प्रस्तावना

७. कर्तबगार कामकरी म्हणजे कोण, असा प्रश्न येथें येतो. देशाच्या सध्यांच्या विपन्न स्थितींत कर्तबगार कामकरी तो कीं जो इतरांना द्रव्याची बिलकुल तोशीस न लावतां, देशाची सेवा करण्यांत स्वतःच्या उत्तमोत्तम शारीरिक सामर्थ्याची व बौद्धिक सामर्थ्याची पराकाष्ठा करून सुखानें असतों. स्पष्टीकरणार्थ एक काल्पनिक कर्तबगार व्यति घेतों व त्यानें इतिहाससाधनांच्या संशोधनार्थ व प्रकाशनार्थ काय खटपट करावी, तें सागतों. समजा कीं एखाद्या बी. ए. किंवा एम. ए. पदवीधरास मराठ्यांच्या इतिहासाचा उद्धार करण्याची चुकून उत्कट इच्छा झाली. समजा कीं, ह्या उज्जिहीर्षु गृहस्थाजवळ अठराविश्वे दारिद्र्य आहे. अशा गृहस्थानें इतिहाससाधनांचा उद्धार कसा करावयाचा? तर, प्रथम, ज्या अर्थी तो अठराविश्वे दरिद्री आहे, व देशांतील लोकही त्याच्याइतकेच हल्लक आहेत, त्या अर्थी त्यांना त्यानें होईल तितकी थोडी तोशीस दिली पाहिजे. म्हणजे टाकलाच तर केवळ उदरनिर्वाहापुरता त्यांच्यावर त्यानें भार टाकिला पाहिजे. स्पष्ट शब्दांनीं सांगावयाचें म्हटलें म्हणजे, ओली किंवा कोरडी भिक्षा मागून इतिहाससाधनसंशोधनाचें व इतिहासलेखनाचें काम त्यानें जोरानें व उत्साहानें चालविलें पाहिजे. हा मार्ग कांहीं नवीन नाहीं. आपल्या ह्या भारतवर्षांत हा अनादिपासूनचा आहे 'ॐभवति या पक्षा राखिलें पाहिजे.' बरें! असेंही काहीं नाहीं की ॐभवति पक्षाला धरून प्राणधारण केलें असतां, उच्चविचार किंवा शास्रसंशोधन किंवा अकटोविकट शारीरिक व मानसिक श्रम करतां येत नाहींत. कदाचित्, असेंही म्हणतां येईल कीं, ॐभवति या पक्षाचा आश्रय केला असतां, हीं सर्व कार्यें उदरनिर्वाहार्थ इतर धंद्यांचा आश्रय करण्यांतल्यापेक्षां, जास्त एकाग्रतेनें व कौशल्यानें साधतां येतात. ह्या समाजांतील एकंदर लोकांचें मत पाहतां, तेंही भिक्षावृतीच्या विरोधी नाहीं; उलट अशा भिक्षावृत्तीचा समाजांत आदरच होतो. समाजाकडून अत्यंत निकृष्ट वेतन घेऊन, समाजाची अत्यंत उत्कृष्ट सेवा करण्यास जो प्रवृत्त झाला, त्याची उपेक्षा समाज काय म्हणून करील? इतकें मात्र खरें कीं, महत्कार्यचिकीर्षु भिक्षेकरी सध्यां बहुतेक नाहींतशासारखे झाल्यामुळें आळशी, व्यसनी व दुष्ट लोकांच्या हातांत चौपदरीचें वतन गेलें आहे, व त्यामुळें तें लोकांच्या तिरस्कारास पात्र झालें आहे. परंतु अनधिका-यांच्या हातून हें वतन अधिका-यांनीं हिसकावून घेतलें पाहिजे व आपलें त्यावरील स्वामित्व शाबीद केलें पाहिजे. तात्पर्य, दरिद्री विद्वानाला ह्या देशांत निर्वाहापुरतें अन्न मिळण्याची सोय आज शेंकडों वर्षांपासून वाडवडिलांनीं करून-ठेविली आहे. तिचा फायदा आपल्या इकडील महत्त्वाकांक्षी विद्वानांनीं यथेष्ट घेतला पाहिजे.