Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २६५

श्री.
१७०२ मार्गषीर्ष.

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री रावजी स्वामीचे सेवेसीं:-

दिवाकर पुरुषोत्तम कृतानेक नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिला अभिप्राय कळों आला. पूर्वी जाहलेला प्रकार यजमानांनीं खास दस्तूर पत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळलें असेल. फौजेची समजोती होत आहे. चाळीस पंन्नास लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. बाजदबरसात हैदरावरी जाणार, शिंदे, होळकर आपलाले स्थळास निरोप घेऊन छावणीस गेले. उभयतांचें एक्य फार चांगलें जाहलें. ह्मणेन विस्तारें लिहिलें. ऐशियास, पूर्वी श्रीमंत नाना यांचें खासदस्तुर पत्र विस्तारें आलें तें अवलोकनीं संतोष श्रीमंतांस व मजला जाहला आहे, तो पत्रीं कोठवर ल्याहावा? इच्छित प्रकार श्रीहरीनें घडविला, एतद्विशईचा मजकूर पूर्वी लिहिण्यांत आलाच आहे.......चे लिहिल्या वरून तरी कोणताही गुता.........नाहीं. मुख्य श्रीमंत महाराज रावसाहेब यांची एकनिष्ठता, त्याचींच फळें, श्रीनीं दिल्हीं. याउपरी, सर्व बंदोबस्त यथास्थित होऊन येतील. वरकड, इकडील कित्तेक मजकुर पूर्वी लिहिले आहेत व सांप्रत श्रीमंत नाना यांचे सेवेसीं लिहिले आहेत, त्याजवरून कळों येईल. प्रस्तुत माझे शरीरास आराम नाहीं, शूल पंधरा रोजांत जातो, अखंड वायू उदरांत, पोट फुगलेंच असतें, जेवण बंद, दहषतीनें राहिलों, याकरितां श्रीमंतांस विनंति करून क्रव्याधीस अगर आणीक जें मरजीस येईल तें पाठवून द्यावें, हें जरूर करावें. बळवंतरावजीस पुसून ते काय सांगतील तें लिहिणें. वरकड आंगरेज वगैरा वर्तमान व नबाब जफरदोरेचे विशीं रा दादांस सविस्तर सांगितलें ते लिहितील. आजवरी राग मोठा चारीगार होता. एकदां कसेंही अरिष्ट दूर होऊन श्रीमंतांस यश आलें. कुरापत जळून गेली. नाहींतर याच रोगानें आज चारीमास कैसे सख्त दिवस गेले ते श्रीहरीसच ठाऊक ! वरते आपण तीन पत्रें प्रथमचीं पाठविलीं. यावर तर कांहींच इष्ट काजांत नोहती. गावेलगडच दिवस होता. पुढें श्रीहरी काय करवितात तें सर्वत्रास दिसत असे. आतां हें लिहिणे! आबांस रा दादा रोज बोलत कीं, भाऊ देवाजीपंत, मी भाऊ कशाचा ? हें आपणासच लिहिलें होतें आणि तेच दिवस पडावे ऐसें देवानें दाखवून सर्वांची.........सत्यें बाहीर पाडून......आतां तरी नीट बंदोबस्त करावा, हें जर ल्याहावें, तर सर्व बदेबिस्ताविशीं गुरू ! तेथें काय ल्याहावें ? आपलें शरीर आराम जर असेल तर श्रीमंतांपाशीं यावे. श्रीमंत आपासाहेब यांची मरजी फार आहे कीं, श्रीमंत माहाराज रावसाहेब यांस पहावें. तेव्हां, श्रीमंतांच्या भेटी व सर्वांच्या होतील, हें वारंवार बोलतात. मी तर लिहिलेंसें वारंवार ह्मणतात. आंगरेज, शुजायतदौरेचा लेंक व नजफखान व जयनगरवाले हे सर्व एक जाहले, हें ऐकितों. तेथें खबीर काय असेल ती खरी. जफरदौरेविशीं दादानें लिहिलें आहे. यजमानानें त्यांच्या शेफता व पत्रें पाठविलीं, खातरजमा फार केली, हेंही आहे. हे विनति.