मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

पो। शके १७०६                                                                लेखांक २१२.                                                १७०६ ज्येष्ठ शु॥ १३.
ज्येष्ठ शु।। १३ मंगळवार.                                                          श्री.                                                        १ जून १७८४.                                                                       

"राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गणेशपंत दादा व धोंडोपंत नाना स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी दत्तात्रय व गोपाळ गणेश सां। नमस्कार विनंति. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करित जावें. विशेष, आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तरी ऐसें नसावें. सदैव पत्र पाठवून आपलेकडील सविस्तर वृत्त वरचेवर लिहित जावें. यानंतर इकडील मजकूर तरी, तपशील.

मातुश्रीचे शरीरभावनेचें वर्तमान अलीकडे कसें आहे, औषध कोणाचें चालतें, आजपर्यंत कांहीं उतार पडला किंवा नाहीं हें कचें लिहावें. कलम १

नवाबबहादुराचे तालुकियांत होळकराकडील पेंढारी व राजश्री परशरामभाऊ कितुराकडून आले, त्यांणीं उपद्रव दिल्हा, याजकरतां नूरमहमदखांन याचे चित्तांत संदेह येऊन बहुत आजुर्दा होता. हें सर्व जमानाची सरकारांत निवेदन करून बंदोबस्त करिवला. प्रस्तुत त्याचे प्रांतांत कांहीं उपद्रव नाहीं. आपणांस कळावें. कलम १

रावरास्ते यांजकडील स्नेहाविषयींचे संधान आपले यजमानाकडे लागलें आहे, आणि बोलतात कीं, श्रीमंतांचे आमचें वांकडे आंतून आहे, तें नीट करून द्यावें. आमची आंतून वकिली आपण करावी. तुह्मीं जितकें पाणी प्यावयास सांगाल तितकें पिऊं. तुह्मांखेरीज आमचीं कामें सुधरत नाहीं, हें आह्मांस पुरतेपणीं समजलें. याउपर आमचा आतां अंत पाहूं नका. ह्मणोन बहुत गळां पडले आहेत. याउपर होईल तें लिहीन. कलम १

नवाब बहादर यांजकडील वर्तमान तरी, नवाबाचा मानस खातरजमेचीं पत्रें, शपतपूर्वक पूर्वींल करार मदार व सौगंध शपत उघरून पत्रें पाठवावीं. ह्मणजे ऐवज सावकाराचे पदरीं घातला आहे तो रवाना करून देतों ऐसें होतें. त्यावरून पंढरपुरचे मुकामींहून आपले यजमानाचेच विद्यमानें सरकारच्या व खासगत व रावरास्त यांच्या थैल्यासहित पत्रें रवाना करून एक मास होत आला. येथून रवाना थैल्या जालेल्याचे जाबही पांच सात दिवसांत येतील, ऐसें वाटतें. नंतर होईल ते आपणांस लिहून पाठवूं. कलम १

नबाब निजामअल्लीखान याच्या व सरकारच्या भेटी सुरापुरानजीक बारा कोसांवर यादगिरच्या किल्ल्याजवळ नवाबाच्या डे-यासच वैशाख वद्य १२ रविवारीं भेटी सर्वत्रांच्या जाल्या. नवाबाच्या लस्करानजीक चार कोसांवर आपले लस्करचा मुकाम भीमातीरानें आहे. येथेंच आठ पंधरा मुकाम होतील असें वाटतें. अद्याप सरकारी कामकाजाचें बोलणें लागलें नाहीं. पुढें होईल तें लिहून पाठवूं." कलम १

कलमें पांच लिहिलीं आहेत, यावरून कळेल. बहुत काय लिहिणें, कृपालोभ करावा हे विनंति.

 

                                                                                                                                 ****** समाप्त******