Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
प्रस्तावना
८. कर्तबगार कामक-याची उदरनिर्वाहाची सोय येणेंप्रमाणें लागल्यावर, त्यानें मनोविग्रह व इंद्रियनिग्रह पराकाष्ठेचा केला पाहिजे. कनक व कान्ता ह्या दोहोंचा मोह मोठा कठिण आहे. ॐभवतिपक्षीय विद्वानानें स्वतःच्या चैनीकरितां एका पैचाही संग्रह करतां कामा नये; आणि लहानापासून थोरापर्यंत सर्व स्त्रियांना मातु:श्रीप्रमाणें लेखिलें पाहिजे. या दोन मोहांपासून अलिप्त राहणें म्हणजे ब्रह्मचर्याचा निव्वळ ओनामा होय. तो साधल्यानें चित्तवृति अकलंक राहून, ज्ञानज्योतीचें निर्लेप स्फुरण होईल आणि वाटेल त्या व्यवसायांत व शास्त्रांत अपूर्व गति होण्याचा मार्ग खुला होईल. परंतु हा योग कांहीं सोपा नाहीं. प्रथम प्रथम अज्ञ लोकांकडून टीका होण्याचा संभव असतो. कोणी अशा विद्वानाला एककल्ली म्हणेल, कोणी भ्रांतचित्त म्हणेल, कोणी ढोंगी म्हणूनही म्हणण्याला कमी करणार नाहीं. पण ह्या वटवटीला भीक घालतां कामा नये. स्वतः जे भ्रांत आहेत, त्यांना सरळ रस्ता तिरपगडाच दिसतो, हें लक्षांत घेऊन, आपलें व्रत एकनिष्ठेनें चालविलें पाहिजे, अशा हेतूनें कीं कालान्तरानें लोकांना सत्यमार्गाची ओळख पटावी.
९. कर्तबगार कामक-याची इतकी तयारी झाली, म्हणजे त्याने संशोधनाच्या कामाला लागावें. हें काम जितकें नाजूक तितकेंच श्रमाचें आहे. मराठ्यांच्या साम्राज्यांत ग्वाल्हेरपासून तंजावरपर्यंत व रजपुतस्थानापासून कलकत्त्यापर्यंत असें एकही गांव नाहीं कीं, जेथें कांहींना कांहीं तरी ऐतिहासिक सामग्री नाहीं. कोठे कागदपत्रांची दप्तरें आहेत; कोठे महारांचांभारांजवळ ताम्रपत्रें आहेत; कोठें भटांभिक्षुकांजवळ पोथ्यापुस्तकें आहेत; कोठें व्यापा-याउदम्यांजवळ नाणीं आहेत; कोठें देवळांमशिदींत शिलालेख आहेत; आणि कोठें पुरातन इमारती आहेत. इतकेंच नव्हे तर शहरें व गांवें सोडून संशोधक जर अरण्यांत व डोंगरांत भटकला तर तेथे मोडलेली शहरे व गावें आणि किल्ले व लेणी त्याची वाट पहात आहेत. अद्याप डोंगरडोंगरींच्या शेंकडों गुहा शोधावयाच्या आहेत आणि जमिनीत गाडलेलीं शहरें उकरावयाचीं आहेत संशोधक जर पाणबुड्या असेल, तर जुन्या पुष्करण्या, तलाव व कुंडे, जुन्या संस्कृतीची अवशिष्ट भांडारें, त्याच्यापुढें खुलीं करण्यास सज्ज आहेत. अशी ही इतिहाससामग्री अपरंपार आहे. तिशी सामना करण्यास, बिचा-या दरिद्री संशोधकाच्या पायाचे घोडे खंबीर पाहिजेत; तक्रार बिलकुल उपयोगाची नाहीं. माहिती मिळाली कीं, इष्ट स्थानाला जाण्यास ताबडतोब घोडे जुंपले पाहिजेत. इष्ट स्थळी थडकल्यावर, घोड्यांची कामगिरी संपली. यापुढें मनोरथाच्या दो-या तंग कराव्या लागतात. कारण कधीं कधीं मिळालेली माहिती पोकळ असते आणि जिच्या आशेनें इतकी पायपीट केली ती सामग्री त्या स्थळी मुळींच नसते, किंवा असलीच तर ती मोठ्या दिरंगाईनें व मिनतवारीनें मिळावयाची असते.