Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १४६.
१६९८ चैत्र शुद्ध १०.
राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सुाा सन सीत सबैन मया व अलफ. फितुरी व धवशाजवळ कारनेल किटिण कूच करून जातात. धवशाकडील राजकारण लागलें आहे. त्याची वाट आठ दाहा दिवस पाहावी लागते. तिकडील राजकारण होतें न होतें. याजमुळें फौजेचा जथ राखिला पाहिजे. इंग्रज तरी कूच करून जातात. मुंबईचा हुकूम यांस एका महिन्याचा. त्यास, महिन्याचा दिवस तीन चार बाकी आहेत. दोन चार दिवस आह्मीं यांजवळ रजबदल करून मागितलें. येकूण सात आठ दहा दिवस आह्माजवळ राहावें, अैसा करार करून घेतला असतां, मध्येंच कूच करून जाऊं लागतात. कारण कीं, फत्तेसिंगाकडील ऐवज यांजकडे दाहा लक्ष पैकीं सरकारांत सवासाहा लक्ष पावला असतां दाहाची पावती मागतात. न द्यावी तरी दबावून कूच करून जातात. पेंचामुळे उपाय नाहीं. दहा दिवस राहावें ऐसा करार करून घेतला असतां, पावतीची अडणूक दाखवून मध्येंच कूच करून जातात. सबब पावती देणें प्राप्त जाहालें. अडऊन पावती घेतली. जनरालास व तेथील कोशलदार तुमचे मायेचे असतील त्यांस समजाऊन ठेवावें. अद्यापि पावती दिल्ही नाहीं. परंतु आज उद्यां निकडच पडली तरी द्यावी लागेल. जोंपर्यंत चुकेल तोपर्यंत देतच नाहीं. इलाज नाहीं तेव्हां द्यावी लागेल. कांहीं तपसील लाऊन देऊं. यास तरी फत्तेसिंगाकडून तेराची भरती ह्मणोन फत्तेसिंगाकडील कारभारी दोन तीनदां बोलले होते. हे दाहाच पावले ह्मणत होते. तीन वरते घेतले असतील. दाहांत साडेसाहा आह्मांस पावले. साडेतिहीची तफावत. लाख पन्नास हजारही नव्हेत. किती रुपये आह्मी द्यावे. आमचे लस्कर उपाशीं मेलें. आह्मांस व आमचें जनावरांस देखील चंदी मिळतां संकट. सांप्रत पाव चंदी देतों. ऐश्या समयांत हेही रुपये हातीं येत नाहीं. रुपयाविसीं दैवयोगच नाहीं. असो ! येविसी तोड कशी करावी तें तुह्मींच विचार करून लिहिणें. तेथें प्रयत्न होईल तो करणें. हजुर आल्यापेक्षां तुचें तेथें रहाणें बहुत उपयोगी आहे. सांप्रत आह्मांस जनरालाचें येथें येणें. जें देतील तेंच समजून राहाणें. नर्मदातीर भडोच आहे. तेथें राहाण्याचें मानस आहे. शहरापासून पावकोस अर्धकोस राहावेंसें मानस आहे. अथवा पेठेंत बनल्यास राहूं. सर्व भरंवसा त्याचा आहे. काय करितील ते करोत. सर्व हकीकत त्यांस जाहीर करावी. त्यासी प्रतारणा करावयाची नाहीं. जर धवशाकडील राजकारण सिध्द जाहालें तरी श्रीकृपेनें जाहालेसें समजतों. व्हावेंसें दिसतें. परंतु होईल तेव्हां खरें. आतां सर्व आशा सोडून तीर्थवास तरी करावा. जितकें खर्चास मिळलें तितक्यांत संवसार करावा. व्याप करून फळ नाहीं, तेव्हां कशास करावा ? फिरंगी गोवेकर यांजकडीलहि राजकारण आहे. बनलें तरी करितों. हाही मजकूर त्यांचे कानावर घालणें. परंतु सर्वांध्ये श्रेष्ठ अंगरेज. त्यांस सामील करून शत्रूची पारपत्येंहि निमे जाहलीं असतां, फिरोन हिसका बसला. तेव्हां वैराग्य ही प्राप्त जाहालें. तुह्मी ल्याहाल तसें केलें जाईल. शत्रूचें हातीं न जावें इतकेंच पुरें. तीर्थवास, उत्तम स्थल, इतकें मात्र पुरें. जाणिजे. छ ८ सफर.