मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

व्यंकटराव सरसुभेदार यांचे                                                   लेखांक ९.                                                    १७१४ कार्तिक वद्य ७.
पत्राचें उत्तर छ २० र॥वल.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री राये व्यंकटराव सरसुभेदार स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें राजश्री गोविंदराव यांची तुमची भेट मुराम येथें होऊन सविस्तर त्यांणीं तुह्मांसी बोलण्यांत आणिलें ये विषयींचा तपसिल लिहिला तो समजला त्यास इकडून राजश्री गोविंदराव यांजला जातेसमई तुह्मांसी बोलावयाचे सांगितले त्याप्रमाणे त्यांचे तुमचे बोलणें जालेयावरून संतोष जाला परंतु गोविंदराव याजकडून येविषयीं अद्याप पत्र येऊन कांहीं समजलें नाहीं राजश्री शिवशंकरपंत यांचे सुटकेविषई लिहिलें त्यास नाईकाकडून येथें ग्रहस्त आले होते त्यासी बोलण्यांत येऊन त्यांजला तेथें पाठविलें अद्याप तिकडून उत्तर कांहीं आलें नाहीं इकडून ल्याहावयाचें तें पेशजी कसें लिहिण्यांत आले हें सर्व तुह्मांस गोविंदराव यांचे सांगितल्यावरून ठाऊकच आहे हालीहि वरचेवर लेहून पाठवण्यास अनमान नाहीं कितेक उपरोधिक प्रकार लिहिला याचे कारण काय पूर्वींपासून तुह्माकडील प्रकार दुसरा नाहीं याचा तपसील लिहिणे नलगे वरचेवर पत्र पाठवून वर्तमान ल्याहावें राजश्री देवराव भास्कर येथे आहेत म॥र-निल्हे लिहितील त्यावरून कळलें पाहिजे जे तुह्मांसी बोलणें जालें आहे ते विसरण्यांत आलें नाहीं त्याचे प्रसंगाचा समय प्रस्तुत आला त्यासमईं तुह्माकडील स्मरण राखोन जो प्रकार घडण्यांत आला याचा तपसील देवराव यांणी तुह्मांस लिहिला आणि गोविंदराव समक्ष तुह्मी बोलिले त्याजवरून समजलेंच आहे त्याअर्थी विस्तार लिहिणें कारण नाहीं जो प्राचीनपासून प्रकार आहे तो खचित आहे येविषई खातरजमा ठेवावी पुढेंहि दिसण्यांत येईल त्याजवरून आणखी समजेल शिवशंकरपंत यांस आणविण्याविषईं इकडून निकड आहे तपसिले देवराव लिहितील त्याजवरून कळेल र॥ छ २० र॥वल बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.