शाली वाहन शकें १५४२ दुर्मती संवत्सरीं तक्तनिशि जाहले सवेंच या दव राजे ह्मण्णार कोणी येक राजे होते, त्यांनी प्रार्थनापूर्वक आपले कन्या जिजाऊस शाहजी राजास द्वितिय विवाहास लग्न करून दिल्हें । या शाहजी राजाचे धाकुटे भाऊ शरफोजी राजे, यांनी विश्वासरायांचे कन्या दुर्गाबाई, यांसी लग्न करून घेतले। तदनंतरें कित्तेक दिवसावरि या उभयतांचे चुलते विठोजी राजे दैवगतीस पावले । त्यांचे लेक आठजणहीं निजामशाहा पादशहास अनुसरून होते । तदनंतरें कांहीं येक विशेष दिवसांत निजामशाहापादशहानी आपल्या खालील राजे लोक तमामास बोलाऊन पाठऊन सदर केले । त्या सदरेस आल्या उपयुक्त नामनिशाःप्रथम मालोजी राजे त्यांचे लेंक शाहजी राजे शरफोजी राजे हे दोघे भाऊ; व यांचे चूलत भाऊ विठोजी राजे यांचे लेंक आठजण; व शाहजी राजे यांचे दुस-या स्त्रीचे जनिता यादवराजे म्हण्णार येक; व त्याचे पुत्र दत्ताजी राजे म्हण्णार हीं; व खंडागळे म्हण्णार तेहीं येक थोर सरदार; समग्रहीं सदर माडा जाहल्यावरी, बाहेरी येते वेळेस दाटणे पडली । त्या दाटणींत वरि लिहिल्या खंडागळे म्हण्णार सरदाराचा हत्ती मस्तीस येऊन बहुत प्रजांस मारिला । तेव्हां यादव राजे म्हण्णाराचे लेंक दत्ताजी राजे यानीं तरवार घेऊन त्या खंडागळाच्या हत्तीस मारावेंयास गेले। त्या वेळेस विठोजी राजाचे लेंक आठजणा भावांपैकीं, संभाजी राजे म्हण्णार येक, व खेलोजी म्हण्णार येक, या दोघानाहीं खंडागळेचे स्नेहास्तव त्या खंडागळाचा हत्ती मारावयास आल्या दत्ताजी राजास, हत्ती मारणें गरज नाहीं म्हणून अटकाविले ।

तेव्हां दत्ताजीस राग येऊन, बहुत लोकांस जायां केला हत्तीस, मारावें ह्मणालियांस तुह्मी अटकावणें काय, म्हणून येकास येक चर्चा वाढून हातांस हात मिळून खानीजंगीं जाहली । त्यांत विठोजी राजाचे लेंक संभाजी राजाचा हात चालून दत्ताजी राजाचे डोसकें उडालें । तेव्हां त्या दत्ताजी राजाचे वडील यादवराजे, पुढें लांबले होते, त्यांस आपले पुत्र