Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

वरील सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजे असें दिसतें कीं, शिवाजीच्या जन्मकाळीं व त्याच्या बाळपणी मोंगलांचेंच कायतें दक्षिणेंत प्रस्थ मानलें होतें. हे मोंगल इतके प्रबल झाले होते कीं, दक्षिणेंतील कोणताही राजा त्यांचें पारिपत्य करण्यास समर्थ नव्हता. काबूल पासून बंगालच्या उपसागरापर्येत व कामूक टेकड्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत चोहेकडे त्यांचे राज्य अवाढव्य पसरलें असल्यामुळें लोकांस त्यांचा फारच बाऊ वाटत होता. १२१६ त अल्लाउद्दीननें दक्षिणेवर स्वारी केली, तेव्हां महाराष्ट्रावर जो प्रसंग गुदरला, तोच प्रसंग फिरून ३०० वर्षांनी त्या देशावर पुनः आला. पण यावेळी महाराष्ट्राची स्थिति किंचित् भिन्न होती. १२ १६ त आलेल्या लाटेपुढें निमूटपणें माना लववून हिंदूनीं आपला बचाव करून घेतला. पण आतां त्यांच्या अंगी थोडीशी ताकत भाली होती. पारतंत्र्यरूपी खडतर शिक्षकानें गेल्या ३०० वर्षात त्यास बरेंच शहाणें केलें होतें. परकीय अमल त्यांणीं बराच झुगारून दिला होता व गुलामगिरींत भोगाव्या लागणा-या दुःसह यातना त्यांणीं ब-याच सह्य केल्या होत्या. न्यायमनसुब्याचें व दरबारचें बहुतेक सर्व काम त्यांच्या देशभाषेंतच चालले होते. मुलकी व्यवस्था सर्व त्यांच्या हाती होती. त्यांच्या सेनापतींनी रणांगणावर जयश्री मिळविली होती. व राजकीय मसलतींत त्यांच्याच मुत्सद्यांची सल्ला मानली जात असे. मुरारराव व शहाजी भोसले हे विजापूर दरबारचे मुख्य आधारस्तंभच होऊन बसले होते. गोवळकोंडची सर्व सत्ता मदन पंडिताच्या हातीं होती. पश्चिमघाट, डोंगरी किल्ले व मावळप्रदेश त्यांच्याच सरदारांच्या ताब्यांत होता. कृष्णेच्या उगमापासून ते थेट वारणा नदीपर्यंत सर्व घाटमाथा चंद्रराव मोन्याकडे होता. दक्षिण कोंकण सांवताकडे, फलटण निंबाळकराकडे व सातारचा पूर्वमाग डफळे व माने यांजकडे होता. पुणें प्रांतांतील मावळापासून पूर्वेस बारामती इंदापूरपर्यंत सर्व मुलूख भोसल्याकडे जहागीर होता. घोरपडे, घाटगे, महाडिक, मोहिते, मामुळकर वगैरे मराठे सरदारांच्या पदरी बरेंच घोडेस्वार पायदळ वगैरे सैन्य होतें. गोवळकोंडा, विजापूर, अहमदनगर या दरबारांत खरे शूर व खरे लढवय्ये काय ते मराठेच होते. या मराठे बहाद्दरांनी नखशिखांत हत्यारांनी संरक्षण केलेल्या मोगल शिपायांशी टक्कर देऊन त्यांचें बलाबल पूर्णपणें समजून घेतलें होतें. अशा प्रकारची महाराष्ट्राची यावेळी स्थिति असल्यामुळें, मुसलमानांनी दक्षिणेवर ही दुस-यानें स्वारी केली तेव्हां लोकांच्या मनांत नव्या नव्या कल्पना विकास पावूं लागल्या. गेल्या ३०० वर्षांत मुसलमानांनी केलेल्या धर्मछलाचें व जुलमाचें भयंकर चित्र लोकांच्या डोळ्यापुढें मूर्तिमंत उमें राहून भावी येणा-या संकटाची त्यांस भीति वाटूं लागली. जो तो या संकटाचे परिमार्जन कसें करावे या विचारास लागला. अल्लाउद्दीननें स्वारी केली तेव्हां असें विचार लोकांच्या मनांत घोळत नव्हते. त्यावेळीं मुसलमान लोक प्रथम दक्षिणेंत आल्यामुळें त्यापासून होणान्या जुलुमाची लोकांस कल्पना नव्हती. गेल्या ३०० वर्षांत लोकांना हा अनुभव पूर्णपणें आल्यानें पुनः मुसलमानास दक्षिणेंत थारा देण्यास लोक अगदीं राजी नव्हते. शिवाय गेल्या ३०० वर्षांत जसजसा मुसलमानांनी धर्मछल आरंभला, तसतसा हिंदू लोकांचा धर्माभिमान जागृत होत चालला. स्वधर्मरक्षणार्थ लोक देह खर्ची घालण्यास तयार झाले होते. विल्क्स् साहेबांनीं म्हेसूरचा इतिहास लिहिला आहे, त्यांत त्यांनी एक चमत्कारिक हकीकत दिली आहे. ते म्हणतात की, आपणास मॅकन्झी साहेबांनी जमविलेल्या हस्तलिखितांत, १६ ४६ त लिहिलेले एक हस्तलिखित सांपडले होते. या हस्तलिखितांत धर्माचा व नीतीचा होत असलेला -हास व मोठमोठ्या थोर पुरुषास भोगावी लागणारी संकटे यांचें फार मनोवेधक वर्णन केलें होतें व शेवटीं असें भाकित केलें होतें की, ईशकृपेनें हा दुःखद काळ जाऊन, व पारतंत्र्यापासून या देशाची लौकरच सुटका होईल. त्यावेळी सर्वत्र आनंदीआनंद होऊन कुमारिका गाणीं गातील. व आकाशांतून पुष्पवृष्टि होईल’. शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिबलानें व बाहुबलानें दक्षिणेची परकीयांच्या गुलामगिरींतून जी सुटका केली तीस अनुलक्षूनच हें भाकित होतें असा सार्वत्रिक समज असल्याचें विल्क्स् साहेब लिहितात. हे ह्मणणें कितपत खरें असेल, हें सांगवत नाहीं. १६ ४६ त म्हैसूराकडे हें वरील भाकित लिहिलें गेलें, त्यावेळीं पुणें प्रांताच्या बाहेर शिवाजीचे नांवही कोणास माहीत नव्हतें. तेव्हां शिवाजीस उद्देशून हें भाकित झालें होतें असें कसें ह्मणावें ?