मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

आमचा व सरकारांचा इनामप्रमाण करून देणें की, पुढे अन्तर न पडे. व इंग्रजांसी आह्मी इकडे बिघाड केलियावर तुह्मांकडील आश्रावर न राहिला तर आह्मी एकले पडून त्यांचे काबूंत सांपडूं, न करावे. तेव्हां आह्मी पुरती खातरजमा केली व आपली कैसी खातरजमा जाहली हे पुसिलें. तेव्हा बोलिले की, तयांच्या आमचा कौलकरार जाहला ह्मणजे खातरजमाच आहे. याप्रमाणें बोलणें जाहलें आहे. हाल्ली इंग्रजांची मोहीम अपुरी सोडून सरदार उज्जनी इंदुरास आले. यास्तव यांस संवशय वाढ होऊन पातशहाकडून कम नामें खोजा व नजबखानानें आपलेकडील इसमास नामें खोजा वजिरास नालकी व इंग्रजास वस्त्रें, जवाहीर व पत्रेंव आसफद्दौलाचे मातुश्रीस व आजीस वस्त्रें देऊन अयोध्येस रवाना केले. तेसमई आह्मी पृच्छा केली की, हा सिष्टाच्यार करावयाचें कारण काय ? तेव्हा बोलिले कीं, वजिराची आबरू वाढावी आणि इंग्रजांनी वजिरास ग्रासिलें आहे तें तूर्त आमचे खातीर दास्त केवळ ग्रासून चुकणार नाहींत तोंवर सरकारची फौज या प्रांतीं आलियावर त्यांचे आमचे विच्यारें जें कर्णे ते करूं, एविशीं तुह्मी आपले चित्तांत संदेह न मानावा. याप्रमाणें आमची खातरजमा केली व पूर्वी पातशहानी डेरेदाखल व्हावें व अंतर्वेदीत उतरावे हें ठरले होतें. याचे कारण हेंच की, सरदारांनी इंग्रजास सुरत प्रांतीं सरकारचे फौजेनें घेरले होतें या प्रतापावर हे बहुत उछाहयुक्त होते. आता सरदार फौज घरोघर गेले व एक दोन स्थलीं फौज इंग्रजांनीं मोडली व या प्रांतीं गोहदेकडील फौजेवर शहखून पडला. सरदार वीस हजार फौज असतां आपसांत फुटून गेले. अंबाजी इंगळे यांनी ग्वाल्हेरसारखा किल्ला गमाविला. इंग्रजांनी घेतला. आपले फौजेचें बळ नाहीसे जाणून हे शशांकित होऊन बाहीर निघणें राहिलें. वर्षाकाळानंतर सरदार मातबर फौजेनें आलियावर त्यांचे आमचेसला हें जें उत्तम असेल तें करूं, ह्मणतात. जें वर्तमान आह्मांस कळत नाही ते बातमी पुणियाहून कुवरसेन नामें कोणी आहे तो तेथून दिल्लीस नजबखानास वगैरे चहूंकडे बातनी लिहितो. व उज्जनची ही बातनी कच्ची पक्की वरचेवर अनुपगीर गोसाव्याकडे येते. तो यांस श्रुत करितो. तें वर्तमान आह्मांस नजबखानानीं सांगितलें. तेव्हां आमचे कर्ण सिथळ जाहले. परस्परें पातशहांस व नजबखानास याप्रमाणें बातमी येते ते वेळेस हे ह्मणतात कीं, हे आपले सरकारच्या गोष्टी उजमाच्या सांगतात. परंतु तेथील लिहिणार लिहितात ह्या गोष्टी सत्य आहेत. याप्रमाणें इकडील जालेलें वृत्त श्रवण व्हावें ह्मणून विनंति लिहिली असे. व सेवटीं आह्मी यांसी बोलिलों कीं, इंग्रजांची नड कायम ठेवलियास आमचे सरकारचे नुकसान नाहीं, परंतु पातशाहीस ठीक नाहीं. तेव्हां बोलिले कीं, श्रीमंतही त्यांचे पारपत्यास सिद्ध होत आहेत व आह्मांस तेंच आपले मकदुराप्रमाणें कर्णे प्राप्तच आहे. वर्षाकाळानंतर श्रीकृपेनें सरकारचे फौजेसहित सरदार आलियास त्यांचेच विच्यारें जें कर्णे तें करूं याप्रमाणें यांसी पक्कें केले आहे. पुढें इंग्रजांची यांची तुटातूट होऊन, त्यांचे प्रांतावर मोहीम करीत, तें करावयासी सरदारांस सेवकानें लिहिलें व पातशहा नजबखानाकडूनही लिहिलें व वचनीं गोविलें आहे. इंग्रजास चहूंकडून ताण बसल्यास जेर होतील. यास्तव एक सरदार मातबर एप्रांतीं पाठविणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.