Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १६५
तेव्हां, मागून कुटुंबाकरितां तुह्मी जाल, याकरितां यादी करार करून दिल्ही आहे. परंतु आता मोठ्या खिडक्या दरवाजे ठेविले आहेत. तूर्त शिक्केकटार पंधरा दिवस मात्र ठेवा. साबाजी भों नाना ऐसें चिठींत लिहीन. मागू नका. सेनासाहेब सुभा रघोजीबावास लिहीन. हा सिद्धांत मामांनी व दिवाकरपंतांनीं करून, सेनासाहेबसुभा यांस वे भवानी शिवराम यांस सांगितलें. आणि सांगितलें कीं, तुह्मीं बाईकडे जात जावें, रतिमात्र चूक पडली ह्मणजे नवाब व आह्मीं मिळाल्यास इजला गारत करून देईन ! तों बाईकडील पत्रेंहि मामांस सांपडलीं. रा शिवराम विइल यांजकडे संचार बाईनीं धरिला. तो त्यांनी सांगितला. वाईवर चौक्या ! सेवट मूल आणि बाई संभर रावतांनसीं डे-याजवळ आपल्या असावी, हा करार जाहला. बाईस उमजलें कीं, मी यांची आशा न मानिली ह्मणजे हे। यादींतून निघतात आणि गारत करितात. त्यावर राजश्री हरीपंत तात्या आले. हैं कच्चें वर्तमान तात्यांस व रुकुनुद्दौले व जाबितजंग यांस मामांनी सांगितलें, सेवट श्री पंढरीच्या देवालयांत बाईनीं मामास शपथेनें गोंवावें ऐशी संधी घडवून, भाऊबहीण हें नातें लाऊन, देवासमक्ष ह्मणूं लागली कीं, यादी खरी ऐसें वचन द्यावें. तेव्हां मामांनी साफ सांगितलें कीं, रघूजीबाबा जानोजी बावाचे पोटचा नाहीं, तुजला पुत्र नानाचाच खरा. ऐसें विशादयुक्त भाषण केलें तेव्हां बाईस निराशा जाहली. तेव्हां आपली गत पुसली कीं, माझा वाली कोण ? तेव्हां मामांनीं उत्तर केलें कीं, साबाजीबावा अवज्ञा करील तरी करू देणार नाहीं. हें वर्तमान डे-यास येऊन तात्यापाशीं सांगितलें. व रुकुनुद्दौले व जाबितजंग यांजपाशींहि सांगितलें कीं, देवाजवळ मजला बाईंनीं गांठिलें होतें, त्यास साफ सांगितलें, बाई उमजली. दंगा करील, जाईल, याजकरितां मोंगलाजवळ पिछाडीस उतरविली. तमाम फौजेच्या हजि-या राजश्री त्रिंबकपंतास व फडणवीस सचंत्र ठेऊन घेतल्या. त्याचे कारकून बेइतल्ला केलें. बाईस उमजलें कीं, आतां नानासाहेबांसच धरिल्यानें वांचत्यें. तेव्हां सरदार व कारकून राजकारणास लागले. त्या दिवसांत आह्मींहि बोध करून ठीक करावें ऐसे होतें. त्यास, मामा एका दिवसाकरितां उतावळी करून गेले. दगा पावले. दुसरे रोजी सर्व सरदार व नबाब एक करून श्रीमंतास दोन मजली जाऊं न द्यावें, हे जाबितजंग व आपण जिद करीत असतां, आपणावर तफाने ? शिक्केकटार मागितली. सेनासाहेबसुभा रघोजीबावास देणार ऐशीं पत्रें पुरंदरास लटकीं पाठविलीं व तात्यास सांगितलें, मुधोजीबावाचें व श्रीमंताचें सूत्र. ऐशीं तुफानें घेऊन, केली श्रम त्यास, श्रीहरी ब चार मातबर रास्ते आदिकरून यांस ठाऊक आहे. जाबितजंगास घेऊन आलों. एक मास निर्मलेकडे मजला लागला. मामांनीं सांगितलें कीं, हे मसलत राजश्री बापूची आहे. मीच बापू आहें. भेद नाहीं. मजविसीं पुरंदरास लिहिलेंहि असेल. ऐसे श्रम केले असतां, मामा जातच आपले राहुटींत बसलों. पंधरा रोज पाहिलें तों तुफान करून कैद करितात. तेव्हां राजश्री बापूकडे पत्र पाठविलें, बापूंनीं व नानांनीं हरीपंतास लिहिलें कीं, मसलतेंतून दिवाकरपंतास न टाकणें, आणि मजला पत्र आलें त्यांत आज्ञा कीं, हरीपंताकडे जात जा. तेहि बोलावतील. तेव्हां, ती पत्रे प्रतिष्ठेस प्राणास आश्रय जाहला. राजश्री नाना जोशी आले. त्यांचें दर्शन जाहलें. ते पुर्तें वाकीफ जाहलें. आमचें समाधान केलें. तों हरीपंतावर बाईचे मसलतेचें जड पडलें. पुरंधरचीं पत्रें आलियावर तात्यांनीं पदर पसरिला कीं, चूक जाहली. नाहक तुह्मांवर आरोप केला. भवानी शिवराम पायां पडले कीं, चूक जाहली. ईश्वर आह्मीं सोडिला. इतकें आतां माफ करावें. पुढें चुकणार नाहीं. तेव्हां तात्याकडे जाणें सुरू केलें. बाईचा कारभार, तीस लक्ष रुपये तलब बाईची द्यावी. पुढें बाईस सरंजाम द्यावा. या पेंचांत दौलत गारत. फौज सेनाधुरंधर याची हणमंतराव घाटगे वगैरे यांचें जथ पडणार.