Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
आपल्या स्वातंत्र्यावर मुसलमानांनी आणलेल्या पहिल्या संकटाशीं मोठ्या धैर्यानें टक्कर देऊन महाराष्ट्रीयांनीं आपली सुटका करून घेतली. सरासरी ३०० वर्षे त्यांना या खटपटींत घालवावीं लागलीं; पण इतक्या अवधींत आपल्या अंगीं कांही अलौकिक गुण आहेत असें त्यांणीं दाखविलें. त्यांनीं कांहीं दिवस प्रसंगास पाठच दिली. पुढें मुसलमान जसजसे चैनी, खातर होत गेले, तसतसे त्यांस जेरीस आणून व त्यांची सत्ता हिरावून घेऊन महाराष्ट्रीयांनीं आपली मुक्तता केली. परंतु हल्लींचा प्रसंग फारच भयंकर होता. पूर्वी उपयोगीं पडलेल्या उपायांनी या नवीन । आलेल्या मंकटांतून मुळींच पार पडतां आलें नसतें. या कामीं नवीन उपायांचीच योजना करणें जरूर होतें. मराठ्यांत स्वदेश आणि स्वधर्म यांचें नवीन वारें भरून, चोहींकडे पांगापांग झालेल्या त्यांच्या शक्तीम एकवटून देशकार्याकडे तिचा उपयोग करून घेणें अत्यंत अवश्य होतें. शिवाजीच्या अंगचा विलक्षण गुण हाच होता कीं, त्याणें ह्या नवीन आलेल्या संकटाचें खरें स्वरूप जाणून स्वदेश आणि स्वधर्म या कामाकरतां आपल्या प्राणाचेही बळी देण्यास महाराष्ट्रीयांनीं - मागें पुढें पाहूं नये असा अलौकिक आवेश त्यांच्या अंगांत आणून सोडला. शिवाजीनें मराठ्यांच्या अंगी नवीन जोम किंवा शक्ति उत्पन्न केली असें नाहीं. त्यांच्या अंगीं ती मूळची होतीच; पण ती एकवटावयाचीच कायती जरूर होती. शिवाजीनें ती एकवटून तिचा महत्कार्याकडे उपयोग केला. त्याणें जी देशसेवा बनाविली, त्याबद्दल महाराष्ट्रीयांम त्याचे उतराई कधींच होतां येणार नाहीं. ही मोठी कामगिरी त्याणें बनाविली ह्मणूनच त्यास महाराष्ट्रीयांनी पूज्य मानलें पाहिजे. शिवाजीच्या चरित्रावरून तत्कालीन मराठ्यांच्या शक्तीचीच केवळ नव्हे, तर देशाभिमान, स्वधर्मप्रीति, समाजहित वगैरे बाबतींत ज्या उदात्त कल्पना लोकांच्या मनांत खेळूं लागल्या होत्या. त्यांचीही बरोबर अटकळ करतां येते. लोक शिवाजीस ईश्वरीअंश मानीत होते तें वृथा नव्हे. त्याच्यावर लोकांचा विश्वास विनाकारण नव्हता. स्वदेशाची पारतंत्र्यांतून सुटका करण्याकरितांच आपला अवतार आहे, अशी खरोखर त्याच्या मनांत प्रेरणा झाल्यामुळें, त्याच्या चेह-यावर एकप्रकारचें विलक्षण तेज चमकत असे. त्यास पाहिल्यावरोवर ज्या सत्कार्यार्थ हा झटत आहे, त्या सत्कार्यास कायावाचामनेंकरून साहाय्य करावें अशी प्रत्येकाच्या मनांत म्फूर्ति उत्पन्न झाल्याविना रहात नसे. या महानुभावाचा प्रभाव असा कांहीं चमत्कारिक होता कीं, त्याणें उत्पन्न केलेल्या स्वदेशस्वधर्माभिमानरूपी जादूनें केवळ त्याचीच पिढी भारली गेली नाहीं तर पुढील पिढ्यांतही या नवीन वा-याचा संचार दृष्टीस पडत होता. सर्व हिंदुस्थानभर जेथें जेथें मराठे होते, तेथें तेथें स्वराज्य उभारण्याचे बेत चालू झाले. अशाप्रकारें कांहीं अंशीं देशाच्या पूर्व इतिहासानें, कांहीं अंशीं देशांत सर्वत्र प्रचलित झालेल्या नवीन धर्मकल्पनांनीं व विशेषतः ३०० वर्षेपर्यंत मुसलमानी अमलांत मिळालेल्या लष्करी शिक्षणानें पुढें उत्पन्न होणा-या स्वराज्यरूपी महावृक्षाचें बीं रुजविण्याकरितां जमीन तयार केली.