Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
प्रस्तावना
१०. येणेंप्रमाणे क्रोधादि मनोविकार संशोधकानें चांगलेच जिंकले पाहिजेत. अशीं कुळें सदाच भेटतात, असें नव्हें. कधीं कधीं कित्येक स्त्रिया व पुरुष असें भेटतात कीं, इतिहाससाधनांचा उद्धार करण्याच्या कामीं संशोधकाहूनही ते आस्थेवाईक असतात. मुद्दा एवढाच कीं, संशोधकाच्या कार्यांत आर्जव हा गुण बहुमोल आहे. येथें 'आर्जव' हा शब्द गीतेंतल्या अर्थानें योजिला आहे. क्वचित् प्रसंगी फाटकीं खरडीं, फुटके दगड, मोडकी देवळें व गुळगुळीत नाणीं मिळविणा-या संशोधकाचा उपहासही होण्याचा संभव असतो. परंतु हा प्रकार सामग्रीवाल्यांच्या कोत्या समजुतचीचा असल्याकारणानें, त्याकडे कानाडोळा करणें इष्ट असतें. क्वचित् स्थळीं कठोर बोळवणही होते. परंतु महाराष्ट्रांतील सुजन मंडळींत हा प्रकार अत्यंत विरळ आढळतो.
११. साधनोपलब्धीच्या कामी पडणा-या शारीरिक श्रमाची हकीकत एथपर्यंत झाली. परंतु दुस-या एका तयारीचें वर्णन अद्याप करावयाचें आहे. हें वर्णन संशोधकाच्या स्वतःच्या बौद्धिक तयारींचे आहे. संशोधनाचें काम चोख होण्यास, संशोधकाला आपल्या कामाची व्याप्ति कळली पाहिजे. ती विवक्षित विद्वत्ता असल्यावांचून कळणार नाहीं. प्रथम इतिहासाचा प्रांत कोणता व केवढा त्याची अटकळ संशोधकास पाहिजे. ह्या संसारांत प्रवृत्तीच्या ऐलथडीपासून निवृत्तीच्या पैलथडीपर्यंत व्यक्ति, कुल, समाज, देश, राष्ट्र व मानवजाति यांच्या सर्व प्रकारच्या ज्या असंख्य घडामोडी, त्यांचीं कालदेशावछिन्न जी व्यवस्थित हकीकत तिचें नांव 'इतिहास' आणि सदर घडामोडीचीं जीं फुटकळ प्रमाणें त्यांचें नांव 'इतिहासाचीं साधनें.' त्या साधनांचा शोध करणें हे संशोधकाचें काम. घडामोडी असंख्य असतात. त्यांचें व्यवस्थित आकलन व्हावें, म्हणून वर्गीकरण करणें जरूर होतें. कांही घडामोडी धर्मसंबंधी असतात; कांहीं राजकारणविषयक असतात; कांहीं केवळ समाजविषयक असतात; कांही विद्याविषयक असतात; कांहीं कलाविषयक असतात; आणि कांहीं केवळ व्यापारविषयक असतात. ह्या सहा मुख्य वर्गांचे पुन्हां शेकडों उपवर्ग आहेत. त्या सर्वांवर शोधकाची दृष्टि असली पाहिजे. राजकारणविषयक साधनें तेवढीं घ्यावयाचीं व इतर सोडावयाचीं असें करून चालावयाचें नाहीं. मानवी संसारांत-व्यक्तीच्या, राष्ट्राच्या व अखिलजगाच्या - जे जे लहानमोठे व्यवहार घडतात, त्यांत्यांवर प्रकाश पाडणा-या एकोनएक मिळतील तेवढ्या सर्व साधनांचा संग्रह करण्याची तयारी व दक्षता संशोधकाला असली पाहिजे. ही दक्षता व्यापक दृष्टि असल्यावांचून येणार नाहीं. मिळेल त्या सगळ्यांचा संग्रह करावयाचा, असा परिपाठ ठेवल्यानें प्रायः संग्रह करण्याच्या कामांत दोष रहावयाचा नाहीं. हा फारच स्थूल नियम झाला. तत्रापि, अनुभवान्तीं तोच श्रेयस्कर आहे, अशी खात्री झाली आहे.