य, यांहीपेक्षां श्रेष्ठ, आपल्या देशबांधवाचे ठिकाणीं आपल्याविषयी विश्वास उत्पन्न करण्याची त्याची हातोटी-राजारामाचे आंगी जन्मतःचे आले होते. शाहू औरंगजेबाचे अटकेंत होता. त्याचें आपण प्रतिनिधि आहोंत असें राजाराम आपणास ह्मणवून घेत असे. गादीला शाहूचा हक्क आपल्यापेक्षां जास्त असें समजून तो सिंहासनावर कधींही बसला नाहीं. शिवाजीच्या वेळच्या निराजी रावजी न्यायाधीशाचा मुलगा ‘प्रल्हाद निराजी, या प्रसंगी राजारामाचा मुख्य मसलतगार होता. संभाजीच्या कारकीर्दीत प्रल्हाद निराजी नोकरी कमी झाल्यामुळें घरींच असून, काय होईल तें डोळ्यांनीं पहावें, असा त्याचा क्रम होता. पण त्यावेळच्या मराठे लोकांत शहाणा काय तो तोच अशी त्याची ख्याति होती. ग्रांट डफ साहेब ब्राह्मण लोकांची स्तुति करण्यांत इतका चिकट ना? पण तोसुद्धां प्रहाद निराजी, अद्वितीय पुरुष होता, असें कबूल करतो. स्वहिताबद्दल त्याचा अगदीं निष्काळजीपणा संबंधानें हें ब्राह्मण मुत्सद्यांमध्यें खरोखर अश्रुतपूर्व उदाहरण होय. राजाराम व प्रल्हाद निराजी हे दोघेही, त्यांनीं हातीं घेतलेलें स्वराज्यसंरक्षणाचें महत्कुत्य अर्धेमुर्धे सिद्धीस जातें न जातें तोंच इहलोक सोडून गेले. तरी पण आपल्या देशावर ओढवलेल्या संकटांतून आपण पार पडून यशःप्राप्ति थोड्याच काळांत मिळणार, आणि केल्या श्रमाचें साफल्य होणार हें खास, अशी खात्री होऊन त्यांना समाधान वाटे. रघुनाथपंत हणमंते नांवाचा दुसरा एक स्वदेशाभिमानी होता. हा शहाजीच्या कर्नाटकांतील जहागीरीवर नेमलेल्या ब्राह्मण कारकुनाचा मुलगा होय. तो मुळींच स्वकार्यसाधु नसून स्वातंत्र्य प्रिय आहे अशी त्याची ख्याति असे. व्यंकोजी तंजावरमध्यें होता, त्यास व संभाजीस आपली स्थिति सुधारण्यास त्यानें पुष्कळ सांगून पाहिलें, परंतु व्यर्थ. शेवटीं जेव्हां वरील प्रसंग प्राप्त झाला, तेव्हां त्याला प्रल्हाद निराज़ीची मसलत पसंत पडली. तंजावर प्रांतांत शहाजीच्या जहागिरीत एक जिंजी नांवाचा किल्ला होता, तो त्यानें दुरुस्त करून राजाराम व त्याच्या पक्षाचे लोक तेथें येण्याची वाट पहात बसला. निळे मोरेश्वर - पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे चिरंजीव-- यांना, जिंजी किल्ला आपल्या ताब्यात घेऊन त्याची तटबंदी पुरी करण्याकरितां पुढें पाठविलें. महाराष्ट्रांत राहून गनीमी काव्याच्या पद्धतीनें लढाई चालूं ठेवावी म्हणून कित्येक लढवय्यांना हुकूम मिळाले. त्यापैकीं कांहीं ब्राह्मण होते. त्यांमध्यें अतिशय प्रसिद्ध म्हटले आणजे, रामचंद्रपंत अमात्य-कोल्हापूर संस्थानांतील हल्लीच्या पंतअमात्य घराण्याचे पूर्वन- हे होत. शिवाजीच्या वेळेस, मोरोपंत पिंगळ्याप्रमाणेंच, त्याचे मुख्य मंत्री व सेनापती आबाजी सोनदेव होते, यांचे रामचंद्रपंत चिरंजीव होत. या रामचंद्रपंतांवर सर्वाचा इतका दृढ विश्वास बसला होता कीं, प्रसंग पडेल तसें त्यानें वागावें.-त्याच्याविरुद्ध कोणीही जाऊं नये-इतका अधिकार त्याला दिला होता. खुद्द राजारामानें आपल्या पत्नीस त्याच्याच देखरेखीखालीं ठेविलें. तसेंच बहुतेक सर्व मराठे सरदारांनीं, दक्षिणचा रस्ता धरला तेव्हां, आपआपली कुटुंबें विशाळगड येथें त्याच्याच आश्रयास ठेविलीं.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries