प्रस्तावना

५. साधनांची प्रचंडता महाराष्ट्रांतील लोकांच्या लक्षांत आणून देण्याकरितां आजपर्यंत उपलब्ध झालेल्या साधनासंबंधानें ठोकळ माहिती देतों. सध्या रा. रा. पारसनीस यांजजवळ नाना फडणिसांचें समग्र अवशिष्ट दप्तर आहे. त्यांत कमींत कमीं वीस हजार पत्रें आहेत. वासुदेवशास्री खरे यांजपाशी अद्याप पटवर्धनी दप्तरांतून निवडून काढलेलीं अडीच तीन हजार पत्रें आहेत. आणि स्वतः माझ्यापाशीं पन्नास हजारांवर पत्रें आहेत. हे तीन साठे छापून काढावयाचे म्हटल्यास, दर खंडास पांचशें पत्रें ह्याप्रमाणे सुमारें १४६ खंड छापले पाहिजेत. ही कथा फक्त उपलब्ध अशा ऐतिहासिक पत्रांसंबंधानें झाली. अनुपलब्ध ऐतिहासिक सामग्री उपलब्ध ऐतिहासिक सामग्रीच्या निदान दसपट तरी आहे. म्हणजे पांच पांचशें पत्रांचा एक एक खंड या मानानें अनुपलब्ध सामग्रीचे निदान १५०० खंड व्हावे. हे इतके खंड छापावयाचे कसे व केव्हां? आणि छापले तर विकत घ्यावयाचे कोणीं? सध्यांची परिस्थिति पहातां, ह्या शेवटल्या प्रश्नाला उत्तर लोकांनीं म्हणून द्यावें लागेल. स्वराष्ट्राच्या इतिहासाची चाड राष्ट्रांतील लोकांस असणार, राष्ट्रबाह्य लोकांस असणें शक्य नाहीं. तेव्हां हे प्रचंड काम पार पाडण्यास महाराष्ट्रांतील उत्साही लोकांनीं कंबरा बांधल्या पाहिजेत. गेल्या पंधरा वर्षांच्या अनुभवावरून पाहतां, हें एवढें प्रचंडही काम ह्या देशांतील लोकांच्या हातून लवकरच पार पडेल, अशीं चिन्हें दिसतात.

६. उदाहरणार्थ, रा. पारसनीस यांचीच गोष्ट घ्या. शेट पुरुषोत्तम विश्राम मावजी ह्या भाटिया गृहस्थांच्या सहाय्याने रा. पारसनीस यांनी इतिहाससंग्रह नामक ऐतिहासिक मासिकपुस्तकाच्या द्वारां नानांचे दप्तर प्रसिद्ध करण्याचा उपक्रम केला आहे. मावजी शेट यांना हिंदुस्थानच्या इतिहासाचा उत्कट अभिमान असून, मराठ्यांच्या इतिहासाशी तर त्यांचें इतकें विलक्षण तादात्म्य झालेले आहे कीं, महाराष्ट्रवीरपुरुष जो शिवाजी त्याच्या चरित्राचा त्यांनीं केवळ निदिध्यास धरला आहे. घरीं, दारीं, स्वप्नांत व जागृतीत ते शिवाजीइतकी दुस-या कोणत्याच वस्तूची भक्ति करीत नाहीत. अशा निःस्सीम देशभक्ताचें सहाय्य रा. पारसनीस यांस मिळालें आहे. रा. खरे ह्यांना यद्यपि दुस-या कोणाचें सहाय्य नाहीं. तत्रापि त्यांचा स्वतःचाच निर्धार इतका खंबीर आहे कीं, स्वतःच्या जवळील सर्वस्वाचाही खर्च करून पटवर्धनी दप्तर प्रकाशण्याचा त्यांचा आज कित्येक वर्षांपासूनचा निश्चय आहे. माझी स्वतःची गोष्ट पुसाल तर ती थोडी फार माहीतच आहे. सुधारकउद्धारक, गरीबश्रीमंत, ब्राह्मणक्षत्रिय, वैश्यशूद्र, सर्व जातींचे, पंथांचे, मतांचे व चालींचे मध्यम वर्गांतील स्त्रीपुरुष, द्रव्यद्वारां, साधनद्वारां, व प्रोत्साहनद्वारां मला मदत करीत आहेत. त्यांच्या सहाय्याच्या मानानें माझ्या हातून जसें काम उठावें तसें उठत नाहीं, हें पाहून, मात्र मला क्षणोक्षणीं खेद होतो. ह्या आपल्या थोर देशांत सहाय्याची व सहानुभूतीची कमतरता नाहीं. कमतरता योग्य काम योग्य सामर्थ्यानें वठविणा-या कर्तबगार कामक-यांचीच आहे. कर्तबगार कामकरी मिळाले म्हणजे देशबंधूंच्या व देशभगिनींच्या सहाय्याचें चीज होईल आणि मंदगतीचा जुलूम संपून शीघ्रगतीचें सुराज्य सुरू होईल.