Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
याप्रमाणें धर्मसंबंधी चळवळीच्या मुख्य मुख्य भागाचें विवेचन आह्मीं केलें आहे. ही चळवळ पंधराव्या शतकांत ज्ञानदेवाचा जन्म झाल्यापासून तों गेल्या शतकाच्या अखेरपर्येत सारखी चालू राहून पारमार्थिक सद्गगुणांची हळू हळू वाढ झाली. या देशच्या प्राकृत भाषेंत एक बहुमोल वाङ्मय या चळवळीमुळेंच आह्मांस उपलब्ध झालें. ज्ञातिजन्य श्रेष्ठत्वाच्या वेडगळ कल्पनेचा जोरही या चळवळीनेंच कमी झाला. शूद्रवर्गाला पारमार्थिक शिक्षण देऊन, त्यांचें समाजामध्यें महत्व वाढवून ब्राह्मणांच्या तोडीस या चळवळीनेंच आणून बसविलें. कुटुंबसंबंधास पावित्र्य प्राप्त होऊन स्त्रियांची योग्यता वाढली. राष्ट्राची बंधुप्रीति वाढवून, परस्परांनीं सहनशील होऊन जूट कायम राखणेस लोकांना शिकविलें. या चळवळीनेंच मुसलमानांशीं समेट करण्याच्या कल्पनेचा उपक्रम करून कांहीं अंशीं ती कल्पना अमलांतही आणली. विधि व उपचार, ज्ञानार्जन व चिंतन, यात्रा, उपोषणें यापेक्षां ईश्वरावर दृढ प्रेम व विश्वास ठेऊन त्याचें भजन करण्याचें महत्व जास्त, असें सिद्ध केलें. अनेक देवमतापासून होणा-या अत्याचाराचा ओघ कमी केला.
या सर्व त-हांनीं राष्ट्रास आचारशक्ति व विचारशक्ति यांमध्यें श्रेष्ठत्व आणून देण्यास या चळवळीचाच उपयोग झाला. व परधर्मी सत्तेच्या ठिकाणीं एक जुटीची एतद्देशीय सत्ता पुन: प्रस्थापित करण्याच्या महत् कृत्यांत पुढारीपणा घेण्यास महाराष्ट्र देशाची चांगली तयारी करून दिली. तशी तयारी हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही देशाची झाली नाहीं. महाराष्ट्रधर्माचीं मुख्य मुख्य तत्वें आह्मांस हींच दिसतात, व समर्थ रामदास साधूंनी शिवाजीचा पुत्र संभाजी यास, बापाचें अनुकरण करून, सोशिक व उदार, पारमार्थिक पण मूर्तिपूजेविरुद्ध नसणारा असा हा आपला धर्म, त्याचा प्रसार करण्याचा उपदेश केला तेव्हां समर्थांच्या मनांत हींच तत्वें वास करीत होतीं.